Success Story: आज आम्ही अशा एका यशस्वी उद्योजकाबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून एक यशस्वी उद्योजक होण्याचा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ पैसाच नाही तर चिकाटी आणि मेहनतही खूप गरजेची आहे, हे या उद्योजकाच्या यशोगाथेतून शिकायला मिळते.
हरियाणातील करनाल येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या आशीष कुकरेजा यांनी त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार केले आहे. फक्त १० लाख रुपयांपासून सुरुवात करून त्यांनी हजारो कोटी रुपयांची GMV (ग्रॉस मर्चंडाइज व्हॅल्यू) प्रॉपर्टी व्हेंचर उभी केली आहे. त्यांच्या यशाचा हा प्रवास सोपा नव्हता. या काळात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
आशीष कुकरेजा यांचे बालपण
आशीष कुकरेजा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. ते पाचवीत असताना त्यांच्या वडिलांना कर्करोग झाला. आईने त्यांचे उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ती त्यांना वाचवू शकली नाही. तो मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप कठीण काळ होता. आशीष यांच्या कुटुंबाची बचत त्याच्या वडिलांच्या उपचारांवर खर्च होत होती. पण, आशीषच्या आईने शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्यास सुरुवात केली. त्या सहावीपर्यंतच्या मुलांना शिकवायच्या, परंतु शाळेत जास्त पैसे मिळत नव्हते.
आशीष यांनी एमबीए केल्यानंतर ते मुंबईत नोकरी करू लागले. कुटुंबापासून दूर राहिल्याने ते त्यांच्या करिअरसंदर्भात अधिक विचार करू लागले. आशीष २००४ मध्ये कोटक सिक्युरिटीजमध्ये व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांना स्टॉक ब्रोकिंगचा अनुभव मिळाला. आशीष यांनी २००६ पर्यंत तिथे काम केले. त्यानंतर ते दिल्लीतील युनिकॉर्न इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्समध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. २०१० पर्यंत त्यांनी चार वर्षे तिथे काम केले.
स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात
आर्थिक सेवांमध्ये सात वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर आशीष यांनी २०११ मध्ये होमसेफ्टी सुरू केली. त्यानंतर कंपनीचा विस्तार झाला. ती Mymagnet.io सारख्या अतिरिक्त सेवा देते. ती प्रॉपर्टी एजंटना तांत्रिक प्रशिक्षण देते. होमसेफ्टीची सुरुवात फक्त चार कर्मचाऱ्यांपासून झाली. आज कंपनीत ५०० कर्मचारी आहेत. त्याचे मुख्यालय ठाणे येथे आहे. आज ही कंपनी हजारो कोटींची उलाढाल करते.