डॉ.श्रीराम गीत
पन्नास वर्षांपूर्वी एक विनोद वाचला होता. तो प्रत्यक्षात घडला का विनोद म्हणून बनवला गेलाय याची मला कल्पना नाही. कॉलेज नवीनच सुरू झालेले असते. इंग्रजीच्या प्राध्यापकांनी फळय़ावर लिहिलेले असते, ‘आय वोन्ट ऐंगेज द क्लासेस टुडे’. इंग्रजी कळत असलेला एक मुलगा त्यातील ‘सी’ फक्त पुसून टाकतो. म्हणजे उरलेल्या शब्दांचा अर्थ काय तो वाचकांनी डिक्शनरीतून शोधावा. हसत खेळत सगळा वर्ग सुट्टी घेऊन कॅटिनमधे जातो. फळय़ावरचे वाक्य तसेच राहते. दुसऱ्या दिवशी तेच प्राध्यापक वर्गात येतात वाक्य वाचतात आणि त्यातील फक्त एल काढतात आणि वर्गाकडे तोंड करून मोठय़ाने विचारतात, ‘‘सुरू करायचा का तुमच्यासाठी आजचा तास?’’
हेही वाचा >>> युपीएससीद्वारे ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या शेवटची तारीख अन् अर्जाची प्रक्रिया
क्लासचा बदललेला अर्थ
आज या साऱ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावी शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचे कॉलेजमधील क्लास होत नाहीत. तर सारे अकरावी बारावीचे शिक्षण ते फक्त खासगी क्लासेस मध्येच शिकतात. मोठय़ा शहरात तर टाय-अप किंवा इंटिग्रेटेड कॉलेजने शिक्षण भरून गेले आहे. येथे असते टिळा लावण्यापुरते कॉलेज. प्रवेशाची नोंद व परीक्षेचा अर्ज या पलीकडे त्याचा संबंधच नाही. शिकायचे ते सारे क्लासेस मध्ये. अशा शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या मुलांना स्पर्धेला तोंड कसे द्यायचे याचे आभासी शिक्षण दिले जाते. आभासी या शब्दाचा अनेक पालकांना राग येण्याची शक्यता भरपूर. मात्र, यशस्वी असलेले क्लास चालक मात्र याच्याशी सहमत होतील. आम्ही आयआयटीला किंवा मेडिकलला प्रवेश मिळवून देतो या नावाखाली सातत्याने जाहिरातीतून मारा केलेले हे क्लासेस, तिथे प्रवेश मिळवून देण्यातील यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी कधीही पाच टक्क्यापलीकडे ओलांडू शकत नाहीत हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. थोडक्यात शंभर लोकांनी पैसे भरून प्रवेश घेतला असेल तर फार तर तीन किंवा चार टक्क्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. एकच विद्यार्थी आणि त्याचा फोटो मात्र तीन क्लासचे जाहिरातीत हे तर नेहमीचेच. याची विविध कारणे असू शकतात त्याच्या खोलात जाण्याचे कारण नाही. फक्त एकाचा इथे उल्लेख करतो. बॉलीवूड सिनेमात काम मिळेल म्हणून मुंबई गाठणारे जसे लाखो तरुण तरुणी दरवर्षी निघतात पण यशस्वी होणारे शेकडय़ातही मोजता येत नाहीत तसेच इथे घडते. मात्र, याबद्दल आपल्या शिक्षण व्यवस्थेला काहीही वाटत नाही किंवा ज्या संस्थांना सरकार अनुदान देते तेथील मंडळींना याबद्दल काही करावे वाटत नाही याची खंत खूप जणांना वाटते. कारण क्लास लावणे ज्यांना खरोखर परवडत नाही अशांची संख्या क्लास लावणाऱ्यांच्या संख्येच्या किमान तिप्पट तरी असते. पोटाला चिमटा लावून हे क्लासची फी भरतात.
हेही वाचा >>> UPSC-MPSC : बाजार स्थिरीकरण योजना काय? ती केव्हा सुरू झाली?
छोटय़ा मोठय़ा गावात राहणाऱ्या सामान्य पालकांना परगावी मुलांना घेऊन जाणे वा तिथे ठेवणे शक्य नसते. गावात उत्तम स्वरूपाचे क्लासेस किंवा शिक्षण संस्था उपलब्ध नसतात. दोनतीन लाख वस्तीची महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत, जिथे इंग्रजी माध्यमातून अकरावी बारावीचे शिक्षण दिले जात नाही किंवा शास्त्र शाखे संदर्भातील शिक्षणाची सोयच नसते. २०१८/१९ सालापासून ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या काही क्लासेसचे पेव फुटले. पण असे क्लासेस लावणे किंवा त्यासाठीचा लॅपटॉपचा खर्च करणे हेही कठीण वाटणारे पालकांची संख्या मोठी आहे. शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विचारल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मार्क वाढवायला अशा क्लासमुळे मदत होते हे नाकारण्यात अर्थ नाही. मात्र, विषयाचा सखोल अभ्यास, तोही पाठय़पुस्तकावरून करणे गरजेचे असते ते क्लासेस मध्ये कितपत शिकवले जाते याविषयी अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मनात रास्त शंका आहेत. पण त्या कुजबूज स्वरूपातच राहतात. तमिळनाडूमधे याला नीट परीक्षेत जाहीरपणे तोंड फुटले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारीकडे वळणारा ग्रामीण पदवीधरांचा ओघ प्रचंड वेगाने वाढत आहे. सर्वच जणांना तो घाबरून सोडणारा वाटतो. कारण अ-यशस्वी विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून टाकणारा हा प्रश्न उभा ठाकला आहे. ‘करियर मंत्र’ कडे येणाऱ्या प्रश्नातूनही हे मला सतत जाणवते. त्या क्लासेसवर जरूर वाचा पुढील मंगळवारी.