विद्यार्थी मित्रांनो, २२ ऑगस्ट २०२५ पासून यूपीएससी मुख्य परीक्षा सुरू झाली आहे. २२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या निबंधाच्या पेपरबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
गेल्या ४-५ वर्षापासून यूपीएससीचा कल हा ‘तत्वज्ञानविषयक वा तात्त्विक’ निबंध विचारण्याकडे आहे. या वर्षीचे निबंधाचे विषयही याला अपवाद नव्हते. २०२५ पासून लागू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेकरिता आपण या वर्षीच्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील पेपरचा संदर्भ म्हणून वापर नक्कीच करू शकतो हेही लक्षात घ्या.
नोट : यूपीएससी मुख्य परीक्षेतील प्रश्न हे इंग्रजी व हिन्दी भाषेत असतात. तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून वा मराठीतून देवू शकता. इथे आपण प्रश्न मराठीतून बघूया.
२०२५ मुख्य परीक्षेतील निबंध या पेपरमधील निबंधाचे विषय जाणून घेऊया – कालावधी: ३ तास गुण: २५०
विभाग अ मधून एक आणि विभाग ब मधून एक असे २ निबंध प्रत्येकी १००० ते १२०० शब्दात लिहा.
विभाग अ
● सत्याला रंग माहीत नसतो.
● युद्धाची सर्वोच्च कला म्हणजे लढाई न करता शत्रूला वश करणे.
● विचार एक जग शोधतो आणि ते निर्माण देखील करतो.
● कटू अनुभवांमधून सर्वोत्तम धडे शिकले जातात.
विभाग ब
● गढूळ पाणी एकटे सोडल्याने ते स्वच्छ होते.
● वर्षे बरेच काही शिकवतात जे दिवसांना कधीच कळत नाही.
● जीवनाला एक प्रवास म्हणून पाहणे चांगले, गंतव्यस्थान म्हणून नाही.
● समाधान ही नैसर्गिक संपत्ती आहे; विलासिता ही कृत्रिम गरिबी आहे.
विशेषत: २०२५ चा पेपरमध्ये तात्विक विषय जे विचारले आहेत त्यात जीवनाचे धडे, नीतिमत्ता आणि समकालीन मुद्द्यांवर खोलवर चिंतन होते. यूपीएससी मुख्य २०२५ निबंध पेपरचे विश्लेषण आपण खालीलप्रमाणे करू शकतो –
● तात्विक विषयांचे सातत्य :
या पेपरमध्ये उमेदवाराच्या बौद्धिक परिपक्वता आणि टीकात्मक विचारसरणीची चाचणी घेणारे अमूर्त विषय समाविष्ट करण्याचा यूपीएससीचा ट्रेंड कायम ठेवण्यात आला. या विषयांमध्ये सत्याचे स्वरूप, कटू अनुभवांचे महत्त्व आणि समाधान शोधणे समाविष्ट होते.
● अमूर्त आणि ठोस संतुलन :
आयोगाने विभाग ‘अ’ मध्ये तात्विक आव्हाने सादर केली गेली, तर विभाग ‘ब’ मध्ये अधिक व्यावहारिक, जीवन-तत्वज्ञान आणि नीतिमत्ता-केंद्रित संकल्पना विचारल्या होत्या. यामुळे उमेदवारांना वैयक्तिक अनुभवांच्या आधारे लिखानाची संधी आयोगाने दिली.
● आंतरविद्याशाखीय विचारसरणीवर भर :
चांगले गुण मिळविण्यासाठी इतिहास, अर्थशास्त्र, प्रशासन आणि विज्ञानातील उदाहरणांसह तत्वज्ञानातील कल्पना प्रभावीपणे एकत्रित करून लिखाण करणे अपेक्षित आहे. आपण जे काही लिहितो त्याला सटीक उदाहरणांची जोड दिले तरच आपण एक चांगला निबंध लिहू शकतो.
● प्रशासकीय गुणांची प्रासंगिकता :
नैतिक तर्क, नेतृत्व आणि लवचिकता यावर केंद्रित विषय आयोगाद्वारे विचारले जातात. हे गुण एका सनदी अधिकाऱ्यात असणे आवश्यक आहेत. प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. ते कोणत्या उमेदवारात आहेत हे जाणून घेण्यासाठीच आयोगाद्वारे असे विषय निवडले जातात.
● शब्दांपलीकडे जाण्याचे आव्हान :
आयोगाला विषयाचे अंतरंग समजून घेणारे उमेदवार हवे आहेत. विषयाचे वरवरचे स्वरूप नव्हे तर त्याची खोली तपासणे हे खरे आव्हान इथे असते. विषयाचा मतीतार्थ समजून घेण्याचे कसब आपल्या अंगी असायला हवे. यासाठी तात्विक विषयांवर काम करणे आवश्यक आहे.
मागील वर्षांच्या ट्रेंडशी तुलना
● २०२४ मधील मुख्य परीक्षा :
२०२४ च्या पेपरमध्ये तात्विक, नैतिक आणि समकालीन मुद्द्यांचे मिश्रण देण्यात आले जे २०२५ पेक्षा अधिक थेट होते, ज्यात जंगले आणि संस्कृतींमधील संबंध आणि सोशल मीडियाचा प्रभाव यासारख्या विषयांचा समावेश होता. यात उमेदवारांनी साध्या दिसणाऱ्या मुद्द्यांमध्ये सखोल, आंतरविद्याशाखीय अंतर्दृष्टी प्रदान करण्याची अपेक्षा होती.
२०२३ मधील मुख्य परीक्षा:
२०२३ च्या पेपरमध्ये आत्मनिरीक्षणात्मक आणि अमूर्त विषय होते ज्यांचे चिंतनशील विचार आवश्यक होते. पूर्व-तयार केलेल्या सामग्रीवर अवलंबून राहण्याऐवजी उत्स्फूर्त विचार आणि व्यापक अर्थ लावण्यावर भर देण्यात आला. यावरून एक बाब सिद्ध होते की आयोगाला पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जावून विचार करणारे उमेदवार हवे आहेत.
● २०२६ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी निबंध पेपरची तयारी –
या ट्रेंडच्या आधारे, २०२६ च्या निबंध पेपरच्या तयारीमध्ये सामान्य अभ्यासातून बहुविद्याशाखीय सामग्री विकसित करणे, तात्विक संकल्पनांवर प्रभुत्व मिळवणे आणि कालबद्ध परिस्थितीत लेखनाचा सराव करणे समाविष्ट असले पाहिजे. स्पष्ट प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्षासह निबंध रचना परिष्कृत करणे, सुसंगतता आणि प्रवाह सुनिश्चित करणे आणि अभिप्राय शोधणे देखील महत्त्वाचे आहे. शेवटी, युक्तिवादांमध्ये संतुलित दृष्टीकोन राखणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही लिहिलेल्या निबंधांचे योग्यप्रकारे मूल्यांकन होणे अपेक्षित आहे.
तात्त्विक निबंध लिहिताना संबंधित तत्वज्ञानाच्या संकल्पनेसह एक आकर्षक प्रस्तावना, उदाहरणे वापरून कल्पनांना वास्तविक जगाच्या समस्यांशी जोडणारे संक्षिप्त परिच्छेद आणि युक्तिवादांचा सारांश देणारा आणि पुढे जाण्याचा मार्ग सुचवणारा संक्षिप्त निष्कर्ष यावर लक्ष केंद्रित करा. भाषा सोपी ठेवा आणि सुव्यवस्थित विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी मुद्द्यांमध्ये तार्किक प्रवाह सुनिश्चित करा. जेणेकरून आयोगाला अपेक्षित निबंध आपण लिहू शकतो व त्यात चांगले गुणही मिळवू शकतो.
sushilbari10 @gmail.com