पदवी शिक्षण घेताना भरपूर कार्यानुभव विद्यार्थ्यांना मिळत असल्याने बी व्होक (बॅचलर ऑफ व्होकेशनल) पदवीनंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुबलक संधी तर मिळतातच शिवाय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळते. याशिवाय विद्यार्थ्यांना या बी व्होक. पदवीनंतर इतर कोणत्याही पदवीधरांना उपलब्ध असणारे एमबीए, लॉपासून स्पर्धा परीक्षा पर्यंत सर्व पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या सारख्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये मुख्यत: विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. बारावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा व्होकेशनल ( एमसीव्हीसी ) झालेल्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक क्षेत्रात कुशल व पारंगत बनवण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने या बी. व्होकेशनल कोर्सला (बॅचलर ऑफ व्होकेशनल) मान्यता दिली आहे. ही व्यावसायिक शिक्षणाची पदवी असून व्यावसायिक जगतातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

हे अभ्यासक्रम पारंपरिक कोर्सेस पेक्षा खूप वेगळे असून त्यामध्ये ४० टक्के थिअरी तर ६० टक्के प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येते. या तीन वर्षांच्या कोर्सेसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वर्षी विद्यार्थ्यांना बाहेर पडावे असे वाटले तर किमान डिप्लोमा प्रमाणपत्र नक्की मिळते. प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर ‘डिप्लोमा’, दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर ‘अॅडव्हान्स्ड डिप्लोमा’ तर तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर बी. व्होक पदवी विद्यार्थ्यांना मिळते. मुख्य म्हणजे व्यावसायिक जगतातील मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना केली जाते. हे अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमध्ये अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सध्यातरी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. या कोर्सला ‘नॅशनल स्कील्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ यांची मान्यता आहे. त्याच बरोबर ‘नॅशनल स्कील्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’कडून ऑन जॉब ट्रेनिंगचे प्रमाणपत्र देण्यात येते.

या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल अनुभव घेताना स्टायपेंड मिळण्याची शक्यता भरपूर आहे. पदवी शिक्षण घेताना भरपूर कार्यानुभव विद्यार्थ्यांना मिळत असल्याने बी व्होक. पदवीनंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुबलक संधी तर मिळतातच शिवाय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळते.

याशिवाय विद्यार्थ्यांना या बी व्होक. पदवीनंतर इतर कोणत्याही पदवीधरांना उपलब्ध असणारे एमबीए, लॉपासून स्पर्धा परीक्षा पर्यंत सर्व पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत. बी.व्होक अभ्यासक्रमात अनेक शाखा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरींग, रिन्युएबल एनर्जी, ग्राफिक डिझायनिंग व मल्टीमिडिया, रेफ्रिजरेशन व एअर कंडीशनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मेकॅट्रॉनिक्स वगैरे. या सर्व शाखा अभियांत्रिकी व तांत्रिक क्षेत्राशी थेट निगडीत आहेत. उदाहरणार्थ आज घराघरात रेफ्रिजरेटर आहेत तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे एअर कंडिशनर्सचा वापरही सातत्याने वाढत आहे. आज एकही कार एअरकंडीशनर नसलेली नाही. या सर्व रेफ्रिजरेटर व एअर कंडीशनर्सचे इन्स्टॉलेशन पासून देखभाल दुरुस्ती पर्यंत सर्वच ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे, जी यातील पदवी कोर्समुळे भरुन निघू शकेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात विद्यापीठाने स्वत:च हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात तीन शाखा आहेत. रिटेल मॅनेजमेंट , ऑटोमोटिव्ह ऑटोमेशन , ज्वेलरी डिझाईन व रिन्युएबल एनर्जी या शाखांमध्ये बी व्होक कोर्स उपलब्ध आहे. रिटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून विद्यापीठाने मारुती सुझुकी या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्टायपेंडसह ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे.कंपन्यांमधील तज्ञ अधिकारी प्रशिक्षण देणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम कौशल्य प्राप्त होऊ शकेल. इतर अनेक संस्थांमध्ये सुध्दा बी. व्होक चे दर्जेदार कोर्सेस उपलब्ध आहेत. बारावीला / सीईटीला कमी गुण मिळाले आहेत / सीईटी दिलेली नाही/ गणिती विषयांची भीती वाटते / इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही/ लगेच नोकरी पाहिजे/ आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा सर्व कष्ट करायची तयारी असणाऱ्या आणि प्रॅक्टिकल शिक्षणात रुची असणाऱ्या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी व्होक ही रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा निर्माण करणारी उत्तम संधी आहे हे निर्विवाद.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत या अभ्यासक्रमांचे शुल्क खूपच कमी असून अनेक विद्यार्थ्यांना स्टायपेंडही मिळतो. विद्यार्थ्यांनी हे कोर्सेस करता करता जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवले तर जर्मनीमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

vkvelankar@gmail.com