Success Story: आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. अनपेक्षित मिळालेले सुख प्रत्येकालाच हवेसे वाटते. परंतु, अनपेक्षितपणे वाट्याला आलेल्या दुःखामुळे अनेक जण कोलमडून जातात. अशा परिस्थितीत काही कणखर व्यक्ती स्वतःला सावरून पुन्हा नव्याने उभ्या राहतात. आज आम्ही अशाच एका महिलेच्या खडतर प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जिने तिच्या आयुष्यातील दुःखातून स्वतःचे आयुष्य घडवले.
प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी धैर्य आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी फरशी झाडण्याचे काम करणाऱ्या प्रतीक्षा आज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) या पदावर कार्यरत आहेत. त्यांची ही यशोगाथा कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी आहे.
१७ व्या वर्षी लग्न अन् २० व्या वर्षी पतीचे निधन
कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रतीक्षा यांचे वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाले, ज्यामुळे दहावीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचे पती सदाशिव कडू हे एसबीआयच्या मुंबई कार्यालयात बुक बाइंडर म्हणून काम करायचे. प्रतीक्षा फक्त २० वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. विधवा आणि एका लहान मुलाचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पूर्ण शिक्षण नसल्यामुळे, प्रतीक्षा यांना चांगली नोकरी मिळणे खूप कठीण होते. शेवटी त्यांना एसबीआयमध्ये सफाई कामगाराची नोकरी मिळाली, जिथे त्यांनी शौचालये आणि फर्निचर साफ करण्यासाठी दरमहा खूप कमी पगार मिळायचा. या अडचणी असूनही त्यांनी एकट्याने घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, मुलाला वाढवले.
रात्रीच्या महाविद्यालयात शिक्षण
प्रतीक्षा यांनी मुंबईतील विक्रोळी येथील रात्रीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन, पुन्हा अभ्यास सुरू करून, बारावीची परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवीदेखील घेतली.
पुढे काही वर्षांनी जेव्हा त्यांना बँक क्लार्क पदावर बढती मिळाली तेव्हा त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. १९९३ मध्ये त्यांनी प्रमोद तोंडवलकर यांच्याशी दुसरे लग्न केले, ज्यांनी त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा दिला आणि त्यांना बँकिंग परीक्षांची तयारी करण्यास प्रोत्साहित केले. सततच्या कठोर परिश्रमाने प्रतीक्षा लवकरच प्रशिक्षणार्थी अधिकारी बनल्या आणि हळूहळू एजीएम पदापर्यंत पोहोचल्या.