डॉ. श्रीराम गीत

बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षांच्या संदर्भात गेल्या दहा वर्षांत खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत. मोठय़ा मोठय़ा आकांक्षा, स्वप्ने पाहणाऱ्या मुलांना या परीक्षा दुय्यम वाटत राहतात. मुलांच्या या कल्पनांना पालकांकडून सातत्याने खतपाणीच मिळत राहते. या गैरसमजांची एक यादीच बनवायचे झाली तर आज फक्त सायन्सचा विचार करूयात.

1 )सायन्स घेतलेल्या मुलांचा जेईई, सीईटी, नीट या परीक्षेतील मार्कापुरताच संबंध असतो. बारावीची परीक्षा ही नावापुरतीच राहते. पहिल्या दिवसापासून या प्रवेश परीक्षांचा अभ्यास नीट करणे जास्त महत्त्वाचे असून बारावी परीक्षा काय हसत खेळत संपून जाते.

2) दहावीला ९० टक्के मार्क होते. याचा अर्थ मुलगा खूप हुशार आहे. अकरावीच्या मार्काचा फारसा संबंध नसल्यामुळे ते कसेही असले तरी आपली मुले नक्कीच प्रवेश परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवतील. हा एक सर्व पालकात पसरलेला दूरगामी भ्रम वाढतच चालला आहे.

3) टायअप किंवा इंटिग्रेटेड या नावाने लावलेला क्लास महत्त्वाचा. तर कॉलेजची उपस्थिती नगण्य अशा स्वरुपाची डमी कॉलेज निर्माण झालेली आहेत. इथे सहा महिन्यात अकरावीचा अभ्यास करून घेऊन सातआठ महिन्यात बारावीपण संपवली जाते. नंतर चालतो तो फक्त प्रवेश परीक्षांसाठीचा एमसीक्यू सोडवण्यासाठी शिकवला जाण्याचा उपक्रम.

4) दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या चाचणीमध्ये मिळणारे मार्क किती? या एमसीक्यूची तयारी कशी यातच सारे घर अडकलेले असते.

निकालाचा धक्का

या साऱ्या संदर्भात खरा भ्रमाचा भोपळा फुटतो तो म्हणजे ‘सीईटी’, ‘जेईई’ किंवा ‘नीट’चा निकाल लागतो तेव्हा. सरासरीने गेल्या पाच वर्षांचे निकाल काय सांगतात त्याची फक्त आकडेवारी वाचकांसाठी समोर ठेवत आहे. इयत्ता दहावीला ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवलेली सर्व प्रकारच्या बोर्डाची किमान एक लाख मुले संपूर्ण महाराष्ट्रात असतात. यातील जेमतेम दहा टक्के विद्यार्थी ‘सीईटी’मध्ये पन्नास टक्के, ‘नीट’मध्ये चाळीस टक्के, तर ‘जेईई’मध्ये तीस टक्के मार्क मिळवण्यात यशस्वी होतात. ‘सीईटी’त हा आकडा २०० पैकी १०० येतो. तर नीट मध्ये ७२० पैकी २८० असतो. ‘जेईई’मध्ये ३०० पैकी ९० राहातो.

हा निकालाचा धक्का पचवणारे पालक व विद्यार्थी शोधावे लागतात इतका तो मोठा असतो. पण जेव्हा इयत्ता बारावीचा निकाल लागतो त्या वेळेला फिजिक्स, केमिस्ट्री ,मॅथेमॅटिक्स, व बायोलॉजी यांचे विषयवारी मार्क व त्यांची बेरीज केली तर वर उल्लेख केलेल्या मार्काचा सहज संदर्भ लागत जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावीच्या शास्त्र विषयात मिळालेले मार्क हे या प्रवेश परीक्षेत मिळालेल्या मार्काशी सहसा जुळणारेच असतात हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. याचाच सोपा अर्थ म्हणजे अकरावी आणि बारावीच्या परीक्षेचा अभ्यास मन लावून करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दोनही परीक्षेत ज्यांना ८५ पेक्षा जास्त मार्क प्रत्येक विषयात मिळतात ते ‘स्पर्धेमध्ये’ यशस्वी होतात. जे ७५ लाच अडकतात त्यांना स्पर्धेतून कशीबशी इंजिनीअरिंगसाठी जागा मिळते. मेडिकल हातचे सहसा सुटलेले असते. पण फिजियोथेरपी सारख्या पॅरामेडिकल वर समाधान मानण्याची वेळ येते. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क ६० च्या आसपासच रेंगाळतात त्यांना कुठेतरी, कोणत्यातरी शाखेत, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश नक्की मिळतो एवढेच समाधान मानावे लागते. बारावी परीक्षेचा अभ्यास वेगळा असतो, ती परीक्षा महत्त्वाची नसते या ऐवजी हा अभ्यास सखोलपणे करणारा विद्यार्थी प्रवेश परीक्षेतील एमसीक्यूची उत्तरे सहज सोडू शकतो एवढाच बोध घेणे ही विद्यार्थी व पालकांची गरज आहे. यंदा अकरावीत असलेल्या पालकांनी हा लेख वाचला तर त्यांना नक्कीच उपयोगी पडेल. त्यांची मुले स्पर्धेसाठी छान तयार होतील. यंदा बारावीला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. कॉमर्स बारावीची माहिती पुढील लेखात.