How To Become An Air Hostess: दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये इयत्ता १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. दहावीनंतर बारावी ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा असतो असे म्हटले जाते. बारावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचं असा प्रश्न पडत असतो. अशामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलींसाठी एअर हॉस्टेस हा उत्तम पर्याय ठरु शकतो. या क्षेत्रामध्ये ग्लॅमरसह चांगला पगार देखील आहे. तसेच कामाच्या निमित्ताने बाहेर फिरायला मिळते., नवे देश पाहता येतात. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य मुली एअरलाइन्स क्षेत्राकडे वळल्या आहेत.

एअर हॉस्टेस होण्यासाठी सर्टिफाइट कोर्स, डिप्लोमा कोर्स आणि डिग्री कोर्स अशा तीन अभ्यासक्रमांच्या प्रकारांची मदत घेता येते. यामध्ये मूलभूत व्यवस्थापन कौशल्ये, आपत्ती व्यवस्थापन, आदरातिथ्य करायच्या पद्धती, नेव्हिगेशन संबंधित कौशल्ये, विमानाचे मूलभूत सामान्य ज्ञान आणि केटरिंग सर्व्हिस अशा काही गोष्टींचा समावेश असतो.

१. सर्टिफाइट कोर्स – बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफाइट कोर्सचा देखील समावेश केला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्यातील कन्टेंट त्या-त्या संस्थेनुसार ठरत असते. सामान्य सर्टिफाइट कोर्सचा कालावधी ६ महिन्यांपासून ते एका वर्षांपर्यंत असतो. काही फास्ट सर्टिफाइट कोर्स ३ महिन्यात संपतात. यामध्ये Air Hostess training, Cabin Crew/Flight Attendant, Flight Purser, Aviation Management and Hospitality असे काही कोर्स पूर्ण करुन एअर हॉस्टेसची नोकरी मिळवता येते.

२. डिप्लोमा कोर्स – बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस डिप्लोमा कोर्स करता येतो. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर इच्छुक उमेदवार पीजी डिप्लोमा कोर्स करु शकतात. प्रत्येक शैक्षणिक संस्था त्यांच्यानुसार डिप्लोमा कोर्सबाबत निर्णय घेत असतात. संस्थेनुसार डिप्लोमा कोर्सच्या कालावधीमध्ये बदल होत असतात. सामान्य: डिप्लोमा कोर्स ६ ते १२ महिन्यांमध्ये संपतो. Diploma in Air Hostess training, Diploma in Cabin Crew/Flight Attendant training, Diploma in Aviation and Hospitality Management यांसारखे कोर्स करत एअरलाइन्स क्षेत्रामध्ये नोकरी करु शकता.

३. डिग्री कोर्स – एअरलाइन्स क्षेत्रामध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिग्री कोर्स खूप महत्त्वपूर्ण समजला जातो. याचा कालावधी ३ वर्षांचा असचो. काही संस्थांमध्ये २ वर्षांचे विशेष डिग्री कोर्स देखील असतात. हे कोर्स उत्तम एअर होस्टेस होण्यासाठी मदत करतात. मुलाखती दरम्यान डिग्री कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवाराला अधिक प्राधान्य दिले जाते. B.Sc. in Air Hostess training, B.Sc. Aviation, Bachelor of Hospitality and Travel Management असे काही कोर्स पूर्ण करुन एअर होस्टेस बनता येते.

एअर हॉस्टेस ट्रेनिंग करण्यासाठी –

  • व्यक्तीचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. विमानचालन (aviation) या विषयामध्ये अंडरग्रॅज्यूएट डिग्री मिळणारी व्यक्ती एअर हॉस्टेसची नोकरी करु शकते.
  • डिग्रीचे शिक्षण करण्याकरिता १७ ते २६ अशी वयाची अट आहे.
  • एअरलाइन्स क्षेत्रामध्ये ट्रेनिंग करण्यासाठी उमेदवाराची उंची किमान पाच फूट आणि दोन इंच असावी.
  • सहभागी होणारी व्यक्ती अविवाहित असावी.
  • इच्छुक उमेदवाराच्या दृष्टीमध्ये दोष असू नये.
  • उमेदवार मानसिक आणि शारीरिकरित्या निरोगी असावा.

एअर हॉस्टेसचे सर्व ठिकाणी चांगले वेतन दिले जाते. आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये काम करणाऱ्या एअर हॉस्टेसना दीड ते दोन कोटी रुपये पगार असतो. तर देशांतर्गत विमानांमध्ये कार्यरत असणाऱ्या एअर हॉस्टेस ३०,००० ते ४५,००० रुपये कमावतात.