डॉ. श्रीराम गीत

सर, मला १० वी मध्ये ९५ टक्के व १२वी मध्ये ८७ टक्के गुण मिळालेले आहेत. माझी सध्या बीएएमएसची इंटर्नशीप सुरू आहे. मला बीएएमएस नंतरच्या करिअर संधी भारत व विदेशात कोणकोणत्या आहेत व त्यासाठी काय करावे याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे. – ऋषिकेश

‘बीएएमएस नंतर काय काय करावे?’ याविषयी एक सुंदर पुस्तिका ‘आयुर्वेद संमेलन’ या संस्थेने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर तुला वाचावयास मिळेल. तुझ्या शिक्षकांकडून किंवा ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडून आयुर्वेद संमेलनाचे पदाधिकारी कोण व ऑफिस कुठे याचा पत्ता मिळवण्याचे काम मात्र, मी तुझ्यावरच सोपवत आहे. इंटर्नशिप संपेपर्यंत हा शोध घे.

ज्येष्ठ नागरिकाला एमपीएससी, यूपीएससी क्षेत्रात करिअर करायचे असेल तर काय करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करा. मी एमबीबीएस डॉक्टर असून गेली ३२ वर्षे सरकारी नोकरीत होते. मी या क्षेत्रात काही करू शकते काय़? – डॉ. बारसे

हेही वाचा >>> एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-२ – मृदा घटक

आपण डॉक्टर आहात. एमपीएससी, यूपीएससी क्षेत्रात काहीतरी करायचे असे आपल्या मनात आहे. यातून मला एकच गोष्ट लक्षात येते की इच्छुक मुला-मुलींना मार्गदर्शन कसे करता येईल किंवा त्यांच्यामध्ये जागरूकता कशी निर्माण करता येईल अशा दिशेने आपले विचार जात असावेत. दुसरा रस्ता म्हणजे अशा क्लासेसमध्ये काही विषयाचे प्रशिक्षण देण्याची स्वत:ची क्षमता तयार करणे. डॉक्टर असल्यामुळे बायोलॉजिकल सायन्सेस, पर्यावरण, नैतिकता, बुद्धिमत्ता चाचणी यातील एक दोन विषय निवडून शक्यता निर्माण झाली तर म्हणजेच क्लासेस वाल्यांनी तुम्हाला तशा स्वरूपाचे काम देऊ केले तर या क्षेत्रात शिरकाव होऊ शकेल. सलग महिनाभर करिअर वृत्तांत मधील या विषयांचे वाचन आपण करावे व योग्य तो निर्णय घ्यावा.

नमस्कार, मी २०२३ मध्ये डिस्टिंक्शनसह राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. आता मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमए करत आहे. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. मी खूप गोंधळले आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

स्मिता कोकरे

आपण गोंधळल्या आहात याचे कारण आपण न देता, लिहिता तुमचा गोंधळ मी कसा काय दूर करू बरे? वेगळ्या शब्दात तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचारा. माझा गोंधळ कशाकशात होतो आहे? मी यूपीएससी होईन की नाही? त्यासाठीचा अभ्यास मला झेपेल काय? त्यासाठी किती खर्च येईल? त्याला आई-वडील पाठिंबा देतील का? तो पाठिंबा किती वर्षे राहील? मुलीचे लग्न हा त्यांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न कधी समोर उभा राहील? त्यासाठी तुमच्या मनातील उत्तर कोणते? यूपीएससी न झाल्यास माझ्या एमए नंतर मला कोणत्या स्वरूपाची नोकरी मिळण्याची शक्यता आहे? क्लास लावायचा झाला तर तो कोणता लावावा? पुणे, मुंबई का दिल्ली? स्पर्धा परीक्षा केंद्र यासाठी मी प्रयत्न करू का? त्याची स्पर्धा किती तीव्र असते? यातील एकेका प्रश्नाच्या तुकड्या तुकड्यावर विचार सुरू करा. सगळा गोंधळ नक्की दूर होईल. एखादी यूपीएससी देणारी मुलगी यावर मदत करू शकेल. कारण यातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला स्वत:लाच शोधायची आहेत.

माझे आत्ता बी.कॉम झाले आहे. बी.कॉम.ला माझा सीजीपीए १० पैकी ८.३३ आहे. मला दहावीला ८२ टक्के आहेत. बारावी कॉमर्स मधून मला ७४ टक्के आहेत. बी.कॉम पूर्ण झाल्यानंतर मी वनरक्षकची परीक्षा दिलेली आहे. त्याची लेखी परीक्षा झालेली असून मी आत्ता त्याच्या पुढच्या परीक्षेची तयारी करत आहे. त्याबरोबरच मला पीएसआयसाठी सुद्धा तयारी करायची आहे. आत्ता माझे वय २१ वर्ष आहे. हे सगळे करत असताना मी एखादी नोकरी केली तर ते योग्य राहील का?

शिवानी बोडके होय जरूर करावीत. कारण सगळे यशस्वी होऊन निवड झाली तरी हाती नेमणूकपत्र मिळेतोवर पंचवीशी पूर्ण होऊ शकते. खूप छान आणि व्यावहारिक विचार आहेत.