डॉ.भूषण केळकर डॉ. मधुरा केळकर

नोकरीत काहीजण पदोन्नतीच्या माध्यमातून पुढे जातात, तर काही जण लॅटरल मूव्हमेंट अर्थात समकक्ष पदांवर विभागांतर्गत बदल करून आपले कौशल्य वाढवतात. दोन्ही प्रकार आपल्याला दीर्घकालीन करिअरमध्ये स्थिरता, समाधान आणि आर्थिक प्रगती देऊ शकतात. पण यासाठी अद्यायावत असणे अत्यंत आवश्यक असते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती! त्यांचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ या अत्यंत गाजलेल्या निबंधामध्ये त्यांनी ‘अद्यायावत’ याचा उल्लेख केला आहे. कंपनीमध्ये लॅटरल मूव्हमेंट किंवा पदोन्नतीसाठी योजना कशी करावी याचेही उत्तर आजच्या काळात सावरकरांच्याच शब्दात सापडेल!

नोकरी किंवा करिअरमध्ये प्रगती करणे ही प्रत्येक व्यावसायिकाची महत्त्वाकांक्षा असते. काहीजण पदोन्नतीच्या माध्यमातून पुढे जातात, तर काही जण लॅटरल मूव्हमेंट अर्थात समकक्ष पदांवर विभागांतर्गत बदल करून आपले कौशल्य वाढवतात. दोन्ही प्रकार आपल्याला दीर्घकालीन करिअरमध्ये स्थिरता, समाधान आणि आर्थिक प्रगती देऊ शकतात. पण यासाठी अद्यायावत असणे अत्यंत आवश्यक असेल आणि त्यासाठी ‘पहिले पाऊल’ सदरातील ‘सप्तपदी’ बघू –

१. स्वत:चे मूल्यांकन करा

कुठल्याही बदलाची सुरुवात स्वत:पासून होते. आपल्या सध्याच्या भूमिकेत आपण काय चांगले करतो, कोणत्या गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत, याचा विचार करा. आपल्या शक्ती, कमकुवत बाजू, आवडीनिवडी आणि भविष्यातील उद्दिष्टे ओळखा. यामध्ये आपल्या कौशल्यांचा ( skills), अनुभवाचा आणि आवडीचा योग्य समतोल महत्त्वाचा असतो.

२. स्पष्ट करिअर उद्दिष्टे ठरवा

आपण २-३ वर्षांनंतर कोणत्या पदावर असावे अशी अपेक्षा आहे? त्यासाठी कोणती कौशल्ये लागतील? कुठल्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतल्यास फायदा होईल? अशी उद्दिष्टे ठरवा आणि त्यादृष्टीने कृती आरंभ करा. ध्येय निश्चित असल्यास त्याकडे जाण्याचा मार्ग ठरवणे सोपे जाते.

३. नेटवर्किंग आणि रिलेशनशिप बिल्डिंग

आपल्या कंपनीतील विविध विभागातील लोकांशी संवाद साधा. सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी आणि HR टीमसोबत चांगले संबंध ठेवा. अनेकदा लॅटरल मूव्हमेंटची संधी आपणास आपल्या नेटवर्कद्वारे कळते. तसेच, आपली विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होते.

४. नवीन कौशल्ये आत्मसात करा

पदोन्नती किंवा लॅटरल बदलासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची यादी तयार करा. ही कौशल्ये शिकण्यासाठी ऑनलाइन कोर्सेस, वर्कशॉप्स किंवा इन-हाउस ट्रेनिंगचा वापर करा. तांत्रिक कौशल्यांसोबतच संवाद, नेतृत्व, टीम मॅनेजमेंट अशी सॉफ्ट स्किल्स देखील अत्यंत महत्त्वाची आहेत.

५. नेहमीच पुढाकार घ्या

सध्या चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये अधिक जबाबदारी घ्या. नवीन कल्पना मांडण्यास संकोच करू नका. समस्यांचे निराकरण शोधण्यात पुढाकार घ्या. अशा कृतींमुळे आपल्याकडे लीडरशिप क्षमता आहे हे सिद्ध होते.

६. फीडबॅक घ्या आणि स्वीकारा

वरिष्ठांकडून वेळोवेळी फीडबॅक घ्या आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल करा. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा अभिप्राय आपल्या प्रगतीस उपयुक्त ठरतो.

७. आपल्या इच्छेचे सुस्पष्टपणे संवाद करा

जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विभागात काम करायचे असेल किंवा पदोन्नतीची इच्छा असेल, तर ती HR किंवा आपल्या मॅनेजरला योग्यवेळी स्पष्टपणे कळवा. अनेकदा ही माहिती न सांगितल्यामुळे संधी गमावली जाते.

नवीन नोकरीच्या सुरुवातीला पहिले पाच वर्षे ही आपल्या करिअरची पाया रचणारी काळ असते. या काळात योग्य लघुकालीन (३ ते १२ महिने) व मध्यमकालीन (१ ते ३ वर्षे) उद्दिष्टे ठरवणे फार महत्त्वाचे आहे.

लघुकालीन उद्दिष्टे म्हणजे त्वरित गाठता येतील अशी उद्दिष्टे. उदाहरणार्थ, कंपनीची कामाची प्रक्रिया समजून घेणे, आवश्यक कौशल्ये शिकणे, चांगले नेटवर्क तयार करणे किंवा एखाद्या छोट्या प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे. ही उद्दिष्टे SMART ( Specific, Measurable, Achievable, Relevant, Time- bound) असावीत.

मध्यमकालीन उद्दिष्टे ही अधिक व्यापक असतात. उदा., विशिष्ट भूमिकेपर्यंत पोहोचणे, प्रमोशनसाठी तयारी करणे, नवीन तांत्रिक किंवा व्यवस्थापन कौशल्य मिळवणे, किंवा एखाद्या टीमचे नेतृत्व करणे. ही उद्दिष्टे ठरवताना आपल्या दीर्घकालीन करिअरच्या दिशेचा विचार करावा.

लक्षात ठेवा, हे उद्दिष्टे लवचीक असावीत. काळानुसार आणि अनुभवाने त्यात बदल करता येणे गरजेचे आहे. योजनेनुसार काम केल्यास पहिल्या पाच वर्षांत मजबूत करिअर पाया तयार होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वत:वर विश्वास असल्यास आपण नक्कीच आपल्या करिअरच्या पुढील टप्प्यावर पोहोचू शकतो. कंपनीच्या वाढीबरोबरच स्वत:चीही प्रगती घडवून आणणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे ध्येय असायला हवे. bhooshankelkar@hotmail.com/mkelkar_2008@yahoo.com