रोपवाटिका व्यवसाय स्थापित करणे एक जबरदस्त उद्योग असू शकतो. आपल्याला हिरवीगार पालवीची आवड असेल आणि वनस्पती कशा वाढवायच्या, त्यांची लागवड कशी करायची याबद्दल ज्ञान असेल तर आपल्यासाठी रोपवाटिका व्यवसाय अत्यंत फायद्याचा आहे. या व्यवसायात पर्यावरण रक्षण करण्याबरोबरच निसर्गाचा विविध पद्धतीने अभ्यास करायला मिळतो.

नर्सरी उद्योगाला आज चांगले महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण शेतकरी चांगले आणि रोगमुक्त उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाणे आणि रोपे यांना प्राधान्य देत आहे याचा फायदा नवयुवक नर्सरी चालकांनाही होत आहे. सध्या पारंपरिक पद्धतीत अडकलेल्या या उद्योगाला आता नवीन तंत्रज्ञानामुळे हायटेक स्वरूप प्राप्त झाले आहे. आता या नर्सरीमधून अधिक सक्षम उत्तम गुणवत्तेची रोपे तयार केली जात आहेत.

भारतामध्ये बंगळुरू या शहरालगत नर्सरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणची रोपे पूर्ण भारतात पाठवली जातात महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे लगत खूप मोठ्या प्रमाणात नर्सरी व्यवसाय तयार झाला आहे. हेच लक्ष्य समोर ठेवून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कृषी उद्योजक व युवक यांना नर्सरी व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे

भारतातील इनडोर प्लान्टचे (घरात लावण्यायोग्य वनस्पती) मार्केट अडीच अब्ज आहे की जे २०३० पर्यंत ८.५% दराने वाढून ४ ते ५ अब्ज जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या व्यवसायात भविष्यातील दहा ते पंधरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत.

रोपवाटिका तयार करण्याचे काही प्रकार आहेत आपण ज्या परिसरात राहता तेथे कोणत्या वनस्पतींची मागणी आहे त्यानुसार आपण हे रोपवाटिका व्यवसाय व्यवस्थापन करू शकता

१) फळ झाडांची रोपवाटिका – यामध्ये आंबा, चिकू, डाळिंब यासारख्या फळझाडांची कलमे आणि रोपे तयार केली जातात.

२) भाजीपाला रोपवाटिका – यामध्ये विविध भाजीपाल्यांची रोपे तयार करणे व संगोपन करून विक्री करणे याचा समावेश होतो.

३) फुल झाडांची रोपवाटिका – यामध्ये गुलाब, जाई, शेवंती, झेंडू, सदाफुली यासारख्या फुलझाडांची रोपे तयार केली जातात.

४) औषधी व वनस्पती रोपवाटिका – यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची व सुगंधी वनस्पती लागवड व विक्री केली जाते.

५) ऑनलाइन रोपवाटिका – गेल्या दहा वर्षांमध्ये रोपवाटिका प्रकारामध्ये हा एक नवीन प्रकार समाविष्ट झाला आहे. यामध्ये वेबसाइट किंवा ॲपद्वारे रोपांची विक्री केली जाते. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या रोपे मिळतात.

रोपवाटिका सुरू करण्यासाठी काही पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्या पुढीलप्रमाणे –

१) जमीन – रोपवाटिकेसाठी आपल्याला योग्य जमीन असणे आवश्यक आहे शक्यतो ही जमीन प्रमुख शहरे किंवा राष्ट्रीय महामार्गाजवळ असावी जेणेकरून ग्राहकांना आपल्या रोपवाटिकेजवळ जलद पोहोचता येईल.

२) सिंचन व्यवस्था – पाण्याचा योग्य पुरवठा असणे गरजेचे आहे. रोपवाटिकेला सतत व स्वच्छ पाण्याची अतिशय जास्त आवश्यकता आहे.

३) मातृवक्ष लागवड -प्रामुख्याने फळबाग रोपवाटिकेसाठी याची आवश्यकता असते. विविध फळझाडांची कलमे तयार करण्यासाठी आपल्याला मातृवक्ष गरजेचे आहे.

वनस्पती नर्सरी व्यवसायासाठी काही आवश्यक कौशल्ये आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये वनस्पतींची गरज आणि वनस्पतींचा विकास समजून घेण्याची गरज आहे. तसेच खते, सिंचन, कापणी वेळापत्रक, वाढ वेळापत्रक, तापमान नियंत्रण याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. किटकांचे व रोगांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. रोपवाटिका व्यवसायामध्ये यांत्रिक कौशल्य जसे की माती मिश्रण, ग्रीन हाऊस व्हेंटिलेशन, सिंचन पद्धती याची माहिती घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव व किरकोळ विक्री या दोन्हींची विपणन कौशल्य आपल्याला आवश्यक आहे.

प्रशासकीय कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. म्हणजे ग्राहकाच्या सर्व प्रश्नांना तोंड देण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे रोपवाटिका सुरू करण्यासाठी जमीन वगळता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. यामध्ये संसाधने व हरितगृहाचा समावेश आहे. या खर्चामध्ये एक वेळची गुंतवणूक तर काही खर्चामध्ये दररोज किंवा आठवड्याला तसेच वार्षिक आधारित गुंतवणूक असू शकते. वनस्पती साहित्य पुरवठा, माती माध्यमे, सिंचन, व्यापार परवाने, विमा या बाबींचा समावेश होतो. प्रशासकीय कौशल्य असल्यास सुरुवातीच्या वर्षांमध्ये जे व्यवसायात चढउतार होतात, त्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करण्यास मदत होते.

रोपवाटिका सुरू करताना तुम्ही ज्या ठिकाणी सुरू करणार आहात त्या संभाव्य बाजारपेठेचा शोध घ्यावा. कोणती पिके घ्यावीत तसेच ते किती प्रमाणात घ्यावीत याचे सर्वेक्षण करावे. उदाहरणार्थ, तुम्ही जर शहराजवळ राहत असाल तर रोपवाटिका सुरू करताना शोभिवंत झाडांच्या रोपवाटिका सुरू केल्यास विक्री करण्यास मदत होते. तुम्ही जर ऊस क्षेत्रामध्ये राहत असाल तर ऊस रोपवाटिका करणे सोयीचे होते. रोपवाटिकेमध्ये मागणी पुरवठा दर्जा त्याचबरोबर व्यवसाय कौशल्य या बाबींचा समावेश केला तर हे क्षेत्र युवकांना शक्यता निर्माण करू शकते. या क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या युवकांना पर्यावरण रक्षणाचे सुद्धा मोलाचे समाधान मिळू शकते.