विवेक वेलणकर
बारावीनंतर थेट एमबीए आणि तेही ‘आयआयएम’मधून करायचे असेल तर या प्रवेशासाठीची देशपातळीवरील चुरस लक्षात घेता विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींची आधीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
एमबीए करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ अर्थात ‘आयआयएम’मधून एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा असते. कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमबीए कोर्स थेट आयआयएम मधून करण्याची संधी गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध झाली आहे. देशातील नऊ आयआयएम मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.
आयआयएम इंदोर येथे २०११ पासून हा कोर्स सुरू आहे. येथील प्रवेशासाठी ‘आयपी मॅट’ नावाची परीक्षा नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी घेतली जाते. ही संगणकाधारित परीक्षा दोन तासांची असून यात क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी आणि व्हर्बल ॲबिलिटी असे दोन भाग असतात. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातात. या परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते व त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर होते. यामध्ये परीक्षेसाठी ६५% तर मुलाखतीसाठी ३५% वेटेज आहे. अधिक माहितीसाठी आयआयएम इंदोरच्या www.iimidr.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
याच आयपीमॅट परीक्षेच्या मार्कांवर विद्यार्थ्यांना अमृतसर (iimamritsar.ac.in), रांची (iimranchi.ac.in) आणि शिलाँग(iimshillong.ac.in)येथील आयआयएममध्ये थेट मुलाखतीसाठी बोलावले जाते व त्यानंतर लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या मार्कांवर अंतिम निवड केली जाते.
आयआयएम रोहतक येथे २०१९ पासून बारावीनंतरचा इंटिग्रेटेड एमबीए कोर्स सुरू झाला आहे. याच्या प्रवेशासाठी आयपी मॅट परीक्षेच्या स्कोअर घेतला जातो. अंतिम निवड करताना लेखी परीक्षेला ५५% , मुलाखतीला १५% , दहावीतील गुणांना १०% तर बारावीतील गुणांना २०% वेटेज दिले जाते. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी www.iimrohtak.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
आयआयएम बोधगया मध्ये २०२१ पासून तर आयआयएम जम्मूमध्ये २०२२ पासून बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एमबीए कोर्स सुरू झाला आहे. या दोन्ही आयआयएमसाठी एनटीए मार्फत JIPMAT नावाची प्रवेश परीक्षा घेतली जात असून ती दोन तासांची असते. यात तीन सेक्शन असतात. पहिल्या सेक्शन मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍबिलिटी वर बहुपर्यायी प्रश्न असतात तर दुसर्या भागात लाॅजिकल रिझनिंग वर बहुपर्यायी प्रश्न असतात. तिसऱ्या भागात व्हर्बल ऍबिलिटी वर बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतिम निवड होते. या कोर्सच्या व प्रवेश परीक्षेच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.iimbg.ac.in आणि www.iimj.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
आयआयएम सिरमौर या संस्थेमध्ये बारावीनंतर चार वर्षांचा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात किमान आठ सीजीपीए मिळवणारे विद्यार्थी संस्थेच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या थेट प्रवेशासाठी पात्र होतात. या संस्थेच्या प्रवेशासाठी आयपी मॅट परीक्षेचेच गुण ग्राह्य धरले जातात. अंतिम निवडीमध्ये या परीक्षेतील गुणांना ५५% , मुलाखतीला २०% , दहावी / बारावीच्या गुणांना ५% तर महिलांना ५% वेटेज दिले जाते. अधिक माहितीसाठी www.iimsirmaur.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या वर्षीपासून आयआयएम कोझिकोडेने बारावीनंतर चार वर्षांचा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा कोर्स सुरू केला आहे. प्रवेशासाठी संस्था स्वतःची ॲप्टिट्यूड टेस्ट घेते. यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी आणि व्हर्बल ॲबिलिटी असे दोन भाग असतात. जेईई मेन परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतून सूट आहे. अंतिम निवडीसाठी शैक्षणिक कामगिरी , प्रवेश परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल.अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.iimk.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
एकूणातच बारावीनंतर थेट एमबीए आणि तेही आयआयएम मधून करायचे असेल तर या प्रवेशासाठीची देशपातळीवरील चुरस लक्षात घेता विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींची आधीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे. विशेषत: क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, रीझनिंग ॲबिलिटी आणि व्हर्बल ॲबिलिटी या विषयांचे भरपूर पेपर सोडवणं गरजेचं आहे. या सर्व आयआयएममधून पाच वर्षांच्या एमबीए अभ्यासक्रमानंतर मोठ्या काॅर्पोरेटस् मध्ये उत्तम पगाराच्या करिअरची संधी मिळतेच पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञानही पुरेपूर दिले जाते.