डॉ.श्रीराम गीत
दोन दिवसांपूर्वी घटस्थापनेचा दिवस होता. पुढचा मंगळवार हा सीमोल्लंघनाचा दसऱ्याचा दिवस आहे. जानेवारी महिन्यापासून हे सदर सुरू झाल्यावर मुख्यत: पदवीपर्यंतच्या वाटचालीशी संबंधित सारा मजकूर येथे लिहित होतो. कारण प्रवेशाची स्पर्धा ही तिथेच सुरू होते. मात्र जीवनाची स्पर्धा पदवीनंतर सुरू होते हे पदवी घेतल्यावर कळते. ‘बालपणीचा काळ सुखाचा’, असे एक सुवचन आहे. ‘कॉलेज जीवनाचा काळ चकाटय़ा पिटण्याचा’, असे सध्याचे लाडके वचन आहे. अभ्यास होतच असतो. परीक्षा दर सहा महिन्यांनी येतातच. त्यात नोटस पाठ करून (पुस्तके वाचून नाही) मार्कही मिळतात. असा सारा माहोल गेली वीस वर्षे वाढतोच आहे. एका सोप्या उदाहरणातून हे स्पष्ट करतो. बारावीचे कोणाचेही, कोणत्याही शाखेचे मार्क बघून त्यात पदवी दरम्यान होणारी वाढ ही अनाकलनीय असते. याबद्दल अनेकांशी अनेक वेळा मी बोललो आहे. पण कोणालाच समाधानकारक उत्तर देता आलेले नाही.
बारावीला फिजिक्समध्ये जेमतेम बावन्न मार्क मिळवलेला मुलगा बीएस्सी फिजिक्सला ७२ टक्के मिळवून जेव्हा बाहेर पडतो किंवा अशाला कॉम्प्युटरची पदवी शहात्तर गुणांनी मिळते तेव्हा असे प्रश्न निर्माण होतात. तिच कथा इंजिनीअिरग शाखेची. कला शाखेमध्ये गुणात्मक इतकी चढउतार होत नाही. मात्र, गुणांची वाढती कमान असतेच. कॉमर्स शाखेत पदवी दरम्यान वर्गात बसणारे विद्यार्थी सापडत नाहीत. तरीही त्यांची टक्केवारी ६५ ते ८० च्या दरम्यान सहज सापडते. मात्र, अशा साऱ्या मुलांची जीवनाची स्पर्धा जेव्हा सुरू होते, म्हणजेच निकाल लागल्यापासून घटस्थापनेपर्यंत यांना नोकरीची वानवा राहते तेव्हा यांच्या मार्काचे रहस्य उलगडू लागते. खूप अर्ज केले. काही मुलाखतींपर्यंत पोचलो. पण अद्याप नोकरीचा पत्ता नाही. अशा यंदाच्या असंख्य पदवीधरांचे पालकांसाठी ‘नोकरीच्या स्पर्धेत धावण्यापूर्वी’, काय लागते त्याच्यावर सलग या सदरात लिहिणार आहे. आवर्जून पालकांसाठी हा शब्द वापरतो. कारण हे पदवीधर विशेष करून शहरी आणि इंग्रजी माध्यमात शिकलेले, लोकसत्ता न वाचणारे, भरपूर माहिती आहेत. पण मला भेटणारे, लिहिणारे त्यांचेच पालक मात्र हे सदर आवर्जून वाचतात हेही माहिती आहे.
नोकरीसाठीची स्पर्धा असते हे या नव पदवीधारकांच्या गावी पण नसते. थोडक्यात दहावी पासून पदवीचा निकाल हाती येईपर्यंतचा जो दिनक्रम चालू असतो त्यात अजूनही बदल करण्याची त्यांची मानसिक तयारीही झालेली नसते. बरेच वेळा आई वडील त्याला खतपाणी घालतात. ‘‘अजून एखादा कोर्स करायचा तर चौकशी कर. पुढच्या वर्षभरात तयारी करून अजून काहीतरी शिकता येईल त्याचा विचार कर. नवीन माहिती घे.’’ अशा स्वरूपाचे सधन, सुखवस्तू, मध्यमवर्गीय घराघरातील संवाद अनेकदा कानावर पडतात. काही पालकांच्या मते सलग शिकणे, अधिक शिकणे, पदव्युत्तर पदव्या मिळवणे, सध्या अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र, हे सारे केले तर फरक काय पडतो व नोकरीची शक्यता कशी बदलते? असा प्रतिप्रश्न केला तर त्यांच्याकडे क्वचितच उत्तर असते. थोडक्यात ज्यांना गरज आहे त्यांनाही नोकरी नाही.
ज्यांनी जीवनाच्या स्पर्धेत धावण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याकरिता नोकरी करणे गरजेचे आहे, अनुभव मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना तशी इच्छा राहिलेली नाही. मुलाखत घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना काय काम द्यायचे? का घ्यायचे? असा प्रश्न पडणारे उद्योजक, मालक व एचआर मॅनेजर्स यांना पडतो. यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांना नोकरीवर घेतले गेले आहे त्यांना ते काम आवडत नाही म्हणून ते नोकरी सोडण्याच्या विचारात असतात.
खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांचेकरिता विविध शाखानुरूप आणि उपयुक्त असे या सदरात यानंतर लिहिणार आहे. अनेक जाणकारांशी होत असलेल्या चर्चेतून त्याचे अनुभवा वर आधारित अशी माहिती देण्याचा प्रयत्न असेल.