बदलत्या हवामानाशी जुळवून घेतील अशी सक्षम पिकांच्या निर्मितीसाठी मोलाचा हातभार लावणारी उत्पादने बायोप्राइम ॲग्रिसोल्युशन्स ही स्टार्टअप कंपनी तयार करते. कृषी जैवतंत्रज्ञानातील या अग्रणी स्टार्टअपकडे वनस्पतींशी संबंधित सूक्ष्मजीवांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या कंपनीविषयी सांगत आहेत कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रेणुका दिवाण...

सातत्याने बदलणाऱ्या, लहरी हवामानामुळे पिकांचे नुकसान होते. जमिनीची धूप होऊन तसेच जमिनीतील पोषक मूल्ये कमी झाल्यानेही पिकांवर परिणाम होतो. शेतकरी जी खते वापरतात त्यातील सर्व पोषक घटक पिकांना मिळत नाहीत. परिणामी मातीवरही त्याचा परिणाम होऊन ती निकृष्ट होते. पर्यावरणाचा परिणाम तर पिकांवर होतच असतो. ती कमकुवत होता. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या ध्यानात घेऊन आम्ही संशोधनाला सुरुवात केली.

प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्यूलर बायोलॉजी, प्लान्ट फिजिऑलॉजी या क्षेत्रांमधील अनेक वर्षांच्या संशोधनानंतर २०१६ मध्ये आम्ही तिघांनी ही कंपनी सुरू केली. मी, डॉ. अमित शिंदे, डॉ. शेखर भोसले अशा आम्ही तीन मित्रांनी ही कंपनी सुरू केली. पुणे विद्यापीठातून आम्ही पीएचडी केली. मी आणि डॉ. अमित शिंदे यांनी प्लान्ट बायोटेक्नॉलॉजीत पीएचडी केली आहे. डॉ. शेखर भोसले यांनी सूक्ष्म जीवाणूंच्या बायोटेक्नॉलॉजीत पीएचडी केली. डॉ. अमित शिंदे कुमार फ्लोरिस्ट या आशियातील सर्वात मोठ्या टिश्यू कल्चर कंपनीत संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. डॉ. शिंदे विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरमध्ये काम करत होते. मी पीएचडी नंतर जेनेटिक इंजिनीरिंगमध्ये पोस्ट डॉक्टरेट केले.

संशोधन असे असावे की ज्यातून लोकांना फायदा व्हावा, हे आमचे उद्दिष्ट होते. कंपनीला पहिलं भांडवल प्रूफ ऑफ कन्सेप्ट फंडिंग म्हणून केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून मिळालं. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) व्हेंचर सेंटरमधील साधनसामुग्रीव वापरता आली. उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी पुन्हा जैवतंत्रज्ञान विभाग आणि नीती आयोगाकडून निधी मिळाला.झाडांचा अर्क, सूक्ष्म जीवाणू, ते तयार करणारे रेणू (मॉलिक्यूल्स) वापरून सुमारे २५ विविध प्रकारची उत्पादनं बायोप्राइम तयार करते. बियाण्यापासून पिक हाताशी येईपर्यंत विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना या उत्पादनांचा उपयोग होतो. प्रति एकर २००-३०० रुपये प्रति ॲप्लिकेशनपासून १५०० रुपये प्रति ॲप्लिकेशनपर्यंत किंमत आहे.

बारमाही शेती होणारे नारायणगाव, नाशिक, जळगाव आदि ठिकाणी काम करतो. राज्यात तसेच राज्याबाहेर, उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणात आहेत. मोठ्या अग्री केमिकल कंपनीसोबत भागीदारीत प्रामुख्याने आम्ही व्यवसाय करत आहोत. जेणेकरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. अलिकडेच आमची इस्रायल केमिकल लिमिटेडसोबत भागीदारा झाली. यारा इंटरनॅशनल, इससेक्टिसाइड्स इंडिया, डीसीएम श्रीराम आदी कंपन्यांसोबत आमची भागीदारी आहे. आतापर्यंत आम्ही एक लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.

शेतकऱ्यांचा विश्वास

२०१६ मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे उष्णतेची तीव्र लाट होती. नारायणगावमध्ये टोमॅटोची सुमारे ९८ टक्के पिके नष्ट झाली होती. ही समस्या असतानाच आम्ही आमच्या नव्या कंपनीद्वारे नारायणगावच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांबरोबर काम करत होतो. आमचं उत्पादन तेथील १०० शेतकऱ्यांनी वापरलं. त्यांची शेती इतकी हिरवीगार दिसत होती की कोणालाही फरक सहज लक्षात यावा. त्यानंतर अन्य शेतकऱ्यांकडूनही मागणी वाढली. पुन्हा २०२३ मध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तशी ती आली. पण शेतकऱ्यांनी आमच्या उत्पादनांवर विश्वास ठेवून तीच सर्व पिके घेतली आणि विक्रमी उत्पादन केलं.

सूक्ष्मजीवांचा सर्वात मोठा संग्रह

या स्टार्टअपची संशोधन प्रयोगशाळा आणि भारतातील सर्वात मोठी १७ हजार सूभ्मजीवांची लायब्ररी पुण्यात वडगाव-बुद्रुक येथे पाच हजार चौ. फूट जागेत आहे. जवळच ग्रीनहाऊसदेखील आहे. वनस्पतींमध्ये राहणाऱ्या सूक्ष्मजीव समुदायांच्या लपलेल्या क्षमतेला उलगडणे, पीक लवचिकता, उत्पादकता आणि वनस्पती संरक्षणाकडे पाहण्याच्या पद्धतीत क्रांती घडवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पेटंट्स

आम्हाला आमच्या उत्पादनांचे तीन पेटंट्स मिळाले आहेत. आणखी सहा पेटंट्स आम्ही फाइल केले आहेत.

पुरस्कार

पिक्सीचा इनोव्हेशन पुरस्कार दोन वेळा मिळाला. सस्टेनेबिलिटीचा पुरस्कार मिळाला. ॲग्री बिझनेस पुरस्कार लागोपाठ तीन वर्षे मिळत आहेत. आणखी एक अभिमानास्पद गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे राष्ट्रपती भवनात यंदाच्या २६ जानेवारीला आम्ही निमंत्रित होतो.

व्यवसायाचे बीज रोवताना…

स्टार्टअपसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण निवडलेली समस्या मोठी असायला हवी आणि त्यातून व्यवसाय उभा करता आला पाहिजे. ती समस्या आणि त्यावर आपण शोधलेले उत्तर असे हवे की त्यासाठी लोकांची भांडवलाला हातभार लावण्याची तयारी हवी. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातून पुढे येणाऱ्या तरुणांचं असं होतं की ते टेक्नॉलॉजीवर जास्त प्रेम करतात आणि समस्येला दुय्यम प्राधान्य देतात. असे झाल्यास आपण उद्दिष्टापासून भरकटू शकतो. मी शोधलेले तंत्रज्ञान योग्य की त्या समस्येसाठी अन्य कोणाच्या संशोधनाचे सहाय्यदेखील घ्यावे याचा उहापोह टप्प्याटप्यावर करता यायला हवा. ही लवचिकता असेल तर आपल्याला स्वतःचं मूल्यांकन करता येतं. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिकाटी हवी.

(शब्दांकन : मनीषा देवणे)