सागर भस्मे

मागील लेखातून आपण उर्जास्रोतांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील उद्योगांबाबत जाणून घेऊ या. सर्वप्रथम आपण कापड उद्योगाबाबत जाणून घेऊया. कापूस उत्पादन व निर्यातीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील पहिली कापड गिरणी कासबजी दावर यांनी मुंबई येथे ११ जुलै १८५१ रोजी सुरू केली. त्यापूर्वी १८१८ मध्ये कोलकत्ताजवळ कापड गिरणी उभारण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय कापड उद्योगाच्या इतिहासामध्ये अमेरिकेतील यादवी युद्ध, पहिले व दुसरे महायुद्ध या घटना भारतीय कापड उद्योगासाठी फायदेशीर ठरल्या. पण, ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती भारतीय कापड उद्योगासाठी मारक ठरली. भारतात सुती कापडाच्या उत्पादनात महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पंजाब ही राज्ये अग्रेसर आहेत. भारतामध्ये सर्वाधिक कापड गिरण्या तमिळनाडू राज्यात असून, सर्वांत जास्त कापसाचे उत्पादन गुजरातमध्ये होते.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Gopi Thotakura First Indian space tourist
गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : ब्लड कॅन्सरवरील ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ उपचार प्रणाली अन् भारतातील प्रदूषण, वाचा सविस्तर…

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत

ताग उद्योग

भारतामध्ये तागाची पहिली गिरणी १८५४ मध्ये कोलकत्यापासून २० किलोमीटर अंतरावरील रिश्रा येथे सुरू झाली. जगातील एकूण ताग उत्पादनापैकी जवळपास ६०% उत्पादन भारतात होत असून, ताग उत्पादनाच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे; तर निर्यातीच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कापड उद्योगानंतरचा हा दुसरा महत्त्वाचा वस्त्रोद्योग आहे.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाने या उद्योगाला चांगलेच बळ दिले. मात्र, जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन क्षेत्र तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये गेले आणि ९० टक्के गिरण्या या भारतात होत्या. हा उद्योग कच्च्या मालावर आधारलेला असल्यामुळे सर्व ताग गिरण्या उत्पादन क्षेत्रातच आहेत. भारताच्या एकूण ताग उत्पादनामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक वाटा पश्चिम बंगाल या राज्याचा आहे. कच्च्या मालाची उपलब्धता व हुगळी नदीमधून होणारी स्वस्त मालवाहतूक यामुळे पश्चिम बंगालमध्ये या उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे.

रेशीम उद्योग

भारतातील पहिली रेशीम कापड गिरणी इंग्रजांनी १८३२ मध्ये कोलकत्याजवळील हावडा येथे सुरू केली होती. रेशीम उत्पादनात भारताचा जगामध्ये दुसरा; तर चीनचा ८०% उत्पादनासह प्रथम क्रमांक लागतो. रेशीम कापडाचे जगाच्या एकूण उत्पादनापैकी १५% उत्पादन हे भारतात होते. भारतामध्ये मलबरी रेशीमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचे रेशीम असून, त्याचे उत्पादन कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत जास्त प्रमाणात घेतले जाते.

भारतात रेशमाच्या पाच प्रकारच्या जातींचे उत्पादन होते. ज्यामध्ये मलबरी, ट्रॉपिकल टसर, ओकटसर, इरी व मुंगा यांचा समावेश होतो. मणिपूर, मिझोराम, नागालँड या राज्यांत ओक या झाडापासून ओकटसर हे रेशीम मिळविले जाते; तर आसाम, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांत इरी रेशीमचे उत्पादन घेतले जाते. ते कमी दर्जाचे रेशीम आहे. भारतातील रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक आहे. जगामध्ये भारताची मक्तेदारी असणाऱ्या मुंगा या रेशमाचे उत्पादन आसाममध्ये होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : कृष्णा नदी प्रणाली

साखर उद्योग

जागतिक साखर उत्पादनामध्ये भारताचा ब्राझीलनंतर दुसरा क्रमांक लागतो. भारत जगातील साखरेचा सर्वांत मोठा उपभोक्ता आहे. देशातील पहिला साखर कारखाना बिहारमधील बेतिया येथे सुरू करण्यात आला होता. भारतामध्ये सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात असून, साखरेचा सर्वाधिक उताराही महाराष्ट्रातच आहे. पूर्ण देशाच्या १/४ एवढे साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वांत मोठे साखर उत्पादक राज्य असून, त्यानंतर महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. दक्षिणेकडील उसाच्या जातींमध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त असते. गाळप हंगामदेखील उत्तरेपेक्षा दक्षिणेत बराच मोठा आहे. भारत सरकार उसासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर न करता एफ.आर.पी. जाहीर करते.

कागद उद्योग

हा उद्योग कच्च्या मालावर आधारित आहे. तसेच हा उद्योग वनांवर आधारित उद्योग व रासायनिक उद्योग या दोघांचे मिश्रण आहे. या कच्च्या मालामध्ये बांबू, गवत, चिंध्या, टाकाऊ कागद, लाकडाचा भुसा, गहू व तांदूळ इत्यादींचा वापर होतो. भारतातील पहिला कागद कारखाना १८३२ मध्ये सेहरामपूर येथे सुरू करण्यात आला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे नंतरच्या काळात बालीगंज, लखनऊ, पुणे, राणीगंज व टिटागड येथे कागद गिरण्या स्थापन करण्यात आल्या. भारतामध्ये सर्वाधिक कागद कारखाने महाराष्ट्रामध्ये असून, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर कारखाना हा देशात सर्वाधिक स्थापित क्षमता व सर्वाधिक उत्पादन घेणार कारखाना आहे.

१९९७ पासून हा उद्योग परवानारहित व नियंत्रणमुक्त करण्यात आला असून कागद उद्योगांमध्ये १०० टक्के थेट परकीय विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. जागतिक दरडोई ५७ किलोच्या तुलनेत भारताचा दरडोई कागदाचा वापर सुमारे १३ किलो असून, भारतात कागदाचा वापर दरवर्षी जवळपास सात टक्क्यांनी वाढत आहे.

औषध उद्योग

जागतिक औषध उत्पादनामध्ये भारताचा आठ टक्के एवढा वाटा असून, उत्पादनामध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक आहे. भारताला जगाची फार्मसी कॅपिटल म्हणून ओळखले जाते. हा उद्योग भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देतो. कारण- भारतीय औषधे जगभरातील देशांमध्ये निर्यात होतात.

रासायनिक खत उद्योग

भारतातील पहिला खत कारखाना चेन्नईजवळ राणीपेठ येथे १९०६ मध्ये स्थापन करण्यात आला. खत उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक असून, उपभोगाच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे. उत्पादनाच्या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकांवर चीन व अमेरिका हे देश आहेत. उपभोगाच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक आहे.