प्रवीण निकम
उच्च शिक्षण, फेलोशिप घेत असताना आपण सतत काही प्रश्न स्वत: ला विचारायला हवेत. आजच्या लेखात आपण उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती व त्याचे महत्त्व यावर बोलूया. सध्या खूप मोठय़ा प्रमाणात मुले फेलोशिप, उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतात आणि भारताबाहेर जात आहेत. या उच्च शिक्षणामध्ये पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी करताना गुणात्मक संशोधन पद्धतीद्वारे होणारे संशोधनाचे कार्य हे विशेष आहे. अनेक भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये मोठय़ा प्रमाणात संशोधन आणि शैक्षणिक बाबींची देवाणघेवाणही होत आहे. उच्च शिक्षणाची वाटचाल करत असताना केवळ डिग्री मिळविणे हे ध्येय न ठेवता आपले ज्ञान हे संशोधनात्मक कसे घडून येईल व हे करताना आपण कशा प्रकारे विचार करायला हवा असा विचार करताना माझ्या डोळय़ासमोर हे काही मुद्दे विशेषत्वाने येतात ज्या मुद्दय़ांचा आज आपण या लेखाच्या माध्यमातून विचार करणार आहोत.
आधी तर हे समजून घेऊ या की शैक्षणिक संशोधन म्हणजे नक्की काय? तर याबाबत अनेकांनी व्याख्या करून ठेवल्या आहेत. आपण त्यातील काही ठळक बघूया.
१९८० मधील इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ एज्युकेशन या ग्रंथानुसार ‘सर्वसामान्य मानव्य शाखा व सामाजिक शास्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींचा वापर करून वेगवेगळय़ा शाखांमधील शिक्षणसिद्धांतांच्या संदर्भात, अन्वेषणाद्वारे करण्यात येणाऱ्या शैक्षणिक पद्धती व प्रक्रिया यांच्या अभ्यासाला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात’.
१९७३ मध्ये डिक्शनरी ऑफ एज्युकेशन या ग्रंथानुसार ‘शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन असे म्हणतात’.
मौली यांनी १९५८ मध्ये केलेल्या व्याख्येनुसार, ‘शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक असलेले तथ्य व सबंध यांचा शोध घेण्यासाठी हाती घ्यावयाच्या कृतीची मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय’.
या शैक्षणिक संशोधनाच्या काही पायऱ्या आहेत. त्या थोडक्यात समजून घेऊ.
विषयाची निवड – आपले दैनंदिन जीवन जगत असताना विविध प्रश्न व समस्यांनी चक्रावून जायला होते. आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा व त्यातून मार्ग शोधण्याची आवश्यकता असते. यातही प्रत्येक घटक व उपघटक महत्त्वाचा असतो. त्यामुळे पीएच.डी पदवी अभ्यासक्रमाचा विचार करता याच समस्यांवर आधारित आपल्याला हव्या त्या विषयाची निवड करता येते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य व संशोधन लेखन पूर्ण करण्यासाठी सेमिस्टर पॅटर्ननुसार विद्यापीठाच्या विषय निवड यादीनुसार विविध विषयाची निवड करावी लागते. त्यावर आधारित संशोधन लेख प्रसिद्ध करायला लागतो.
जागतिक स्तरावरील मार्गदर्शन – संशोधन विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्या विषयाशी संबंधित अशा विद्यापीठांना व त्या विषयातील तज्ज्ञांना भेटणे, इथल्या ग्रंथालयांना भेटी देणे, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व परिसंवादात भाग घेणे तुमच्या संशोधन कार्याला अधिक चालना मिळते. आपल्या संशोधन विषयावर आधारित मार्गदर्शक वेळोवेळी मार्गदर्शन करतातच. परंतु नवीन विषय मांडणीपासून ते समाजाला आकार देणारे धोरण ठरवण्यापर्यंत आपल्या ज्ञानाची निर्मिती आणि प्रभाव याविषयी विविध स्रोत त्याची माहिती घ्यायला हवी. आपण ज्या कोणत्या विषयावर संशोधन करण्याचा विचार करत आहोत त्या विषयाशी संबंधित भारतासह जगभरातील इतर संशोधन, मार्गदर्शक मुद्दे याची अधिकाधिक माहिती करून घ्यायला हवी.
वेगळेपणा – आपण जो विषय संशोधनासाठी निवडला आहे त्याचे महत्त्व तेव्हाच विधीत होणार आहे जेव्हा आपण त्याचे वेगळेपण सिद्ध करू शकू. आपल्या संशोधनातून शैक्षणिक ज्ञानात भर पडते आहे का? संशोधनाच्या साहाय्याने शिक्षण क्षेत्रातील काही तथ्यांमधील सत्याचा शोध घेणे शक्य आहे का? अस्तित्वात असलेल्या जुन्या संकल्पनांचा संशोधनाच्या साहाय्याने नवा अर्थ शोधता येत आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे जे तुम्हाला तुमच्या संशोधनातून शोधता आली तरी तुमचे संशोधन वेगळे ठरेल यासाठी तुम्हाला थोडा ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करावा लागेल एवढं निश्चित.
समवयस्क गट – उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक संशोधन प्रक्रियेत संशोधकाला आपल्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी व आपली संशोधन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी माहिती प्राप्त करावी लागते ती म्हणजे व्यक्ती किंवा शैक्षणिक संस्था यांच्याकडून म्हणजेच ज्यांच्याकडून माहिती मिळवली जाते. यातही महाविद्यालयांचे प्रतिनिधी त्यांच्या व्यापक समवयस्क गट आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय संरचनेमध्ये द्वि-मार्गी दुवा म्हणून काम करतात. अशा विविध स्रोतांच्या आधारे तुम्ही तुमचे शिक्षणातील संशोधन कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकता.
संशोधन अहवाल लेखन, संशोधन
लेख – संशोधन अभ्यासाचा संशोधन अहवाल लेखन हा एक प्रमुख घटक आहे. त्यामुळे ते लेखन अगदी चपखल गृहीतक, उत्तम प्रकारे डिझाइन केलेले आणि आयोजित केलेला संशोधन अभ्यास, आणि सर्वात उल्लेखनीय सामान्यीकरण आणि निष्कर्ष जोपर्यंत ते इतरांना प्रभावीपणे संप्रेषित केले जात नाहीत तोपर्यंत फारसे मूल्य नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना विषय संशोधनाचा उद्देश इतरांना कळल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासाठी संशोधन अभ्यासाची शेवटची पायरी म्हणजे अहवाल लेखन, संशोधन लेखन आणि त्यासाठी कौशल्यांचा संच आवश्यक आहे. अहवाल लेखनामुळे संशोधन कार्य कसे केले, त्यासाठी कोणती संशोधन पद्धती वापरली, न्यादर्श कसा निवडला, चले कोणती, परिकल्पना, उद्दिष्टे, गृहीतके कशी मांडलेली आहेत, कोणती साधने वापरली, कार्यवाही कशी केली. ही माहिती कशा प्रकारे संकलित केली, तिचे अर्थनिर्वचन कसे केले, कोणते निष्कर्ष व शिफारशी मांडल्या याचे नोंद व सादरीकरण करावे लागते.
थोडक्यात काय तर पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी घेत असताना आपले संशोधन कार्य ही केवळ एक टिक मार्क अॅक्टिव्हिटी न करता त्यातील सर्वच बाबींचा बारकाईने विचार करून खऱ्या अर्थाने ज्ञान वृद्धिंगत करणारी व नंतर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी विचारप्रवण व कार्यप्रवण करणारी गोष्ट असणार आहे हे लक्षात असू द्या.