सागर भस्मे

भारताचे भूतानसोबत विशेष संबंध आहेत. भूतान हा भारताचा बऱ्याच काळापासूनचा मित्र आहे आणि दोन्ही देशांमध्ये बर्‍याच गोष्टी समान आहेत. या लेखातून आपण भारत-भूतान संबंधांबाबत जाणून घेऊ या. भूतान हा भारताच्या शेजारी असलेला एक छोटासा देश आहे. भारत आणि भूतान यांच्यादरम्यानची सीमा सुमारे ६६९ किमी एवढी आहे. भौगोलिकदृष्ट्या भूतान हे भारतासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. कारण- भारतातील सिलिगुडी कॉरिडॉर भूतानच्या शेजारी आहे. हे सिलिगुडी कॉरिडॉर भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडते. भारताच्या सुरक्षेसाठी भूतानचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : भारताच्या परराष्ट्र धोरणाचे टप्पे

व्यापाराच्या दृष्टीनेही भूतान भारतासाठी खूप महत्त्वाचा देश आहे. भूतान आणि भारत या दोन देशांत मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. २०२१-२२ मध्ये भारताचा भूतानसोबतचा व्यापार १.४ अब्ज डॉलरवर पोहोचला. हा व्यापार भूतानच्या एकूण व्यापाराच्या ८०% आहे. या व्यापाराअंतर्गत भारतातून भूतानमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

जलविद्युत प्रकल्प क्षेत्र हा भूतानच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख स्तंभ आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी भारताकडून भूतानला मदत केली जाते. मात्र, काही जलविद्युत प्रकल्प असे आहेत की, ज्यामुळे भारत आणि भूतान यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवाय संरक्षणाच्या दृष्टीनेही भूतान भारतासाठी अतिशय महत्त्वाचा देश आहे. उदा. द्यायचे झाल्यास २०१७ मध्ये जेव्हा भारत व चीन यांच्यामध्ये डोकलाम सीमेवर तणाव निर्माण झाला, तेव्हा भूतानने भारतीय सैनिकांना भूतानमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती.

संस्कृतीच्या बाबतीतही भारत आणि भूतानमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही देशांमध्ये बौद्ध धर्मीय लोक मोठ्या संख्येने राहतात. भारत भूतानला त्यांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि तेथील प्राचीन व ऐतिहासिक गोष्टींचे संरक्षण करण्याकरिता मदत करतो. भूतानमधील अनेक युवक भारतात शिक्षणासाठी येत असतात. मात्र, काही वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) नुसार, भारतात शिक्षण घेणाऱ्या भूतानच्या विद्यार्थ्यांची संख्या २०१२-१३ मध्ये २,४६८ होती; जी आता २०२०-२१ मध्ये १८२७ पर्यंत कमी झाली आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : आंतरराष्ट्रीय संबंध : परराष्ट्र धोरण आणि त्याचे निर्धारक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि भूतानमधील संबंधांमध्ये काही आव्हानेदेखील आहेत. त्यापैकी सर्वांत मोठे आव्हान म्हणजे चीन. चीन हा दुसरा मोठा देश भूतानचा शेजारी आहे. भूतानच्या काही भागांवर चीनकडून दावा केला जातो. त्यामुळे अनेक वर्षांपासून भूतान आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. भविष्यात चीनने या विवादित भागांचा ताबा मिळवला, तर ते भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भारत आणि भूतान त्यांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करतात. खरे तर चीन हा भूतानमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. याव्यतिरिक्त भारत-भूतान सीमेवर अनेकदा काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यांचा प्रभाव अनेकदा व्यापारावरही दिसून येतो.