एखाद्यास हृदयविकाराचा तीव्र झटका आला तर त्याचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर हृदयावर विद्युत प्रवाह सोडून ते पुन्हा धडधडते करतात. हा अखेरचा प्रयत्न अनेकांचा जीव वाचवतो. या उपकरणाला ‘डिफिब्रिलेटर’ म्हणतात. पण ग्रामीण भागात, रुग्णवाहिकेत वीजेअभावी हे उपकरण निरुपयोगी ठरू शकते. अशावेळी ‘जीवट्रॉनिक्स’ या कंपनीचा नाविन्यपूर्ण शोध रुग्णांसाठी जीवरक्षकाप्रमाणे धावून येतो. कंपनीचे सहसंस्थापक आशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे यांनी या उपकरणाचे फायदे आणि कंपनी उभारण्याचा अनुभव शब्दबद्ध केला आहे…
आम्ही पुण्याच्या एच.एस. स्कूलचे विद्यार्थी. पाचवीपासून एकत्र आहोत. फक्त अकरावी, बारावी आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकलो. पुढे पुण्यातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. नंतर मी दीड वर्षे टाटा मोटर्समध्ये काम केले तर अनिरुद्धने सनग्रेसमध्ये नोकरी केली. नंतर आम्ही दोघेही अमेरिकेत फोर्ड कंपनीत लागलो. मी तेथे काम करता करता अभियांत्रिकी (क्वीन्सस्टेटमधून) आणि एमबीए (युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून) अशा दोन्ही मास्टर्स डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मनःशक्ती केंद्रातून प्रेरणा
आम्ही दोघेही पालकांसोबत लोणावळा येथील मन:शक्ती केंद्रात जायचो. लहानपणापासूनच आम्हाला वाटायचं की देशासाठी काहीतरी करावं. मनःशक्ती केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांची शिकवण अशी होती की तुम्ही तुमच्या उदरभरणासाठी काहीही करा, पण निदान एक तास समाजाची सेवा करा. आम्हाला प्रश्न पडायचा की फोर्डमध्ये आपण कार डिझाइन करत आहोत, त्याचा सामान्य लोकांना काय उपयोग? आपली अभियांत्रिकी कौशल्ये वापरून काय करता येईल, याचा आम्ही सतत विचार करायचो. आम्ही एमबीए करत असताना आम्हाला मॅनेजमेंट गुरु सी. के. प्रल्हाद शिकवायला आले होते. त्यातील दोन केस स्टडीज आम्हाला भावल्या. अरविंद आय ह़ॉस्पिटल नाममात्र दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात, शिवाय रुग्णालयाचा दर्जा जागतिक दर्जाच्या रुग्णालयांप्रमाणे आहे. दुसरं उदाहरण होते जयपूर फूटचे. जे भारतीय रुग्णांना येथील रस्ते, खडबडीत पृष्ठभाग आदि स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृत्रिम पाय बनवतात. मग आम्ही निर्णय पक्का केला. लोकांसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा असे काहीतरी तयार करायचे.
जीवट्रॉनिक्सचा जन्म
आम्ही नोकरी सोडली. भारतात येऊन पहिल्यांदा आम्ही ह्युमन पॉवर जनरेटर फॉर लाइटिंग तयार केले. ते जिमच्या सायकलसारखे दिसायचे. पण त्यावर दहा मिनिटे पेडल मारले की दहा तास वीज मिळायची. नंतर आम्ही सौरदिवे तयार केले. ह्युमन पॉवर जनरेटर तयार करण्याच्या आमच्या कौशल्याचा वापर करून डिफिब्रिलेटर तयार कराल का अशी विचारणा आम्हाला झाली. ग्रामीण भारतात लोडशेडिंग असते, अजूनही वीजपुरवठा अखंड नसतो. मग हे डिफिब्रिलेटर आम्ही जानेवारी २०१४ मध्ये तयार केले. जीवट्रॉनिक्स ही कंपनी सुरू केली. पुण्याच्या ‘व्हेंचर सेंटर’ने आम्हाला खूप मदत केली. आयकेपी नॉलेज पार्क, हैदराबादनेही मदत केली आणि आम्हाला फंडिंग दिलं. कोणाला अचानक कार्डिएक अरेस्ट आला तर त्याचा जीव वाचविण्यासाठी जो हाय व्होल्टेजचा शॉक द्यावा लागतो, त्यासाठी वीज नसतानाही हे डिफिब्रिलेटर काम करते.
रुग्णालयांमध्ये बॅटरीवर डिफिब्रिलेटर काम करते. पण त्यासाठी बॅटरी चार्ज्ड असाव्या लागतात. वापर नसेल तरी ते खराब होतात. विजेवर ते चालतात पण त्यासाठी वीज असावी लागते. अशा वेळी आमचा डिफिब्रिलेटर काम करतो. हा डिफिब्रिलेटर हाताने फिरवून ५ ते १० सेकंदात चार्ज होतात आणि २०० ज्यूल्सचा शॉक देता येतो.
लोकबिरादरी ते इस्रो…
हेमलकसात लोकबिरादरी प्रकल्पात डॉ. प्रकाश आमटे, अमरावतीतील मेळघाटातील महान ट्रस्टचे डॉ. आशिष सातव यांच्याकडे आमचे हे डिफिब्रिलेटर वापरले जातात. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने आमचे चार मशीन्स घेतले आहेत. इस्रोच्या रॉकेट वैज्ञानिकांनी तर आमचा चार तास इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या रुग्णालयासाठी अशी चार उपकरणे त्यांनी घेतली. त्यांना आम्ही ट्रिपल पॉवर्ड यंत्रे दिली आहेत. त्यात आम्ही दीर्घकाळ चालणारी जापनीज बॅटरीपण देतो, हँड रोटेटेड जनरेटरही आहे आणि प्लगच्या सहाय्याने पण ते यंत्र सुरू होते.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत एम्स नागपूरने देखील आमचे यंत्र वापरून खूप जीव वाचवले आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातही आमचे उपकरण आहे. त्यांच्याकडे खूप अपघातग्रस्त रुग्ण येतात. आमचं उपकरण दिल्या दिल्या पहिल्या महिन्यातच त्यांनी तीन जणांचे जीव आमच्या उपकरणामुळे वाचवले. आतापर्यंत आमची साधारण साडेपाचशे उपकरणे भारतभर पसरलेली आहेत आणि एक हजारांहून अधिक रुग्णांचे जीव वाचले आहेत.
सव्वा लाख ते पावणेदोन लाखांच्या मध्ये याची वेगवेगळी किंमत आहे. आमच्या मशीनला बॅटरीच लागत नसल्याने रुग्णालयांना हे उपकरण परवडते.
कंपनीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा हायर सोशल इम्पॅक्टचा स्टार्टअप पुरस्कार २०२३, पुणे इंटरनॅशनल सेंटरचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
समतेसाठी तंत्रज्ञान
स्वामी विज्ञानंद मनःशक्ती केंद्राचे त्यांनी पर्पज ऑफ युनिव्हर्स हे पुस्तक १९६१ मध्ये लिहिले आहे. त्यात ते लिहितात की विश्वाचा हेतू समता आहे. म्हणून समतेसाठी काम करा. स्वामींच्या विचारातून प्रेरणा घेत आम्ही आमच्या कंपनीचं ब्रीद ठेवले आहे की समतेसाठी तंत्रज्ञान. या भूमिकेतून आम्ही इनोव्हेशन्स करतो.
आमचा एक रुग्णवाहिकेतील डिफिब्रिलेटर भारतात केवळ आमचीच कंपनी बनवते. हा डिफिब्रिलेटर रस्ते, खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला बसणारे हादरे सोसते, हा डिफिब्रिलेटर उंचावरून फरशीवर आदळला तरी तुटत नाही, कोणत्याही तापमानात काम करतो. अशा पद्धतीने एखादे उत्पादन विकसित करताना सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो. या प्रक्रियेत आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. शिवाय कोणत्याही उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचा अभ्यास हवाच. नवतंत्रज्ञानाचा ध्यास घेताना समाजाचा हिताचा विचारही करावा, असे आम्हाला वाटते.
(शब्दांकन : मनीषा देवणे)