UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) दुबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेले ‘भारत मार्ट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या यूएई दौर्‍यादरम्यान भारतातील लघु उद्योजक आणि व्यापार्‍यांसाठी गोदाम सुविधा असलेल्या ‘भारत मार्ट’चे उद्घाटन केले.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम, या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

भारत मार्ट ही एक गोदाम सुविधा आहे; जी संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे व्यापार आणि विविध उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत मार्टमध्ये शोरूम, गोदामे, कार्यालये आणि इतर सहायक सुविधा असतील. त्यात जड मशिनरीपासून ते किरकोळ वस्तूंपर्यंत सर्व श्रेणीतील वस्तूंचा समावेश असेल. मुख्य म्हणजे ‘भारत मार्ट’ विविध श्रेणींच्या भारतीय उत्पादनांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून काम करेल. याचा अर्थ असा की, इथे एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध असतील. ही सुविधा भारतासाठी, तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील व्यापारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारत मार्ट भारतीय कंपन्यांना आफ्रिका आणि युरोपसह युनायटेड स्टेट्समध्ये व्यापाराचा विस्तार करण्यास मदत करेल. या सुविधेमुळे भारत आणि उर्वरित जगामध्ये माल पाठविण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्चदेखील कमी होईल.

भारत मार्टमुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने प्रदर्शित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भारत-यूएई व्यापार संबंधदेखील मजबूत होतील. २०२२-२३ पर्यंत संयुक्त अरब अमिरात (यूएई )सोबतचा भारताचा व्यापार ८५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. भारतात ३.५ बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसह थेट परकिय गुंतवणुकी(एफडीआय)मध्ये संयुक्त अरब अमिरात चौथ्या क्रमांकाचा देश व भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदारदेखील आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) एमएसपी संदर्भातील संजय अग्रवाल समिती

किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, तसेच डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. अशा विविध मागण्यासह पंजाबमधील शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पावित्रा घेत दिल्लीकडे कुच केली आहे. हे आंदोलन अशावेळी सुरू आहे, जेंव्हा मोदी सरकारने जुलै २०२२ मध्ये स्थापन केलेली संजय अग्रवाल समिती किमान आधारभूत किंमत अधिक प्रभावी व पारदर्शक लागू करण्याच्या दिशेने काम करीत आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे, त्यांची रचना आणि अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही समिती नेमकी काय आहे? याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

पंतप्रधान मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर या समितीची घोषणा केली होती. शून्य बजेटवर आधारित शेतीला चालना देणे, देशाच्या बदलत्या गरजा ओळखून पीक घेण्याची पद्धत आणि पिकांच्या प्रकारांमध्ये बदल करणे, तसेच किमान आधारभूत किंमत अधिक प्रभावी आणि पारदर्शकता लागू करणे, यांसह विविध विषयांसंदर्भात शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने १८ जुलै २०२२ रोजी या समितीसंदर्भातील अधिसूचना जाहीर केली. तसेच माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांना या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

या समितीत एकूण २६ सदस्य आहेत. त्यामध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, दोन कृषी अर्थतज्ज्ञ, एक पुरस्कारविजेता शेतकरी, संयुक्त किसान मोर्चा (SKM)व्यतिरिक्त इतर शेतकरी संघटनांचे पाच प्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था किंवा गटांचे दोन प्रतिनिधी, कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे एक सदस्य, कृषी विद्यापीठांमधील तीन प्रतिनिधी, केंद्रीय सचिव स्तरावरील पाच प्रशासकीय अधिकारी, कोणत्याही चार राज्यांतील चार प्रशासकीय अधिकारी व कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांचा समावेश आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.