गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील माहिती व संपर्क तंत्रज्ञान या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून या उपघटकासाठी अपेक्षित मुद्दे आणि त्यांची तयारी कशी करावी ते पाहू.

अपेक्षित अभ्यासक्रम

संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅक्सेसरीज

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर,

डाटा कम्युनिकेशन नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी – वायर्ड/ वायरलेस. इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/ डायनमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग

नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान- क्लाऊड कंप्युंटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन

इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आभासी वास्तव/ संवर्धित वास्तव (व्हीआर/ एआर) मेसेजिग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निंग (एआय/ एमएल)

नवीन उद्याोग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग,

भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्याोगाची वाढ व त्याचा दर्जा

माहिती तंत्रज्ञान उद्याोगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य

शासकीय पुढाकार – मीडिया लॅब एशिया, डिजिटल इंडिया विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी

सुरक्षा – नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक, सायबर कायदा, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध,

प्रत्यक्ष तयारी

संगणकाचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅक्सेसरीज आणि संगणकाची भूमिका हे मुद्दे अगदी मूलभूत स्वरुपाचे आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये त्यांचा उल्लेख नाही. तरीही या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेणे व्यवहार्य ठरेल.

संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅक्सेसरीज यांचे प्रकार, स्वरूप, उपयोजन यांचा आढावा घ्यावा.

माहिती साठविणे व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीची उपकरणे, नियमावली, त्यांचे प्रकार, उपयोग माहीत करून घ्यावेत.

व्हायरसचे प्रकार व याबाबतच्या चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.

वैद्याकीय, कृषी, प्रशासन, बँकिंग अशा विविध क्षेत्रामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचा होणारा उपयोग समजून घ्यावा. यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये संगणकीकरणाचा उपयोग आणि माहिती तंत्रज्ञानामुळे त्यांचा वापर करण्यामध्ये वाढलेली परिणामकारकता अशा अनुषंगाने हा मुद्दा पहावा. विविध क्षेत्रातील नवी संशोधने व उपकरणे यांची अद्यायावत माहिती असावी.

कम्युनिकेशन नेटवर्किंग, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/ डायनमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग या संकल्पना समजून घेऊन त्यांचे उपयोजन कशा प्रकारे व कोणत्या क्षेत्रांमध्ये केले जाते ते समजून घ्यावे.

डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी या मुद्द्यांमध्ये माहितीचे संप्रेषण/ प्रसारण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती तसेच संप्रेषणाच्या विस्तार, माध्यम व गतीच्या आधारे त्याचे प्रकार समजून घ्यावेत.

नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान- क्लाऊड कंप्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन इत्यादींमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्यांचा वापर होणारी क्षेत्रे, त्यांचे फायदे तोटे, त्यांबाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज, आभासी वास्तव/ संवर्धित वास्तव, मेसेजिग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निंग या बाबींचा विविध क्षेत्रातील वापर आणि त्याबाबतच्या समस्या, कारणे, उपाय समजून घ्यावेत. या सर्व मुद्यांमागील मूलभूत तंत्रज्ञान समजून घ्यावे.

नेटवर्क आणि माहिती सुरक्षेसाठीच्या फारेन्सिक, सायबर कायदा इत्यादींमधील महत्वाच्या तरतूदी, त्यांतील महत्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, सायबर गुन्ह्याचे स्वरुप, प्रकार व त्यांच्या सायबर कायद्यातील व्याख्या आणि शिक्षा इत्यादींचा अभ्यास मूळ कायदा वाचून करायला हवा. तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे कायदेशीर प्रयत्न सुद्धा कायद्याच्या मुळ दस्तावेजातून समजून घ्यावेत.

भारतातील माहिती त्तंत्रज्ञान उद्याोगाची वाढ व त्याचा दर्जा हा मुद्दा पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावा – शासनाची धोरणे, संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातील व विस्तारातील ठळक टप्पे, माहिती तंत्रज्ञान पार्क इत्यादी संकल्पना.

माहिती तंत्रज्ञान उद्याोगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य हा मुद्दा माहितीची सुरक्षितता, खासगीपणा, पायाभूत सुविधांवरील खर्च, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता अशा ढोबळ मुद्द्यांसहीत जास्तीत जास्त आयामांच्या आधारे बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र या शासकीय उपक्रमांवर भर देऊन शासनाच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राआधारे सुरू करण्यात आलेल्या जास्तीत जास्त उपक्रमांचा आढावा घ्यायवा. यामध्ये उपक्रमाचे नाव, सुरू करणारा विभाग, उद्देश, स्वरूप, त्यातील माहिती तंत्रज्ञानाची भूमिका, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष हे मुद्दे समजून घ्यावेत.