डॉ.भूषण केळकर डॉ.मधुरा केळकर
युरोपमध्ये लोक ३५-४० तास काम करतात, पण प्रगतीत ते मागे नाहीत. अमेरिकेत लोक ४५ तास काम करतात. तेव्हा ‘स्मार्ट वर्क‘ हे निव्वळ ‘हार्ड वर्क’ पेक्षा गरजेचे आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
अलीकडे एक विचारसरणी देशभर चर्चेचा विषय बनली आहे – ती म्हणजे ‘भारतीयांनी आठवड्यात ७० ते ९० तास काम करावं का?’ ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी सुचवले की, भारताच्या प्रगतीसाठी युवकांनी आठवड्याला किमान ७० तास तरी काम करावं. ‘एल अँड टी’चे अध्यक्ष सुब्रमण्यम यांनी म्हटले की कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करावे आणि खरे तर रविवारी पण काम करावे! यावर आनंद महिंद्रा यांनी ७० किंवा ९० च्या आकड्यांना असहमती दर्शवली आणि त्यांनी म्हटले की किती तास काम केले यापेक्षा तुमची कार्यक्षमता महत्त्वाची !
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) भारत संस्थापक सदस्य आहे. आयएलओनुसार, ४८ तासांवर काम करणे हे ‘ओव्हरटाइम’मध्ये मोडते. आता त्यात अजून २०-३० तास भर म्हणजे ‘ओव्हर-ओव्हरटाइम’. यावरून एकाच गोष्टीची आठवण येते – ‘‘जगायला वेळ नको का बाबा?’’
भारतीयांची सध्याची स्थिती तर अशी आहे की त्यांना वाटते की आम्ही आधीच ‘ओव्हरटाइम’मध्ये जगतोय. सरकारी नोकरी नाही, पण भारतातील खासगी क्षेत्रातील नोकरदार लोक आधीच ‘९ते ५’ ची नोकरी करत नाहीत… ते ‘९ ते ९ आणि नंतर वायफाय’ अशा पद्धतीनं काम करत असतात. कंपन्यांचं काम संपतं कधी, हे ‘एचआर’लाही कळत नाही. ‘लॉग आऊट’ म्हणजे काय, हे विचारल्यावर गुगल सुद्धा भारतात विचारात पडतं!
आर्थिक बाजूचा विचार केला तर जास्त वेळ काम म्हणजे जास्त उत्पादन हे समीकरण योग्य असेलच असे नाही. आणि त्यातून ते सर्व क्षेत्रात सारख्या प्रमाणात खरे नक्कीच नाही. मला तर वाटते की कामाचा दर्जा महत्त्वाचा – नुसता वेळ नव्हे. हेच बघा ना – युरोपमध्ये लोक ३५-४० तास काम करतात, पण प्रगतीत ते मागे नाहीत. अमेरिकेत लोक ४५ तास काम करतात. तेव्हा ‘स्मार्ट वर्क‘ हे निव्वळ ‘हार्ड वर्क’ पेक्षा गरजेचे हे लक्षात घ्यायला हवं.
आपण जर आठवड्यात ९० तास काम करत असू, तर रविवार काय फक्त ‘झोपण्यात घालवण्याचा अधिकृत दिवस? AIIMS आणि ICMR ¨या अभ्यासानुसार, जास्त वेळ काम करणाऱ्यांमध्ये हृदयविकार, तणाव, निद्रानाश, आणि ऑफिसमध्येच झोप लागण्याची शक्यता वाढते. म्हणजे उद्या ‘ Sleep at Desk’ हा नवीन ऑफिस बेनिफिट होणार का? जपानमध्ये लोक इतकं काम करतात की त्यांनी त्यासाठी खास एक शब्द बनवलाय – ‘‘करोशी’’ – म्हणजे कामाच्या ताणाने मृत्यू. या ‘‘करोशी’’ मुळे आपण त्यात ‘मरोशी’ होण्याआधी जागं व्हायला हवं.
भारतीय कुटुंबात पती-पत्नी, आजी-आजोबा, मुले, सासू-सासरे सगळे असतात. त्याचबरोबर मावस, चुलत अशी विस्तारलेली कुटुंबपद्धती आणि मित्रपरिवार हा सुद्धा खास भारतीय विचार आहे. आता जर तुम्ही आठवड्यात ९० -१०० तास काम करत असाल, तर घरचे लोक विचारतील -‘‘हा कोण नवीन भाडेकरू आलाय? आठवड्यातून एकदाच दिसतो!’’ एकीकडे ‘फॅमिली टाइम इज इम्पॉर्टंट’ अशा पोस्ट शेअर करायच्या, आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये ‘झूम वरच वाढदिवस’ साजरा करायचा, हे विसंगत वाटत नाही का? देशाची प्रगती हवीच — पण ती रोबोट बनून नाही. भारताला मेहनती लोक हवेत, पण स्मार्ट मेहनती. ७० तास काम करण्याऐवजी ४५ तास उत्तम काम करणारे नागरिक देशासाठी अधिक फायदेशीर ठरतील. कारण थकलेला माणूस ‘एक्सेल शीट’ नक्की भरतो, पण ‘आयुष्याचा बॅलन्स शीट’ विसरतो.
म्हणून, आठवड्याला ७० तास नुसतेच यंत्रवत काम करण्यापेक्षा, रात्री ७ तास नीट झोपणं – आणि दिवसाला ८ तास मन लावून काम करणे, हीदेखील एक देशसेवाच आहे!
bhooshankelkar@hotmail.com / mkelkar_2008 @yahoo.com