Success Story: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यादरम्यान यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. अशा यशोगाथांमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. आज अशीच एक थक्क करणारी नवी यशोगाधा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या यशस्वी विद्यार्थ्याचे नाव रवी राज असून, जो गेल्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशोदायी प्रवासात त्याच्या आईने त्याला मोलाची साथ दिली होती.
बिहारमधील नवादा येथील तरुण उमेदवार रवी राजने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत १८२ वा क्रमांक मिळवला. धडधाकट व्यक्ती, खूप मेहनत, चांगली बुद्धिमत्ता, उत्तम आर्थिक परिस्थिती, अभ्यासाच्या सर्व सोई-सुविधा असूनही या परीक्षेत कित्येकांना यश मिळविणे शक्य होत नाही. इतकी ही कठीण परीक्षा आहे. त्यामुळेच दृष्टिहीन असलेल्या रवीने मिळविलेले हे यश विशेष उल्लेखनीय ठरते. तो काहीही पाहू शकत नाही. परंतु, तरीही त्याने हे कठीण आव्हान स्वीकारून त्याला धैर्याने तोंड दिले आणि यश मिळवून दाखवले. अखेर प्रयत्नांती परमेश्वर हे त्याने स्वत:च्या बाबतीत खरे करून दाखवले, असे त्याचे उदाहरण पाहता म्हणता येईल नाही का?
मुलाच्या खडतर प्रवासात आईचीही साथ

रवीला यूपीएससी परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी त्याच्या आईचा मोलाचा वाटा आहे. त्या दररोज त्याच्या अभ्यासातील पुस्तके त्याला मोठ्याने वाचून दाखवायच्या आणि रवी ते ऐकून नंतर सराव करताना त्यासंबंधित प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवायचा. पुस्तकांचे वाचन आणि श्रवणातून ऐकलेला भाग स्मरणात ठेवून, त्यावरून उत्तरांचा सराव करणे या दोन्ही गोष्टी आई-मुलाच्या तयारीचा अविभाज्य भाग होत्या. शारीरिक आणि भावनिक आव्हाने असूनदेखील दोघांनीही कधीही हार मानली नाही.

आई-मुलाच्या अभ्यासाच्या अनोख्या दिनचर्येत रवीच्या आई स्वतः मोठ्याने पुस्तके वाचण्याव्यतिरिक्त, स्वयंपाक करताना रवीसाठी YouTube वर व्याख्याने लावायच्या आणि नंतर त्याला त्याची उत्तरे लिहिण्यास आणि रेकॉर्ड करण्यास मदत करायच्या. दररोज १० तासांचा अभ्यास, दोघांचाही दृढ निश्चय यांच्याद्वारे रवी आणि त्याच्या आईने समोर असलेल्या कठीण आव्हानांनाच ताकद बनवून, अखेर विजय मिळवून दाखवला.

बीपीएससी परीक्षेतही बाजी

यापूर्वी रवीने ६९ व्या बीपीएससी परीक्षेत ४९० वा क्रमांक मिळवला होता आणि त्याची महसूल अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्याने त्यातून सुट्टी घेऊन यूपीएससीची तयारी सुरू ठेवली होती.