scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : भारतीय देशांतरित जनसमूह म्हणजे काय? त्याचे किती प्रकार पडतात?

या लेखातून आपण भारतीय देशांतरित जनसमूह किंवा इंडियन डायस्पोरा म्हणजे काय? ते कोण असतात, याबाबत जाणून घेऊया.

Indian Diaspora
भारतीय देशांतरित जनसमूह म्हणजे काय? त्याचे किती प्रकार पडतात? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण जागतिक व्यापार संघटना काय आहे, ती कधी सुरू झाली, तिची रचना आणि कार्ये याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतीय देशांतरित जनसमूह किंवा इंडियन डायस्पोरा म्हणजे काय? ते कोण असतात, याबाबत जाणून घेऊया. ‘डायस्पोरा’ या इंग्रजी शब्दाचा उगम एका ग्रीक शब्दातून झाला आहे, ज्याचा अर्थ ‘विखुरणे’ असा होतो. डायस्पोरा अर्थात देशांतरित जनसमूह म्हणजे माणसांचा असा समूह, जो आपल्या मातृभूमीपासून दूर जाऊन इतर देशांमध्ये स्थायिक झालेला असतो.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!
How is Japanese Savings Account Beneficial
जपानी बचत खाते भारतीय शेअर बाजारासाठी कसे ठरतेय फायदेशीर? वाचा सविस्तर
bike taxis in india
मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या बाईक-टॅक्सीला भारतात अधिक व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल?

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक व्यापार संघटना कधी स्थापन झाली? ती स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?

या शब्दाचा वापर सर्वप्रथम बॅबिलोनिया युद्धानंतर पॅलेस्टाइनमधून हद्दपार झालेल्या ज्यूंसाठी करण्यात आला. यानंतर देशांतरित जनसमूह समाजाची काही ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित झाली. बळजबरीने हद्दपार केला गेलेला, छळ सोसणारा, सर्व काही हरवलेला व आपल्या मूळ स्थानी परत जाऊ इच्छिणारा, असा समूह म्हणजे देशांतरित जनसमूह असे मानले जात असे.
परंतु, आजच्या काळात देशांतरित जनसमूहाची व्याख्या बदलली आहे. ज्यांना समान सामूहिक जाणिवा व अस्मिता असतात, अशा परदेशस्थित समूहालाही देशांतरित जनसमूह म्हणून संबोधले जाते.

या गटाला वसाहतवादाची अथवा छळवणुकीची पार्श्वभूमी असतेच असे नाही. देशांतरित जनसमूह निर्माण होण्याच्या कारणांमध्ये असणाऱ्या वैविध्यामुळे त्याची एकाच पद्धतीने ठोस व्याख्या करता येणे कठीण आहे. त्याऐवजी देशांतरित जनसमूहांना निरनिराळ्या प्रकारांमध्ये विभागून त्यांचा अभ्यास करणे अधिक सोयिस्कर आहे. याच अनुषंगाने रॉबिन कोहेन यांनी देशांतरित जनसमूहचे चार प्रकार सांगितलेले आहेत. ते खालीलप्रमाणे :

१) पीडित देशांतरित जनसमूह (Victim diaspora) : ज्यांना छळ झाल्याने अथवा छळ होण्याच्या भीतीने विस्थापित व्हावे लागते किंवा ज्यांना त्यांच्या मूळ देशातून बळजबरीने बाहेर घालवले जाते, अशा गटांना पीडित ‘देशांतरित जनसमूह’ असे म्हणतात.

२) मजूर देशांतरित जनसमूह (Labour diaspora) : यात मुख्यतः भारतीय, इटालियन व तुर्की कामगारांचा समावेश होतो. यातील भारतीय स्थलांतरित कामगारांचा समूह सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.

३) वासाहतिक देशांतरित जनसमूह (Imperial diaspora) : ज्यांना वसाहतीकरणाच्या ओघात स्वतःच्या देशातून स्थलांतरित होऊन इतरत्र स्थायिक व्हावे लागले, अशा समूहांना वासाहतिक देशांतरित जनसमूह असे म्हणतात.

४) व्यापारी देशांतरित जनसमूह (Trade diaspora) : ज्याची व्यापारकौशल्ये दुसऱ्या देशात विकसित होऊन उपयोगास येतात, अशा समूहाला व्यापारी देशांतरित जनसमूह असे म्हणतात. या संदर्भात हे लक्षात असायला हवे की, देशांतरित जनसमूह समाजापुढे दुहेरी आव्हान असते. एक म्हणजे त्यांना आपल्या मूळ समुदायाची वेगळी अस्मिता टिकवून ठेवायची असते; परंतु त्याचबरोबर त्या नव्या देशाचा नागरिक म्हणूनही स्वतःला सामावून घ्यायचे असते.

परदेशस्थ भारतीय हे अधिकृतपणे अनिवासी भारतीय ( NRI ) आणि भारतीय वंशाचे ( PIO ) लोक असतात, जे भारताबाहेर राहतात किंवा मुळचे भारतीय आहेत. भारत सरकारच्या मते, अनिवासी भारतीय हे भारताचे नागरिक आहेत, जे सध्या भारतात राहत नाहीत, तर भारतीय वंशाचे लोक या शब्दाचा अर्थ भारतीय जन्म किंवा वंश असणारे लोक, जे इतर देशांचे नागरिक आहेत. भारताचे परदेशी नागरिकत्व (OCI) भारतीय वंशाच्या लोकांना आणि भारतीय वंशाचे लोक नसलेल्या, परंतु भारतीय वंशाच्या लोकांशी विवाह केलेल्या व्यक्तींना दिले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक बँक ही संस्था काय आहे? ती स्थापन करण्यामागे उद्देश काय होता?

OCI दर्जा असलेल्या व्यक्तींना ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया ( OCIs ) म्हणून ओळखले जाते. थोडक्यात, विदेशी पासपोर्टसह भारताला भेट देण्यासाठी OCI स्थिती हा एक कायमस्वरूपी व्हिसा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, ३२ दशलक्ष अनिवासी भारतीय आणि पीआयओ (ओसीआयसह) भारताबाहेर राहतात. दरवर्षी २.५ दशलक्ष (२५ लाख) भारतीय परदेशात स्थलांतरित होतात, जी जगातील सर्वाधिक वार्षिक स्थलांतरितांची संख्या आहे.

देशांतरित जनसमूहाचे आर्थिक विकासात योगदान :

देशांतरित जनसमूह समाज बरेचदा त्यांच्या मूळ देशाच्या आर्थिक विकासात भर घालतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या देशाच्या अस्मितेशी त्यांची जोडलेली नाळ जुळलेली असते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार भारतीय देशांतरित जनसमूह समाज हा जगातील सर्वांत मोठा देशांतरित जनसमूह समाज आहे.

जगाच्या विविध भागांमध्ये ३२ दशलक्षांहून अधिक भारतीय वंशांचे लोक आढळून येतात. इतर युरोपिय देशांपेक्षा इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिकेत त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनिवासी भारतीय हे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १% आहेत. परंतु, भारताच्या विकासात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांनी भारतात पाठवलेले धन देशाला फायदेशीर ठरते. भारत याबाबतीतही आघाडीवर आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०२२ साली भारतात बाहेरून आलेल्या धनाची रक्कम जवळपास ८९.१ दशलक्ष डॉलर इतकी होती. याचा वाटा भारताच्या स्थूल आर्थिक उत्पन्नाच्या (GDP) २.८१ टक्के इतका आहे.

आपल्या मूळ देशात धन पाठवण्याखेरीज देशांतरित जनसमूह त्या देशातील परकीय थेट गुंतवणुकीतही (FDI) मोलाची भर घालू शकतात. तसेच व्यापारउदीम आणि कौशल्यविकासातही हातभार लावू शकतात. एखाद्या देशाचा देशांतरित जनसमूह समाज मोठ्या प्रमाणात एखाद्या प्रदेशात असेल, तर त्या दोन देशांतील संबंध वाढीस लागलेले दिसून येतात. देशांतरित जनसमूह समाज त्यांनी मिळवलेली कौशल्ये, संपर्क, संसाधने आणि अनुभव मूळ देशातील लोकांकडे हस्तांतरित करतात. त्यामुळे तेथील स्थानिकांच्या व्यापाराला व कौशल्यविकासाला चालना मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc international relation what is indian diaspora and its type mpup spb

First published on: 11-09-2023 at 17:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×