डॉ.मिलिंद आपटे
● मी मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकी (विशेषत: डेटा विज्ञान) या शाखेतून २०२५च्या बॅचमधून पदवी घेत आहे. सातव्या सत्रापर्यंत माझा सरासरी गुणांक (CGPA) ९.१५ आहे. महाविद्यालयात ऑन-कॅम्पस भरती प्रक्रियेद्वारे मला दोन नोकरीच्या संधी मिळाल्या होत्या, त्यापैकी मी एक कंपनी ९ जूनपासून जॉइन केली आहे.
सध्या मी सॉफ्टवेअर विकास अभियंता या पदावर व्यवहारिक बँकिंग विभागात काम करत आहे. मी जर २ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर व्यवसाय व डेटा विश्लेषण किंवा कार्यव्यवस्थापन (ऑपरेशन्स) या क्षेत्रात व्यवस्थापन पदवी (एम.बी.ए.) केली तर त्याचे फायदे काय असतील? किंवा थेट डेटा विज्ञान वा विश्लेषण या क्षेत्रात एम.एस. केल्यास अधिक फायदेशीर ठरेल? माझा कल आर्थिक व्यवहार ( Finance), कार्यप्रणाली ( Operations) आणि डेटा विज्ञान या तिन्ही क्षेत्रांकडे आहे, त्यामुळे योग्य दिशा ठरवताना गोंधळ होत आहे. – संस्कृती चव्हाण
– एक एक प्रश्न आपण चर्चेला घेऊ , एकूण आपण एक हुशार आणि वर्सटाईल आहात, मेहनती आहात. करिअर निवड केवळ फायदे कुठे होतील याचा विचार न करता त्यासोबत ‘मी ‘कोणत्या करिअरसाठी योग्य आहे हा पण विचार करावा. हुशारी आणि मेहनतीने परीक्षा पास होणे किंवा उच्च शिक्षण घेणे नक्कीच शक्य आहे पण त्या आधारे मिळणारे काम किंवा प्रोफाइल मला तीस वर्ष करायचे आहे त्या योग्य मी आहे का हा विचार प्रामुख्याने करावा, नाहीतर संभ्रम हा जन्मभर राहतो.
एमबीए कशातही झाले तरी त्याचा पाया हा प्रेझेंटेशन आणि बिजनेस हा असतो त्या योग्य व्यक्तिमत्त्व आहे का हा विचार करावा. थेट डेटा विज्ञान वा विश्लेषण या क्षेत्रात एम.एस. केल्यास अधिक फायदेशीर ठरेल का या प्रश्नाचे उत्तर तसे वरील प्रमाणेच आहे पण एमबीए हा बिझनेसला धरून तर एमएस हा टेक्नॉलॉजीला धरून असतो पण अर्थातच संधी इथे एमबीए पेक्षा जास्त असतील.
डेटा विज्ञान या धाग्याला धरून ठेवलेत तर पुढे स्टॉक मार्केट , मार्केट अनालिस्ट म्हणून सुद्धा संधी मिळू शकतील. तुमची योग्यता बघता, ऑनलाइन एमबीए मी तरी आता तुम्हाला सांगणार नाही. एमएस परदेशातून करणे हे पूर्णपणे आर्थिक योग्यतेवर अवलंबून आहे, त्यावर योग्य देश आणि विद्यापीठ निवडणे हे अवलंबून आहे
बरेच प्रश्न होते त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण अॅप्टिट्यूड टेस्ट करून उत्तरे शोधावी असे प्रामाणिक मत आहे. खूप शुभेच्छा
