scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात?

आपत्ती व्यवस्थापन : या लेखातून आपण आपत्ती म्हणजे काय? आणि त्याच्या प्रकारांबाबत जाणून घेऊया.

Disaster Management
आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

वृषाली धोंगडी

मानव अगदी सुरुवातीपासूनच नैसर्गिक संकटे आणि आपत्तींना तोंड देत आहे. नैसर्गिक संकटे/धोके व आपत्ती आणि त्यांचे मानवावर होणारे परिणाम यांचा तपशीलवार अभ्यास करण्यापूर्वी काही मूलभूत संज्ञा समजून घेणे योग्य राहील. या लेखातून आपण ते सजून घेऊ. मानवावर विपरीत परिणाम करणाऱ्या बदलांना धोके / संकटे (Hazards) म्हणतात. आपत्तीची व्याख्या “लोक, संरचना किंवा आर्थिक मालमत्ता यांना धोका निर्माण करणारी आणि आपत्तीला कारणीभूत ठरणारी घटना”, अशी केली जाते. आपत्ती एक तर मानवनिर्मित असू शकते किंवा ती आपल्या वातावरणात नैसर्गिकरीत्या उदभवू शकते. आपत्ती (Disaster – फ्रेंचमध्ये des म्हणजे ‘वाईट’ आणि aster म्हणजे ‘स्टार’) ही एक मानवनिर्मित किंवा नैसर्गिक घटना आहे; ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होते.

Disaster Management
UPSC-MPSC : आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व काय? देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रचना कशी?
disaster types
UPSC-MPSC : आपत्तीचे प्रकार कोणते? त्यांचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम होतो?
state council of ministers
UPSC-MPSC : राज्य मंत्रिमंडळाची रचना कशी असते?
what is water pollution
UPSC-MPSC : पर्यावरण : जलप्रदूषण म्हणजे काय?

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘आम्ल वर्षा’ म्हणजे काय? त्याची कारणे कोणती?

आपत्तीची व्याख्या :

“एखाद्या समाजाच्या कार्यामध्ये गंभीर व्यत्यय होणे; ज्यामुळे व्यापक मानवी, भौतिक किंवा पर्यावरणीय हानी होते, जी प्रभावीत समाजाची स्वतःची संसाधने वापरून सामना करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते,” अशी आपत्तीची व्याख्या करता येईल. त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक बॅंकेनेही आपत्तीची व्याख्या केली आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार आपत्ती म्हणजे “अचानक किंवा मोठी दुर्दैवी घटना; ज्यामुळे समाजाच्या (किंवा समुदायाच्या) मूलभूत ढाच्यात आणि सामान्य कार्यामध्ये व्यत्यय येतो.’’ तर जागतिक बँकेनुसार आपत्तीची (World Bank) म्हणजे मर्यादित कालावधीची असाधारण घटना; ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतो. जीवितहानी, मालमत्ता, पायाभूत संरचना, अत्यावश्यक सेवा किंवा उपजीविकेच्या साधनांचे नुकसान होते.

आपत्तींचे वर्गीकरण हे आपत्तीची कारणे, शमन धोरणे किंवा समाजावरील त्यांचे परिणाम यावर अवलंबून असते. नैसर्गिक, मानवनिर्मित, सामाजिक-नैसर्गिक अशा साधारणत: तीन भागांत आपत्तीचे वर्गीकरण केले जाते.

१) नैसर्गिक आपत्ती : ही आपत्ती निसर्गामुळे घडते. त्यात माणसाची भूमिका नसते. उदाहरणार्थ- भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळे, त्सुनामी, पूर, दुष्काळ, भूस्खलन, इत्यादी.

२) मानवनिर्मित आपत्ती : ही आपत्ती माणसाच्या अनिष्ट क्रियाकलापांमुळे घडते. उदाहरणार्थ- स्फोट, विषारी कचऱ्याची गळती, हवा, पाणी व जमीन प्रदूषण, धरण फुटणे, युद्ध आणि गृहकलह, दहशतवाद.

३) सामाजिक-नैसर्गिक आपत्ती : ही आपत्ती नैसर्गिक आणि मनुष्याच्या चुकीच्या कृतींच्या एकत्रित परिणामामुळे घडते. उदाहरणार्थ- पूर आणि दुष्काळाची वारंवारता, झाडांची अंदाधुंद तोडणी, डोंगराळ भागात रस्ते बांधणे, बोगदे खोदणे, खाणकाम व उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती.

भारतातील नैसर्गिक संकट व आपत्ती :

उपखंडीय परिमाण, भौगोलिक परिस्थिती आणि मान्सूनच्या वर्तनामुळे भारताला वर्षानुवर्षे दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा विविध नैसर्गिक धोके आणि आपत्तींना सामोरे जात आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक किंवा एकत्रित आपत्ती परिस्थितींचा सामना करावा लागण्याची शक्यता असताना, २७ राज्ये / केंद्रशासित प्रदेश या आपत्तींसाठी अधिक असुरक्षित आहेत.

दुष्काळ, पूर, चक्रीवादळ व भूकंप या चार प्रमुख आपत्ती देशाच्या विविध भागांवर प्रतिकूल परिणाम करतात. भारतातील एकूण राज्यांपैकी एका राज्याला (पश्चिम बंगाल) चारही प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो; तर सात राज्यांना तीन प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो, १० राज्यांना दोन प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो नऊ राज्यांना एका प्रकारच्या आपत्तीचा सामना करावा लागतो. एकाच वेळी देशाच्या विविध भागांना प्रभावीत करणाऱ्या एक किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारच्या आपत्तींचा अनुभव घेणे ही काही सामान्य बाब नाही. उदाहरणार्थ- एकाच वेळी ब्रह्मपुत्रा खोऱ्यात पूर, राजस्थानमध्ये दुष्काळ व काही किनारी भागांत चक्रीवादळे येतात.

आपत्ती नियमितपणाने घडतात आणि अशा सर्व आकस्मिक परिस्थितींना तोंड देण्याची उत्तम तयारी असूनही नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक खर्च वर्षानुवर्षे वाढतच जातो. सर्वांत त्रासदायक घटक म्हणजे अशा आपत्ती देशाच्या विविध भागांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : जैव-भूरासायनिक चक्रे म्हणजे काय?

महत्त्वाचे मुद्दे :

  • भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५५% क्षेत्र भूकंप क्षेत्र झोन III-IV मध्ये आहे आणि भूकंपासाठी असुरक्षित आहे.
  • भारतातील निव्वळ पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ६८% क्षेत्र दुष्काळामुळे असुरक्षित आहे.
  • भारतातील ४० दशलक्ष हेक्टर जमिनीला पुराचा धोका असतो.
  • भारतातील विशेषत: पूर्वेकडील किनारा आणि गुजरात किनारपट्टीलगतच्या एकूण भूभागापैकी ८% भूभाग उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांमुळे असुरक्षित आहे.
  • उप-हिमालयीन प्रदेश आणि पश्चिम घाट भूस्खलनास (Landslides) असुरक्षित आहेत.
  • भारतातील ७,५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीपैकी ५,७०० किमी किनारपट्टीला उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आणि त्सुनामीचा धोका असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc what is disaster management defination mpup spb

First published on: 13-09-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या

×