डॉ.श्रीराम गीत
गेल्या तीन-चार महिन्यांत मला भेटलेल्या किंवा फोनवरून बोललेल्या तीस-पस्तीस इंजिनीअरिंगची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची कथा आणि व्यथा येथे देत आहे. सध्या शिकणाऱ्या किंवा पदवी मिळवलेल्या अन्य इंजिनीअरांसाठी उपयोगी होईल म्हणून मांडतो आहे. सर्वांचे आकर्षण असलेल्या कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी पदवीधरांची संख्या फार मोठी आहे. त्या खालोखाल मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर मोडतात. अगदी मोजकी हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी काही कॉलेजेस सोडली तर सरसकट महाराष्ट्रातील सर्वच कॉलेजची ही अवस्था आहे. मात्र, झाकली मूठ सव्वा लाखाची या जुन्या म्हणी प्रमाणे नवीन वर्षाचे वर्ग सुरू झाले आहेत. यंदाचे प्रवेश छान झाले म्हणून पालक, विद्यार्थी, संस्थाचालक व प्राध्यापक आनंदात आहेत. एकेका शाखेवर पुढील लेखात वाचा आणि विचार करा.
मेकॅनिकल पदवीधरांबद्दल
शिकत असताना एखादा विषय आवडतो व वरचेवर आठवतो. मग त्यातच काम करावे असे सारखे वाटू लागते. पण त्यात काम करणारे किती? त्यांना संधी कशी असते? यावर व्यावहारिक विचार न करणारे विद्यार्थी यांची संख्या सहज ९० टक्के भरते. गेली अनेक वर्षे मला डिझाईन आवडते. त्या मध्येच काम करायचे आहे असे सांगणारे मेकॅनिकलचे हुषार पदवीधर मला सर्रास भेटत आले आहेत. जसे दहावी पास झालेला ९० टक्क्यांच्या पुढचा विद्यार्थी सहजपणे मला संशोधन करायचे आहे म्हणतो, तसेच हे वाक्य असते.
संशोधनासाठी काय करावे लागते? संशोधक करतात काय? यापुढे जाऊन एखादा संशोधक भेटला होता काय? असे विचारले असता पालक व विद्यार्थी कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. तीच अवस्था डिझाईनमध्ये तुला काम करायचे आहे म्हणजे तू काय करणार? ते काम तुला का द्यावे? तसे काम करणारी एखाद्या मोठ्या कंपनीत माणसे किती असतात? त्यांचे कामाच्या स्वरूपाबद्दल तुला काही माहिती आहे काय? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर जर मेकॅनिकल इंजिनीअरला देता येत नसेल तर त्याला नोकरी कशी मिळणार? आपण साधेसे उदाहरण सर्व वाचकांना कळेल असे घेऊयात. आपण सारे वाहने वापरतो. वर्षातून क्वचित एकदोन वेळा विमान प्रवास करतो. साऱ्यांच्या हाती स्मार्टफोन असतो. यातील एकातरी गोष्टीचे डिझाईन भारतात बनल्याचे मला माहिती नाही. मग अशा साऱ्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये मला नोकरी पाहिजे आणि ती सुद्धा फक्त डिझाईनमध्ये असे स्वप्न बघणे हे, ‘करण जोहरच्या सिनेमात मला हिरोची भूमिका पाहिजे’ असे म्हणण्याइतके अवास्तव ठरते. याबद्दल विस्ताराने इथे लिहिणे शक्य नाही पण शिकणाऱ्या किंवा पदवी हाती आलेल्या विद्यार्थ्यांना अशा भ्रमातून बाहेर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
पॅकेज फक्त आयटीत
मेकॅनिकल इंजिनीअर झालेल्या विद्यार्थ्याला एखादी आयटी कंपनी नोकरी देण्यास तयार असते. काम शिकवण्यासाठी तयारी दाखवते. पण आयटीतील कामाला सुरुवात केल्यावर मेकॅनिकल हा शब्द आयुष्यभर विसरून जायचे असते. परतीच्या रस्त्यावर अशी कायमची फुली मारणाऱ्यांना पॅकेज मिळते. या उलट मेकॅनिकल मधील कंपन्यांनी कॅम्पस करता जाणे बंद करून पाच-सहा वर्षे तरी झाली आहेत. याला अक्षरश: हाताच्या बोटावरचे अपवाद आहेत. अशा कंपन्या एक-दोन ठराविक कॉलेजमधून आठदहा विद्यार्थी घेतात कारण त्यांचे वैयक्तिक संबंध जुळलेले असतात.
उपाय योजना काय?
मेकॅनिकल इंजिनीअरना नोकऱ्या नक्की उपलब्ध आहेत, मात्र थेट मोठ्या कारखान्यांची नावे आपण सहज घेतो, ऐकतो तिथे क्वचितच एखाद्याचे नशीब फळफळते. अशा मोठ्या कारखान्यांना कमीत कमी दोनशे ते चारशे व्हेंडर्स छोटे मोठे सुट्टे भाग पुरवतात. अशांची यादी सहज उपलब्ध होते. एमएसएमई या नावाने हे उद्याोग चालतात. किमान २० तर जास्तीत जास्त २०० कामगार असलेल्या या उद्याोगांमध्ये विविध इंजिनीअरला कामाची संधी नक्की मिळते. पण त्यासाठी ‘साला मै तो साब बन गया’, हे गाणे विसरावे लागते. छोटा कामगारांचा गट सांभाळून घेत, मालकाची मर्जी सांभाळत, स्वत:च्या बाईकने रोज २५-३० किलोमीटर घरापासून जा-ये करत, आईने दिलेला डबा खाऊन, दुपारी टपरी वरचा चहा पिऊन काम करण्याची दोन वर्षे तयारी दाखवावी लागते. यानंतर खऱ्या अर्थाने कामाचे स्वरूप व खराखरा पगार सुरू होतो. मग तो कारखाना जिथे सुटे भाग पुरवतो त्या नामवंत कारखान्याचे दार उघडण्याचा हा राजमार्ग गेल्या ५० वर्षात बदललेला नाही. पण बदलली आहे ती पालकांची व विद्यार्थ्यांची मानसिकता. ती काम शिकून स्पर्धेत धावण्यासाठी उपयोगी नाही.
