आपल्याला नेमकं काय हवं आहे याविषयीची माहिती नीटपणे पुरवून त्याखेरीज हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची रसद पुरवल्यावर ते चोखपणे पार पाडू शकणारं अत्याधुनिक सॉफ्टवेअर म्हणजे एआय एजंट. ‘क्रू एआय’ म्हणजे एकापेक्षा जास्त एआय एजंटनी एकत्र येऊन एखादं काम पूर्ण करणं अपेक्षित असतं.

विमानप्रवास करताना किंवा त्याविषयी वाचताना आपण ‘केबिन क्रू’ नावाची संज्ञा हमखास वापरली जात असल्याचं अनुभवतो. विमानचालक, सहचालक, हवाईसुंदरी, इतर साहाय्यक मंडळी या सगळ्यांच्या चमूला ‘केबिन क्रू’ म्हणतात. जसा एखाद्या खेळामध्येसुद्धा खेळाडूंचा संघ असतो आणि शिवाय त्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षक, व्यवस्थापक, वैद्यक असे लोक उपलब्ध असतात; तसंच. एकूणच कुठलंही काम नीटपणे पार पाडण्यासाठी अनेक कौशल्यं असलेल्या लोकांची एकत्र फौजच जणू उभी करावी; तसाच प्रकार आता एआय एजंटच्या विश्वातही रुजतो आहे. मानवी उदाहरणं आणि एआय यांच्यामधला या संदर्भातला महत्त्वाचा फरक म्हणजे इथे एआय एजंट्सचीच फौज उभी केली जाते. याला ‘क्रू एआय’ असं म्हणतात. म्हणजेच एकापेक्षा जास्त एआय एजंटनी एकत्र येऊन एखादं काम पूर्ण करणं अपेक्षित असतं.

आपल्याला नेमकं काय हवं आहे याविषयीची माहिती नीटपणे पुरवून त्याखेरीज हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची रसद पुरवल्यावर ते चोखपणे पार पाडू शकणारं अत्याधुनिक सॉफ्टवेअर म्हणजे एआय एजंट. हा एजंट जवळपास पूर्णपणे स्वयंभू असल्यासारखा काम करू शकतो. त्याला आपण निर्णय घेण्याची मुभा दिलेली असेल तर तो स्वत: निर्णयसुद्धा घेऊ शकतो. उदाहरणार्थ जर आपण त्याला ‘हे दोन शोधनिबंध वाच आणि मुद्देसूदपणा, विषयाची खोली, संशोधनाशी संबंधित असलेल्या गोष्टींवर दिलेला भर या निकषांच्या आधारे कुठला जास्त आहे हे मला कारणांनिशी सांग’ असं म्हटलं आणि ते दोन शोधनिबंध पुरवले तर जणू एखाद्या निष्णात तज्ज्ञानं ते वाचावेत आणि आपल्याला उत्तर द्यावं तसं उत्तर एआय एजंट देऊ शकतो. आधी म्हटल्याप्रमाणे हे काम करण्यासाठी आपण त्याला जितका नेमका आणि परिपूर्ण ‘प्रॉम्प्ट’ देऊ, तितकं त्याचं उत्तर अचूक ठरेल.

याची पुढची पायरी म्हणजे अशा प्रकारे एका एआय एजंटकडून काम करून घेण्याऐवजी समजा आपण एकापेक्षा जास्त एजंटना एकाच वेळी कामाला लावू शकलो तर? समजा आपल्या कंपनीला एका नव्या उत्पादनाविषयीचा निर्णय घ्यायचा आहे. अशा वेळी आपण पहिल्या एजंटला अशा प्रकारच्या उत्पादनाची बाजारात गरज आहे का, हे शोधायला सांगू शकतो. दुसरा एजंट त्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्या कुठल्या आहेत आणि त्यांची कोणती उत्पादनं आहेत, ही माहिती काढू शकतो. तिसरा एजंट आपण हे उत्पादन खरोखरच तयार करायचं ठरवलं तर त्याची किंमत साधारण किती असावी, हे आपल्याला सांगू शकतो. चौथा एजंट लोकांना आकर्षू शकेल यासाठी त्याचं नाव नेमकं काय ठेवावं याविषयी संशोधन करू शकतो. हे सगळे एजंट एकाच वेळी आपलं काम सुरू करतील अशी सूचना आपण पाचव्या एजंटला देऊ शकतो. पहिल्या चार एजंटचं काम पूर्ण झाल्यावर हा पाचवा एजंट त्या सगळ्यांच्या कामाची तपासणी करेल, त्यामधली नेमकी मुद्देसूद माहिती एकत्र करेल आणि आपल्यासमोर फक्त पानभराचा ऐवज आपल्याला हव्या अशा स्वरूपात सादर करेल असं आपण ठरवू शकतो. पाचव्या एजंटनं जणू एक प्रकारे इतर सगळ्या एजंटच्या कामांचा अहवालच तयार करावा, अशी आपली अपेक्षा असेल. हे सगळं झाल्यावर सहावा एजंट या पाचव्या एजंटच्या अहवालावर एक नजर टाकेल आणि आपण सांगू त्या निकषांनुसार त्याची काटेकोरपणे छाननी करेल. त्यानुसार तो आपल्याला अंतिम अहवाल देईल.

अशा प्रकारे एकाच वेळी अनेक एजंटना कामाला लावून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीला एकत्र करणं, तिचं विश्लेषण करणं, तिला नेमका आकार देणं या सगळ्या अद्भुत प्रकारालाच ‘क्रू एआय’ म्हणतात. हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट पडू नयेत यासाठी ‘क्रू एआय’चं तंत्रज्ञान अगदी सुलभपणे आपल्याला असे एजंट तयार करून देऊ शकतं. हे तंत्रज्ञान ‘ओपन सोर्स’ असल्यामुळे आपण एकही पैसा खर्च न करता ते वापरू शकतो. त्याची ओळख करून घ्यायची असेल तर आपण इंटरनेटवर ‘क्रू एआय’ असं इंग्रजीत शोधावं. एआय एजंटची फौज उभी करून त्यांच्याकडून कष्टदायी कामं चुटकीसरशी करून घेण्यासाठीचा हा चित्तथरारक प्रकार आहे!

akahate@gmail.com