राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर ४ चा अभ्यासक्रम आयोगाने पुढीलप्रमाणे विहीत केला आहे
‘अर्थशास्त्र व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास’ वर वर पाहता एकमेकांशी फारसा संबंध नसलेले हे विषय एकत्र ठेवण्यामागचा आयोगाचा विचार समजून घेतला पाहिजे. या संपूर्ण पेपरचा गाभा आहे विकास हा मुद्दा. देशाच्या आणि पर्यायाने नागरिकांच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असलेली क्षेत्रे या पेपरमध्ये समाविष्ट केलेली आहेत. यातील कृषी आणि अर्थशास्त्र या उपघटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा झाली. विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये ऊर्जा स्राोत, ऊर्जा संकट, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञान या घटकांची तयारी कशी करावी ते पाहू.
पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्रोत
● जीवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्याुत शक्ती (भरती व लहरी शक्ती) तसेच सौर, पवन, समुद्रलाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत. उदा. ऊस पीक इत्यादीचे उपउत्पादने या सर्वांचे प्रकार, स्वरुप, ऊर्जा निर्मिती प्रक्रिया यांमधील वैज्ञानिक संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांचे उपयोजन आणि त्यांचे महत्त्व समजून घ्यायला हवे. ऊर्जा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे व प्रक्रिया, तंत्रज्ञान यांची मुलभूत माहिती करुन घ्यायला हवी.
● ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक द्रव गतिशास्त्र अशी क्लिष्ट परिभाषा वापरली असली तरी त्यातील बर्नूलीचे समीकरण हा मूलभूत मुद्दा धरून त्याबाबत ऊर्जा रुपांतरणाचे तत्त्व समजून घ्यायला हवे. याबाबत गणितेही विचारली जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यांचा सराव करणे आवश्यक आहे.
● सौर साधने. सौर कुकर, पाणीतापक, सौर शुष्कयंत्र इत्यादी साधनांमागची वैज्ञानिक संकल्पना, प्रक्रिया, तंत्रज्ञान यांची मुलभूत माहिती करुन घ्यावी.
भारतातील ऊर्जा संकट
● भारतातील ऊर्जा संकटाची सद्या:स्थिती समजून घेण्यासाठी ऊर्जेची गरज, वेगवेगळया क्षेत्रातील वापर, मागणी, उर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी बाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत व महाराष्ट्राच्या आर्थिक पहाणी अहवालातून पहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे. उर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा.
● ऊर्जा निर्मितीसाठीचे कार्यक्रम, शासकीय धोरणे आणि विविध योजनांचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. त्यांची उद्दिष्ट्ये, त्यासाठी विहीत कार्यपध्दती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्द्यांच्या आधारे तक्ता तयार करुन अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पैलू इत्यांदीचाही आढावा घेणे आवश्यक आहे.
● वीज वितरण व विद्याुत पुरवठा यंत्रणा – ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड सौर विद्याुत घटप्रणाली या मुद्यांचा मूलभूत वैज्ञानिक संकल्पना आणि या यंत्रणांचे स्वरूप, महत्त्व, समस्या, कारणे व उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.
● ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्थांचा अभ्यास करताना त्यांची स्थापना, उद्दिष्ट, नियंत्रक विभाग, कार्ये, मूल्यमापन असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान
● अवकाश तंत्रज्ञान या घटकाचे ह्यकालानुक्रमांवरह्ण आधारित तक्ते ब-याच संदर्भ साहित्यात सापडतात. या तक्त्यांमध्ये (टेबल्स) उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाश याने, क्षेपणास्त्रे व विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. यातून या तंत्रज्ञानाचा ‘विकास’ कसा झाला हे तुलनात्मकदृष्ट्या अभ्यासता येईल.
● अवकाश कचरा हा मुद्दा स्वरुप, घटक, त्यांचे परिणाम, त्यावरील उपाय योजना अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावा.
● कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपध्दती व त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात.
● विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करुन सामान्य अध्ययन पेपर चारमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. उमेदवारांनी विज्ञान आणि विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजे ‘तंत्रज्ञान’ मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळया ह्यआर्थिकह्ण बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. हे समजून घेऊन या घटकाची तयारी करायला हवी.
संगणक व माहिती तंत्रज्ञान
● संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅक्सेसरीज यांचे प्रकार, स्वरुप, उपयोजन यांचा आढावा घ्यावा.
● कम्युनिकेशन नेटवर्किंग, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग या संकल्पना समजून घेऊन त्यांचे उपयोजन कशा प्रकारे व कोणत्या क्षेत्रांमध्ये केले जाते ते समजून घ्यावे.
● नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान- क्लाऊड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन इत्यादींमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्यांबाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
● इंटरनेट ऑफ थिंग्ज, आभासी वास्तव/संवर्धित वास्तव, मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निंग या बाबींचा विविध क्षेत्रातील वापर आणि त्याबाबतच्या समस्या, कारणे, उपाय समजून घ्यावेत.
● नेटवर्क आणि माहिती सुरक्षेसाठीच्या फॉरेन्सिक, सायबर कायदा इ. महत्वाच्या तरतूदी, त्यांतील महत्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, गुन्ह्याचे स्वरुप व शिक्षा इत्यादींचा अभ्यास मुळ कायदा वाचून करायला हवा.
steelframe.india@gmail.com