Success Story: स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली परिस्थिती, वय कधीच पाहिलं जात नाही. त्यासाठी केवळ व्यक्तीमधील आत्मविश्वास आणि स्वप्न साकरण्याची जिद्द महत्त्वाची असते. भारतामध्ये असे अनेक उद्योजक आहेत, जे गरीब परिस्थितीतून मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्यावसायिक झाले आहेत. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यावसायिकाची प्रेरणादायी यशोगाथा तुम्हाला सांगणार आहोत.

या यशस्वी व्यावसायिकाचे नाव अशफाक चुनावाला असून तो एका किरकोळ दुकानात १५०० रुपये प्रति महिना पगारावर काम करायचा. पण, आज त्याच्याकडे ३६ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ४०० कॅब आहेत.

अशफाक चुनावालाचे खडतर आयुष्य

अशफाक चुनावालाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दहावीनंतर शिक्षण सोडले आणि मिळेल ते काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ मध्ये त्याने १५०० रुपये मासिक पगारावर रिटेल स्टोअरमध्ये काम करायला सुरुवात केली. आणखी चांगला पगार मिळावा यासाठी त्याने अनेक वर्षे अनेक नोकऱ्या बदलल्या. त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली, पण त्यातूनही पैसे गमावले.

हेही वाचा: Success Story : तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या खेड्यातील २६ वर्षांच्या तरुणाने बनवले अ‍ॅप अन् तो झाला ४०० कोटींचा मालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१३ मध्ये जेव्हा त्याने नवीन लॉंच केलेल्या राइड-हेलिंग ॲपची जाहिरात पाहिली आणि तिथेच त्याचे नशीब बदलले. या कॅब सर्व्हिस कंपनीत तो पार्ट टाइम चालक म्हणून काम करू लागला. या ठिकाणी तो कॅब घेऊन ७ वाजता निघायचा आणि १० वाजेपर्यंत इथे काम करायचा. त्यानंतर तो स्किनकेअर स्टोअरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचा. इथले काम आटोपताच तो पुन्हा कॅब चालवायचा. स्किनकेअर स्टोअरमधून तो दरमहिन्याला ३५,००० रुपये आणि कॅब कंपनीकडून १५,००० रुपये कमावू लागला. हे पैसे साठवून अश्फाकने स्वतःची एक गाडी लोनवर घेतली. त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याला दुसरी कार घेण्यासाठी मदत केली. नंतर अशफाकने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी तीन गाड्या घेण्यासाठी १० लाख रुपयांसाठी बँकेकडे अर्ज केला. हळूहळू प्रगती करत अशफाकने ४०० गाड्या विकत घेतल्या असून त्याच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल ३६ कोटी इतकी आहे. तसेच येत्या काही दिवसांत अशफाक आणखी १०० गाड्या विकत घेण्याच्या तयारीत आहे.