वाद्यांचे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ ताल वाद्य (तबला, ढोल, ढोलकी, मृदंग इत्यादी), तंतू वाद्य (सितार, वीणा , गिटार इत्यादी) , हवा फुंकून नाद निर्माण करणारी वाद्ये – उदाहरणार्थ- बासरी, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बिगुल, शहनाई इत्यादी , कि-बोर्ड असणारी वाद्ये उदाहरणार्थ हार्मोनियम, पियानो, अकॉर्डियन, सिंथेसायझर, जलतरंग इत्यादी. या विविध वाद्य प्रकारांची माहिती आणि त्यातला फरक माहित असला पाहिजे. या प्रत्येक प्रकारच्या वाद्यांमधून नाद किंवा ताल कसा निर्माण होतो हे माहीत असले पाहिजे. भारतीय शास्त्रीय संगीत, भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असणारे लोक संगीत, पाश्चात्य संगीत, पाश्च्यात्य लोक संगीत या सर्व प्रकारांमध्ये वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण वाद्य वाजवली जातात. त्याचीही थोडी फार माहिती असली पाहिजे. तुम्ही जर वाद्य वाजवायला शिकला असाल तर त्या संबंधीत त्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिक, लंडन किंवा इतर कोणत्या परीक्षा उत्तीर्ण झालात का? तुमचे गुरू कोण आहेत? वाद्य वाजविण्याचा सराव कधी आणि कितीवेळा करता?
उमेदवाराने आपल्या डीटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एखादे वाद्य ऐकण्याची किंवा वाजवण्याची आवड आहे असे लिहिले असेल तर त्या अनुषंगाने वरील प्रश्न नक्कीच विचारू शकतात. एखाद्या उमेदवाराने जर लिहिले असेल की सितार वाजवण्याची आवड आहे. मग यात सितार कोणकोणत्या प्रकारच्या असतात, सितार आणि वीणा यात काय फरक आहे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पंडित रवी शंकर ह्यांचे सितार क्षेत्रातले योगदान काय आहे? अनुष्का शंकर, रिषभ रिखी राम शर्मा या तरुण कलाकारांनी सितार वादन अधिक लोकप्रिय केले आहे असे तुम्हाला वाटते का? सितार हा उच्चार योग्य आहे की सतार? विलायतखान आणि रवी शंकर शैलीच्या सितार असे सितारचे प्रकार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? गिटार वाजवायची आवड असेल तर अकोस्टिक गिटार आणि इलेक्ट्रिकल गिटार यातली कुठची गिटार तुम्हाला वाजवायला आवडते अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ऐकू येणाऱ्या नादामध्ये अकोस्टिक आणि इलेक्ट्रिकल गिटार मध्ये काही फरक आहे का? अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये यूकोलेले हे वाद्य लोकप्रिय झालेले दिसते. यूकुलेले आणि गिटार मध्ये काय फरक आहे? गिटार सारखेच बेस हे वाद्य आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? व्हायोलिन आणि चेलो यात काय फरक आहे? मोझार्टचे नाव कशाशी निगडित आहे?
वाद्याची रचना
वाद्य कुठचेही असो त्याची मूळ रचना उमेदवाराला माहिती असली पाहिजे. गिटार असेल तर त्यात कॉर्डस किती असतात. तबला असेल तर तबला आणि डग्गा यात काय फरक आहे, ते बनवण्यासाठी कुठच्या कातड्याचा वापर केला जातो. सितार कशापासून बनवली जाते. बासरी सारख्या वाद्यांसाठी कुठच्या प्रकारच्या बांबूचा वापर केला जातो. प्रत्येक वाद्याची एक तांत्रिक भाषा असते. उदाहरणार्थ तबला असेल तर ताल असतो, हार्मोनियम मध्ये स्केल्स असतात. उमेदवार जर ते वाद्य स्वतः वाजवत असेल तर त्याला ही भाषा व्यवस्थित माहीत असतेच. पण त्याबद्दल व्यवस्थित माहिती व्यक्तिमत्त्व चाचणीपूर्वी करून घ्यावी.
कलाकार
जे वाद्य वाजवायची किंवा ऐकायची आवड असेल ते वाद्य वाजवणाऱ्या महत्त्वाच्या कलाकारांची माहिती असली पाहिजे. आपल्याला आवडणारा जो कलाकार आहे तो आपल्याला का आवडतो हेही सांगता आल पाहिजे. तबला वाजवायची आवड असलेल्या उमेदवाराला उस्ताद अल्लारखाँ, पंडित झाकीर हुसेन, त्यांचे बंधू तौफिक कुरेशी, पंडित सुरेश तळवलकर, पंडित अनिष प्रधान अशा अनेक प्रसिद्ध तबला वादकांबद्दल माहिती असली पाहिजे. तबला वाजवणाऱ्याना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे एक ताल , तीन ताल म्हणजे काय? तबला, ढोलक, ढोलकी, मृदुंग, डफ, टिमकी या वाद्यांत काय फरक आहे? सितार वाजवणाऱ्या उमेदवारांना पंडित रविशंकर, उत्साद करिम खान, विलायत खान , पंडित शाहिद परवेझ, अन्नपूर्णा देवी, अनुष्का शंकर अशा महत्त्वाच्या कलाकारांबद्दल माहिती असली पाहिजे. बासरी मध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया, राकेश चौरासिया,रोणू मुझुमदार , पन्नालाल घोष यासारख्या महत्वाच्या कलाकारांची माहिती, त्यांचे या क्षेत्रातलं योगदान माहिती असलं पाहिजे. बासरीमध्ये किती छिद्रे असतात आणि पन्नालाल घोष यांनी बासरीत काय बदल केला? बासरी वाजवत असताना ध्वनीची व्युत्पत्ती कशी होते? शिव हरी या संगीतकार जोडीबद्दल काय माह
महोत्सव
भारतात अनेक प्रकारचे संगीत महोत्सव होत असतात. ह्या संगीत महोत्सवाना सांस्कृतिक क्षेत्रात खूप महत्त्व असतं. ाया महोत्सवांमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळणे ही त्या त्या कलाकारांसाठी महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट असते. असे काही ठळक संगीत महोत्सव उमेदवाराला माहिती असायला हवेत. उदाहरणार्थ, पुण्यातली सवाई गंधर्व , दिल्लीतला श्रीराम शंकरलाल म्युझिक फेस्टिवल. अलीकडच्या काळात देशातल्या अनेक शहरांमधून वेळोवेळी संगीत महोत्सव होत असतात त्याबद्दल उमेदवाराला थोडीफार माहिती असली पाहिजे. संगीत महोत्सवांमुळे संगीताबद्दल तरुण पिढीमध्ये आवड निर्माण होण्यासाठी मदत होते का अशा सारखे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. वाद्य वादन क्षेत्रात देश विदेशात वेगवेगळे पुरस्कारही दिले जातात त्या विषयी उमेदवारांना माहिती असणे गरजेचे आहे.
आम्ही वर जे प्रश्न किंवा मुद्दे लिहिले आहेत ते जनरल स्वरूपाचे आहेत. कुठच्याही वाद्याच्या संदर्भात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उमेदवारांना ह्यामुळे तयारी करण्यासाठी एक निश्चित दिशा मिळेल अशी आम्हाला आशा आहे. या पुढच्या लेखात आम्ही चित्रपट पाहणे, लघु माहितीपट पाहणे, टिव्ही सिरीयल पाहणे या आवडीविषयी मुलाखतीची तयारी कशी करावी याची माहिती घेणार आहोत.
