आशुतोष शिर्के
गेल्या वर्षापासून कॅनडाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घातली आणि कॅनडाचा उच्च शिक्षणासाठी विचार करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या. मात्र ही मर्यादा केवळ पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या बाबतीत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा नाही.

गेल्या वर्षी एका खलिस्तानी अतिरेक्याची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली आणि या घटनेमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर कॅनडा व भारत परस्पर संबंध काही काळासाठी बिघडले. कॅनडाच्या काही भागांमध्ये भारत विरोधी निदर्शने करण्यात आली आणि सहाजिकच त्यामुळे आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात भारतीय पालकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. या समस्येचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा झाला. व्हिजा प्रक्रिया अधिक कडक, जटिल आणि वेळखाऊ झाल्या. जे विद्यार्थी उच्च-शिक्षणानंतर तीन वर्षांचे वर्क परमिट घेऊन कॅनडामध्ये वास्तव्य करू इच्छितात आणि त्यानंतर कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी अर्ज करतात, त्या प्रक्रियेमध्येही भारत कॅनडा संबंध बिघडल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या.

जगभरातून लाखो विद्यार्थी कॅनडामधील अनेक जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये गेली अनेक वर्षे प्रवेश घेत आहेत. कॅनडा हे जगातील एक आधुनिक आणि सर्वात सुरक्षित राष्ट्रांमधील एक मानले जाते. यामुळे शिक्षणानंतर ३ वर्षांचे कामाचे परमिट देणारा आणि नंतर नागरिकत्व देऊन स्वागत करणारा हा देश सर्व जगातील विविध संस्कृतीमधून येणाऱ्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना नेहमीच खुणावत राहिला आहे. आयटी क्षेत्राबरोबरच फिजिओथेरपी आणि फॅशन क्षेत्रातील असंख्य भारतीय विद्यार्थी या देशाकडे गेली काही वर्षे आशेने पाहत आहेत.

परंतु यातूनच काही गैरप्रकार उदयाला आले. काही खासगी संस्था व काही बारिकसारिक विद्यापीठे यांनी एक प्रकारे कॅनडाचा व्हिजा आणि नंतर नागरिकत्व मिळवून देणारे छुपे कारखानेच जणू तयार केले असल्याचे कॅनडा सरकारच्या लक्षात आले. याबरोबरच प्रचंड संख्येने येणाऱ्या या विद्यार्थ्यांमुळे आणि नवीन नागरिकांमुळे कॅनडामध्ये घरे मिळणे कठीण होऊ लागले. शहरी व्यवस्थांवरचा ताण वाढू लागला आणि यातून अनेक समस्या तयार झाल्या. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षापासून कॅनडाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घातली. या दोन्ही गोष्टींमुळे कॅनडाचा उच्च शिक्षणासाठी विचार करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आणि सहाजिकच त्यांची संख्या गेल्या वर्षी चाळीस टक्यांनी कमी झाली.

मग तरीही उच्च शिक्षणासाठी कॅनडाचा विचार करावा की नाही?

याचे उत्तर अर्थातच सोपे नाही. पण परिस्थितीचा साधकबाधक विचार करून निर्णय घ्यावा हे उत्तम.

कॅनडामधील आयटी व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, फिजिओथेरपी, उद्याोग-व्यवस्थापन, आणि फॅशन तंत्रज्ञान ह्या क्षेत्रांमधील उच्च शिक्षणाचा दर्जा हा जगातील उत्तम स्तरावरचा मानला जातो. अमेरिका किंवा इंग्लंड मध्ये येणाऱ्या खर्चा पेक्षा येथे येणारा शिक्षणासाठीचा खर्च हा काही प्रमाणात कमी असतो. त्याबरोबरच अनेक क्षेत्रांमध्ये हा देश वेगाने विकसित होत असल्यामुळे नोकरीच्या संधी सुद्धा येथे आकर्षक आहेत. ही सारी कारणे अजूनही कायम आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्येवर जी मर्यादा लादली गेली आहे ती केवळ पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या बाबतीत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आजवरची शैक्षणिक कारकीर्द उत्तम आहे, अशा विद्यार्थ्यांचे आजही तिथे स्वागत होते.

● कॅनडामधील उच्च शिक्षण क्षेत्रे

माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान: तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वॉटरलू आणि यु. बी. सी विद्यापीठातील (युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया) एआय, डेटा सायन्स किंवा सायबर-सुरक्षा अभ्यासक्रम जगातील उत्तम अभ्यासक्रमांमध्ये गणले जातात. जगातील उत्तम कंपन्यांशी जोडून को-ऑप पद्धतीचे हे अभ्यासक्रम आखले असल्यामुळे व्यावहारिक अनुभव आणि नोकरीच्या उत्तम संधी मिळतात.

● अभियांत्रिकी

टोरंटो किंवा UBC येथील सिव्हिल, मेकॅनिकल किंवा पर्यावरण अभियांत्रिकी अभ्यासक्रमही महत्त्वाचे मानले जातात.

व्यवसाय आणि व्यवस्थापन: रोटमन (टोरंटो) किंवा सॉडर ( UBC) येथील एमबीए किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसाय अभ्यासक्रम भरपूर पगार मिळवून देणारे आणि नोकरीच्या उत्तम संधींसाठी प्रसिद्ध आहेत.

● फॅशन डिझायनिंग

टोरंटो किंवा मॉन्ट्रियलमधील जॉर्ज ब्राउन कॉलेज किंवा टोरंटो मेट्रोपॉलिटन विद्यापीठात फॅशन डिझाइन, मार्केटिंग किंवा टेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ५० अब्ज डॉलरच्या कॅनडाच्या फॅशन उद्याोगामध्ये मिळणार्या इंटर्नशिपमुळे हे अभ्यासक्रम लोकप्रिय आहेत. शाश्वत फॅशन हा एक नवीन पर्याय विद्यापीठांमध्ये शिकवला जातो.

● फिजिओथेरपी

UBC किंवा टोरंटो येथील मास्टर्स इन फिजिओथेरपी ( MPT) अभ्यासक्रम ह्या विषयाची भारतीय पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. कॅनडाच्या आरोग्य क्षेत्रात फिजिओथेरपिस्टची मागणी प्रचंड आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनी पुढील नवीन क्षेत्रांचाही विचार करावा

पर्यावरण विज्ञान आणि शाश्वतता: UBC किंवा वॉटरलूमधील पर्यावरण व्यवस्थापन किंवा रिन्युएबल एनर्जी अभ्यासक्रम आजच्या जागतिक समस्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपयुक्त आहेत. भारतातील पर्यावरण समस्यांसाठी हे शिक्षण उपयुक्त आहे.

● कृषी आणि वनीकरण

ग्वेल्फ किंवा UBC येथील कृषी विज्ञान किंवा शाश्वत वनीकरण अभ्यासक्रम भारतातील आधुनिक शेतीसाठी उपयुक्त ठरू शकतो.

इंटर-डिसिप्लिनरी स्टडिज: ओटावा किंवा कार्लेटन विद्यापीठांमधील पब्लिक पॉलिसी किंवा डेटा अॅनालिटिक्स हे अभ्यासक्रम तंत्रज्ञान आणि समाजशास्त्रांचा एकत्रित अभ्यास करतात. एआय मुळे तयार होणार्या नीतिशास्त्रीय समस्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणारे हे अभ्यासक्रम अनेक देशांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mentorashutosh@gmail. com