Ashok Khade Success Story: एखादी गोष्ट जर तुम्ही मनापासून आणि जिद्दीनं मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहात नाही. असाच एक उद्योजक, जो एकेकाळी रिकाम्या पोटी रस्त्यावर झोपला आणि आपल्या मेहनतीमुळे काही वर्षांत अब्जाधीश व्यापारी बनला. आपल्या आईने ज्या शेतात शेतमजुरी केली ते शेत त्याने विकत घेतलं. आम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्या व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी तुम्हाला फिल्मी वाटेल, पण प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या संघर्षातून उंच झेप घेतलीय. अशा मराठमोळ्या सांगलीकर उद्योजकाचं नाव आहे, अशोक खाडे.

रिकाम्या पोटी काढले दिवस, ९० रुपये होती सॅलरी

एकेकाळी उपाशी झोपणारे आणि मजूर म्हणून महिन्याला ९० रुपये कमावणारे अशोक खाडे आज करोडोंच्या कंपनीचे मालक आहेत. परिस्थितीसमोर हार मानून गुडघे न टेकता अशोक खाडे यांनी मेहनतीच्या जोरावर आपल्या परिस्थितीवर मात करून यश मिळवलं आहे. घरची प्रचंड गरिबी, बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय.

वडिलांचे शब्द काळजाला भिडले

अशोक खाडे यांचे वडील चर्मकार, तर आई-बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत… कधी-कधी अशोक खाडेंबरोबर भावंडांनाही कामाला जावं लागायचं. अशोक खाडे यांचं सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी ते तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला गेले. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण, मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती. १९७२ ला ते चांगल्या गुणांनी अकरावी पास झाले. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. अशोक खाडे यांना शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील ‘त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही, तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे, तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे असे समजू नका, खूप शिका; वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” असं अशोक खाडे सांगतात.

पुढे कुटुंबाला मदत करण्यासाठी अशोक यांनी आपले शिक्षण सोडून माझगाव डॉकमध्ये हॅंडीमन म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचे हस्ताक्षर चांगले होते, त्यामुळे त्यांना शिप डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आणि चार वर्षांनी त्यांना कायमस्वरूपी ड्राफ्ट्समन बनवण्यात आले. यासह त्यांचे मासिक वेतन ३०० रुपयांपर्यंत वाढले. तरीही अशोक यांनी जीवनात काहीतरी महत्त्वपूर्ण करण्याची इच्छा बाळगली आणि म्हणूनच त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करायचे होते. काम करताना त्यांनी डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला आणि पदवीधर झाले. चार वर्षे सेवा केल्यानंतर अशोक यांची डॉकच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात बदली करण्यात आली. त्यांना कॉर्पोरेशनकडून जर्मनीला पाठवण्यात आले आणि देशातील नामांकित तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना मिळाली. मग, त्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्टपणे समजून घेतला आणि त्यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाली. त्यांनी आणि त्यांच्या भावाने दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा >> Truck Driver Turned YouTuber: कर्ज घेऊन एकेकाळी चालवायचे घर अन् आता महिन्याला कमावतात १० लाख, वाचा युट्यूबर ट्रक चालकाचा रंजक प्रवास

ज्या शेतात आई शेतमजूरी करत होती, ती शेती विकत घेतली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला त्यांना अडचणींचा सामना करावा लागला, परंतु चिकाटीने यश मिळविले आणि आता त्यांचा व्यवसाय या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट आहे. दरम्यान, काही वर्षांनी अशोक खाडे यांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा आई ज्या शेतात शेतमजुरी करायची, तीच शेतजमीन त्यांनी विकत घेतली.