भारतीय कला परंपरेला हजारो वर्षांचा वारसा लाभलेला आहे. भारतीय देवता परिवाराने या परंपरा विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय भक्ती परंपरा सगुण-निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात आढळते, सगुण परंपरेत समोर दृश्य स्वरूपात देवी- देवतांची उपासना केली जाते, किंबहुना देवतांच्या मूर्ती व्युत्पत्तीमागेही हे महत्त्वाचे कारण मानले जाते. भारतीय देवता परिवार बराच मोठा आहे, असे असले तरी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांना विशेष महत्त्व आहे. व्युत्त्पत्ती, स्थिरता आणि विनाश या सृष्टीच्या चक्रांचे प्रतिनिधित्त्व हे त्रिदेव करतात. याच तीन देवांपैकी महेश म्हणजेच शिव हा लयकारी तत्त्वाचा अधिपती मानला जातो. शिवाचे सगुण रूप मूर्ती शास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. शिवाला लिंग, अर्धनारीनटेश्वर, रावणानुग्रह, भिक्षाटन अशा अनेक रूपात दर्शविण्यात येते. याच यादीतील एक महत्त्वाचे रूप म्हणजे तांडव मूर्ती, याच तांडव मूर्तीची शास्त्रीय संज्ञा नृत्य मूर्ती, नृत्य दक्षिणा मूर्ती, नटराज अशी आहे. या स्वरूपाच्या मूर्तींचे अंकन मध्ययुगीन मंदिरे, लेणी यांच्या भिंतींवर कोरलेल्या शिल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. शिव हा ६४ कलांचा स्वामी म्हटला जातो, त्यातीलच नृत्य ही एक कला आहे. म्हणूनच शिव हा नटेश, नटेश्वर, नटशिखामणी, नर्तेश्वर म्हणूनही ओळखला जातो.

तांडव नृत्याचे प्रकार आणि काळ

तांडव नृत्याचे १०८ प्रकार आहेत. हे प्रकार चिदम्बरम येथील बृहदेश्वर (शिवाच्या) मंदिराच्या गर्भगृहातील शिल्पांमध्ये पाहू शकतो. विशेष म्हणजे हे अंकन ‘तांडव लक्षण’ ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या नियमांनुसार करण्यात आलेले आहे. शिव आगम ग्रंथांमध्ये शिव तांडव नृत्याचे संदर्भ येतात. तांडव नृत्य प्रकारात उमातांडव, प्रदोष तांडव, आनंद तांडव अशा प्रकारांच्या तांडव नृत्याचा समावेश होतो. शिवाच्या तांडव नृत्याचे अंकन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यांचा कालखंड ६ वे ते १३ वे शतक इतका प्रदीर्घ आहे. प्रत्यक्ष शिल्पांमध्ये शिव तांडव नृत्याशिवाय कटिसम, ललित, ललाटतिलक, चतुर, तलसंस्फोटित, उर्ध्वजानू यांसारखे इतरही नृत्यप्रकार आढळतात.

rape incident, Shil daighar,Thane Police, close watch, religious places
ठाणे : धार्मिक स्थळांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष
Kalki 2898 AD
Kalki 2898 AD हिंदू धर्मासारखेच ‘या’ देशांनाही आहेत ‘चिरंजीव’ वंदनीय; निमित्त ‘कल्की’चे… काय आहे चिरंजीव ही संकल्पना?
Plot to sell plot in Makhmalabad area foiled due to vigilance of Deputy Registrar Sharad Davange nashik
भाषेतील फरक टिपला अन् भूखंड परस्पर विक्रीचा डाव फसला; सहदुय्यम निबंधकांची दक्षता
covid new variant surge
करोनाच्या नव्या प्रकारांचा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये धुमाकूळ; भारतातील सद्यपरिस्थिती काय?
Kalidas artful clown marathi news
कालिदासाचे कलामर्मज्ञ विदूषक
Geoglyphs in Barsu village, such as the one in the picture, were found in Maharashtra’s Ratnagiri district (Source: Nisarg Yatri)
देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास।संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता (सिव्हिलायझेशन) यांचा नेमका अर्थ काय?
mumbra Killing of young woman
ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या
Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
Kailas Temple, Ellora
कैलास मंदिर, वेरूळ (सौजन्य: विकिपीडिया)

अधिक वाचा: युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?

सर्वसाधारण मूर्ती शास्त्र

अंशुमद्भेदागम हा शिव आगम ग्रंथ आहे. या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे नटराजाची मूर्ती उत्तम- दश- ताल या प्रमाणात घडविली जाते. शिवाच्या पायाखाली अपस्मार पालथा दर्शविला जातो. तर शिवाच्या चेहऱ्यावर स्मित असते. या अंकनात शिव हा चतुर्भुज असून शिवाभोवती प्रभामंडल दर्शविण्यात येते. नटराजाच्या मागच्या हातात डमरू आणि अग्नी असतो तर पुढच्या बाजूचा उजवा हात अभयमुद्रेत तर उजवा हात गजहस्त मुद्रेत असतो, शिवाच्या अंगावर आभूषणे असतात, डोक्यावरील जटा वाऱ्यावर भुरभुरत असतात. मूलतः अशा स्वरूपाचे अंकन चोलकालीन पितळेच्या मूर्तीत आढळते.

लेणीवर आढळणारे शिव तांडव शिल्प

मंदिरावर आढळणाऱ्या नटेश्वर शिवाच्या प्रतिमा या आकाराने लहान असतात तर लेणींमध्ये आढळणारी शिल्पे ही भव्य असतात. लेणींमधील शिवतांडव शिल्प समजून घेण्यासाठी वेरूळच्या दशावतार लेणींमधील शिल्प हे उत्तम उदाहरण ठरू शकते. या लेणीतील पहिल्या मजल्यावरील उत्तरेकडच्या सभामंडपातील दुसऱ्या शिल्पपटात शिव तांडवाचे अंकन करण्यात आले आहे. शिवाच्या उजव्या हातांमध्ये अनुक्रमे डमरू, त्रिशूल, आणि एक फळ आहे. डाव्या हातांपैकी एक हात गजहस्त मुद्रेत असून त्याने दुसऱ्या हातात चंद्रकोर धारण केलेली आहे. तर तिसऱ्या हातात सर्प असून चौथ्या हातातील आयुध स्पष्ट दिसत नाही. शिवाची मुद्रा प्रसन्न आहे, तर शरीराचे अंकन नृत्यातील लय दर्शविते. हा नृत्य प्रकार आनंद तांडव असल्याचे अभ्यासक नमूद करतात. याशिवाय या शिल्पात नुपूर, नागाचे कटिबंध, पत्र कुंडल, उदरबंध, वैकक्षक, केयूर, जटामुकुट यांसारखी लांच्छने या शिल्पाच्या सौंदर्यात भर घालतात. याच शिल्पाच्या अंकनात शिवाच्या बाजूला वादक दर्शविण्यात आलेले आहेत, ते बासरी, झांज सारखी वाद्ये वाजवत आहेत. तर पार्वती एका बाजूला बसून हा नृत्याविष्कार पाहते आहे.

Nataraj Shiva, Cave No.21, Ellora
नटराज शिव, लेणी क्रं, २१, वेरूळ (सौजन्य: विकिपीडिया)

वेरूळच्या ‘रावण की खाई’ या लेणीतही शिवाचे नृत्य शिल्प आहे, या शिल्पात शिव हा अष्टभुज आहे त्याच्या हातात त्याने डमरू आणि परशू धारण केलेला आहे. या शिल्पातही शिव वेगवेगळ्या आभूषणांनी युक्त आहे. विशेष म्हणजे या शिल्पात शिवाचे व्याघ्रचर्म हे स्पष्ट दर्शविण्यात आले आहे. या शिल्पात शिवाच्या दोन्ही बाजूस दिक्पाल आहेत. पार्वती शिवाच्या डाव्या बाजूला असून तिच्या बरोबर स्कंद आहे. तर शिवाच्या उजवीकडे तीन वादक आहेत, ते बासरी, मृदूंग वाजविताना दिसतात. अशाच स्वरूपाच्या अनेक प्रतिमा आपल्याला वेरूळच्या शैव लेणींमध्ये आढळतात. तर मुंबईच्या घारापुरी, जोगेश्वरी आणि मंडपेश्वर लेणींमधील शिव तांडव शिल्प विशेष प्रसिद्ध आहेत.

अधिक वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

मंदिरांतील शिव तांडवाच्या प्रतिमा

दक्षिण भारतातील बहुतांश सर्वच मंदीरातील शिल्पांमध्ये शिव तांडव शिल्प आढळते. मराठवाड्यातील अनेक मंदिरांवर शिव तांडवाच्या प्रतिमा शिल्पित केलेल्या आढळतात. अंबेजोगाई येथील अमलेश्वर मंदिरातील स्तंभावर, परशुरामेश्वर मंदिराच्या अंतराळाच्या द्वारशाखांवर, नागनाथ-कुमारगुडी मंदिरांच्या जंघेवर अशाच स्वरूपाचे शिव तांडवाचे अंकन दिसते. मराठवाड्यातील या शिल्पजडित मंदिरांचा कालावधी ११ वे ते १३ वे शतक इतका आहे. महाराष्ट्रातील शिल्पांपेक्षा दक्षिणेकडील शिल्पांमध्ये भिन्नत्त्व आढळते. या शिल्पांमध्ये शिवाच्या पायाखाली दैत्य- अपस्मार दर्शविला जातो.

उत्तर भारतातील तांडव नृत्य प्रतिमा

उत्तर भारतात तुलनेने या प्रतिमा कमी प्रमाणात आढळतात. उज्जैन आणि ग्वाल्हेर येथून मिळालेल्या प्रतिमा विशेष मानल्या जातात. या दोन्ही प्रतिमांमध्ये शिव हा दशभुज असून त्याच्या पायाजवळ नंदी दर्शविला जातो. शिवाच्या हातात सर्प, त्रिशूल, खङ्वांग, डमरू आहे. या प्रतिमांमध्येही वादक दर्शविलेले आहेत. बंगालमधील पाल कलेत शिव नंदीवरच नृत्य करताना दर्शविलेला आहे. त्यामुळे या शिल्पांच्या माध्यमातून कलेतील प्रादेशिक भिन्नता सहजच अधोरेखित करता येते. एकूणच शिव तांडव शिल्प हे भारतीय कला इतिहासातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्प असून या शिल्पाच्या अभ्यासातून भारतीय वैभवशाली परंपरा समजण्यास मदत होते.