scorecardresearch

स्पर्धेत धावण्यापूर्वी : परदेशी शिक्षण, नोकरीतील तथ्य

गेल्या ४० वर्षांतील विविध क्षेत्रात शिकून नंतर नोकरी करत अमेरिकेत स्थिरावलेल्या व्यक्तींकडून सतत मिळालेल्या माहितीवर या नोंदी आधारित आहेत.

job opportunities after education career opportunities after education
प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ.श्रीराम गीत

इंजिनीअर झाल्यानंतर तीन सरळसोट रस्ते सुरू होतात. स्वप्नातलं पॅकेज मिळालं आणि आवडतं काम असलं तर नोकरीला सुरुवात होते. सधन घरातील आई-वडिलांनी मुलामुलींच्या परदेशगमन आणि शिक्षणासाठी पन्नास लाखाची तरतूद करून ठेवली असली तर पाच वा सहाव्या सेमिस्टर पासूनच मुलांना त्याचे वेध लागतात. हाती पदवी येण्यापूर्वीच पूर्वतयारी झालेली असते. ही मुले एक सप्टेंबरला तिकडे रवाना होतात. जशी यंदाचे वर्षी दोन लाख सत्तर हजार तिकडे गेली. एमबीएचा तिसरा रस्ता अन्य काही पत्करतात.

lokrang
दूर चाललेले शिक्षण..
doctor
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम: उणे गुण मिळालेल्या १३ उमेदवारांना प्रवेश, शून्य ‘पर्सेटाईल’चा परिणाम
guruji foundation
गरजूंचे ‘गुरुजी’
engineering student cheated
‘ऑनलाइन जॉब’ : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले

गेल्या आठवड्यामध्ये लोकसत्तेत ठळकपणे दोन बातम्या छापून आल्या. चिनी विद्यार्थ्यांना मागे टाकून यंदाचे वर्षी भारतीय विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण केले. दुसऱ्या बातमीत अमेरिकेत काहीही करून पोहोचायचे या अट्टाहासात सुमारे ९९ हजार भारतीय नागरिकांना बेकायदा प्रवेश केल्याबद्दल अटक झाली. अमेरिकेतील शिक्षणाबद्दल व पदव्युत्तर पदवी नंतर नोकरीचे स्पर्धेत धावण्यापूर्वी अशांना कशाकशाला सामोरे जावे लागते त्याच्या फक्त नोंदी येथे करणार आहे.

गेल्या ४० वर्षांतील विविध क्षेत्रात शिकून नंतर नोकरी करत अमेरिकेत स्थिरावलेल्या व्यक्तींकडून सतत मिळालेल्या माहितीवर या नोंदी आधारित आहेत. विविध इंग्रजी वृत्तपत्रात असे लेख सर्रास छापून येतात. परदेशी शिक्षणासाठी कोणी जावे वा जाऊ नये हा पूर्णपणे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मात्र, त्या स्पर्धेत धावल्यानंतर आपल्या हाती कोणते बक्षीस मिळणार? का फक्त भाग घेतल्याचे कागदपत्र हाती पडणार? का स्पर्धेत कशाला धावलो अशी भावना निर्माण होणार? याचा अनभिज्ञ वाचकांना खुलासा व्हावा, थोडीफार आकडेवारी कळावी यासाठी आजचा लेख.

फी, कर्ज, नोकरी, पगार

● अमेरिकेत कोणतीही पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी दोन वर्षाचे शिक्षण लागते. एक वर्षाची शैक्षणिक फी किमान २५ ते कमाल ५५ हजार डॉलर्स इतकी भरभक्कम असते.

● जेमतेम एक टक्का अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना फी माफी दिली जाते. इतर अन्य कामातून शैक्षणिक मदत करणाऱ्यांना यामध्ये थोडीफार सवलत मिळत जाते.

● ज्याप्रमाणे भारतात सर्वोत्तम संस्थातील विद्यार्थी कॅम्पस द्वारे निवडले जातात, तशी निवड होण्याची शक्यता पहिल्या एक टक्का गटातील विद्यार्थ्यांची असते. त्यांना किमान ७० हजार ते एक लाख डॉलर्सचे वार्षिक पॅकेज दिले जाते.

● भारतात दोन ते तीन वर्षे कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील एमएस नंतर सुमारे ७० हजार डॉलर्सचे वार्षिक पॅकेज मिळते. अशांची संख्या अजून दहा टक्क्यात मोडते.

● अन्य नव्वद टक्के विद्यार्थ्यांना नोकरीचा शोध घेऊन ती मिळवण्यासाठी तीन महिने ते दीड वर्ष असा कालावधी लागू शकतो. या दरम्यान ते किरकोळ अन्य स्वरूपाची कामे करत राहण्याचा खर्च कसाबसा निभावतात. त्याला अमेरिकन सरकारची परवानगी असते.

● तेथील सामान्य विद्यापीठातून एमएस झाल्यानंतर नोकरी कधी मिळेल याची खात्री नसते. मात्र, यातील कोणीही डॉक्टरेट करण्यासाठी नोंदणी केली तर विनासायास अजून तीन ते सात वर्षे तो तिथे राहू शकतो. अशा विद्यार्थ्यांकडून त्यांचे गाईड विविध संशोधन प्रकल्पासाठी आलेल्या प्रचंड आर्थिक मदतीतून अन्य पूरक कामे करून घेतात व त्यांना विद्यापीठाचे मदतीने खर्चाची तोंडमिळवणी करता येते. मात्र यातून एमएससाठी केलेल्या खर्चाचा परतावा मिळणे अशक्य असते. कमवायचे आणि मिळेल त्या रकमेतून भागवत राहायचे असा हा साधा प्रकार असतो.

● ज्यांचे आई-वडिलांनी ५० लाखाची तरतूद करून ठेवली आहे त्यांना कसलाच प्रश्न नसतो. ज्यांनी कर्ज काढून तिकडे प्रयाण केले आहे त्यांचे आई वडील कर्ज फेडण्याची चिंता करत ते फेडत राहतात. ज्यांना आपली मुले तिकडे पोचली यातच धन्य वाटते त्यांना या कर्जफेडीतही आनंद मिळतो. मात्र, २५ ते ३० लाखाचे घेतलेले कर्ज व्याजासकट फेडण्यासाठी जोवर विद्यार्थी वार्षिक ६०००० डॉलर मिळवत नाही तोवर याचा आर्थिक ताळेबंद कधीच लागू शकत नाही. अशा साऱ्यांची झाकली मूठ सव्वा लाख डॉलरची राहते. यथोचित कालानुसार साऱ्यांचाच पगार वाढत जातो. नवीन नोकरी शोधतानाही त्यात वाढ होते. मात्र ज्याप्रमाणे येथे पगार वाढ होते तसतशा गरजा ही वाढत जातात तीच गत तेथेही असते. उदाहरणार्थ गाडीची गरज, तिचा हप्ता, स्वतंत्र भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटचा हप्ता, आजारपणाच्या विम्याचा मोठा हप्ता, नोकरीच्या जागी जाण्या येण्यासाठी लागणारे पेट्रोलचा वाढता खर्च, एखादी पार्टी यात दमछाक होत राहते.

● जेव्हा सत्तर हजाराचा वार्षिक पॅकेजचा आकडा पार करून छोट्या शहरातील नोकरी हाती येते तेव्हा बचतीला सुरुवात होते. बचत किती करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. तिकडे कायम स्थायिक होणे हे ग्रीनकार्ड मिळेतोवर एक यक्षप्रश्न बनले आहे. एकच नोंद करून इथे थांबावे. अमेरिकेत कोणत्याही शहरातून मुंबईचे परतीचे तिकीट पंधराशे ते अठराशे डॉलर एवढेच आहे. म्हणजेच दीडशे डॉलर महिना बचत केली तर भारताची, म्हणजेच आई वडिलांच्या भेटीची आर्थिक तरतूद सहज शक्य असते. दरवर्षी अशी भेट देणारी तुमच्या माहितीत कोणी आहेत का?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tips to prepare for competitive exams preparation strategy for competitive exams zws

First published on: 21-11-2023 at 06:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×