Success Story: आज आम्ही देव तोमर नावाच्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास घेऊन आलो आहोत. त्याचे आजोबा एक दरोडेखोर होते. आजोबा दरोडेखोर असल्याने अनेक जण देव तोमर काहीही करू शकणार नाही, असे म्हणायचे. परंतु, कठोर परिश्रम आणि समर्पणाने ग्वाल्हेरच्या देव तोमरने स्वप्न साकार करून दाखवले.
यूपीएससी उत्तीर्ण होण्यापूर्वी देव नेदरलँड्समधील फिलिप्स कंपनीच्या मुख्यालयात शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता. त्याचा वार्षिक पगार ८८ लाख रुपये होता. लोक म्हणायचे की देव आयुष्यात काहीही करू शकणार नाही. पण, देवने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वांना चुकीचे सिद्ध केले. देवने यूपीएससी परीक्षेत ६२९ वा क्रमांक मिळवला आहे, हे त्याच्यासाठी खूप मोठे यश आहे.
अलीकडील इन्स्टाग्राम पोस्टमध्ये देव यांनी लिहिले की, “सहा प्रयत्नांचा यूपीएससी प्रवास अखेर एआयआर ६२९ सह अंतिम टप्प्यात आला. अनेक अडथळे आणि हृदयद्रावक परिस्थितीसह हा एक प्रवास होता. हे यश चार मुख्य आणि तीन सलग मुलाखतींनंतर आले आहे. मी २०१९ मध्ये एक चांगले कॉर्पोरेट करिअर सोडण्याचा धोका पत्करून हा प्रवास सुरू केला होता, पण सहा वर्षांच्या अथक परिश्रम आणि झोप न घेतललेल्या रात्रींनंतर मी यशस्वी झालो.”
आजोबा होते दरोडेखोर
देवचे आजोबा राम गोविंद सिंग तोमर, एकेकाळी चंबळच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दरोडेखोर होते. पण, देवचे वडील बलवीर सिंग तोमर यांनी त्याला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. देव आयआयटी पदवीधर असून त्याने संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. २०१९ मध्ये त्याने नोकरीसोबतच यूपीएससीची तयारी सुरू केली.
वडिलांमुळे मिळाली प्रेरणा
देवला त्याच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली. त्याच्या वडिलांनी त्याला उच्च ध्येये ठेवण्यास आणि कुटुंबाला गौरव मिळवून देण्यास प्रोत्साहित केले. देवने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत तयारी सुरू ठेवली. तो विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. त्याने बहुतेक अभ्यास स्व-अभ्यास आणि ऑनलाइन संसाधनांद्वारे केला, त्याने अभ्यासक्रमानुसार तयारी केली.
लोकांनी मारले टोमणे
एका मुलाखतीत देवने सांगितले की, ‘लोक म्हणायचे की, माझे आजोबा चंबळचे दरोडेखोर होते आणि मी कधीही काहीही करू शकणार नाही.’ पण, आज मी माझ्या शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे.