मानवाच्या क्रांतीमध्ये वेगवेगळे बदल होत गेले त्यामध्ये राहणीमान, समाज व्यवस्था आणि अन्नसेवनाचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये अन्नाच्या बाबतीत सध्याच्या काळातील महत्त्वाचा बदल म्हणजे भाज्यांचे निर्जलीकरण. हे तंत्रज्ञान मानवाला फार जुन्या काळापासून ज्ञात आहे. ही पद्धत अन्नप्रक्रियेतील फार जुन्या काळापैकी एक आहे.

निर्जलीकरण केलेल्या जेवणाच्या उच्च गुणवत्तेमुळे ज्या भाज्यांचे मूल्य जास्त असते त्यांना अधिक प्राधान्य दिले जाते. या व्यतिरिक्त जलद आणि सोयीस्कर पाककृतीवर जास्त भर दिला जातो. विविध प्रक्रिया वापरून भाज्या वाळवल्या जातात म्हणजेच त्यांचे निर्जलीकरण केले जाऊ शकते. या सुकवण्याच्या तंत्राचा प्रकार आहे.

भाजीपाला निर्जलीकरण बाजारपेठेचा आकार २०२४ ते २०३५ यामध्ये ४० टक्के वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या या भाज्यांची बाजारपेठ ८८.२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे व ती २०३५ पर्यंत ८.१% दराने वाढवून २०० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही उल्लेखनीय वाढ आपल्याला या व्यवसायामध्ये संधी शोधण्यास प्रवृत्त करत आहे.

भारताला नैसर्गिक संपन्नता लाभल्यामुळे भारतामध्ये बारा महिने ताजा भाजीपाला व फळे मिळतात. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये चार ते सहा महिने बर्फ असल्यामुळे त्यांना साठवणूक प्रक्रिया करावी लागते. या महत्त्वाच्या कारणामुळे निर्जलीकरण प्रक्रियेचा शोध लागला. भारतातमध्ये निर्जलीकरण केलेल्या तयार भाज्या वापरण्याचे मार्केटसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायाला संधी आहे.

फळे आणि भाज्या निर्जलीकरण करण्याच्या पद्धती –

१) पारंपरिक पद्धतीनुसार सावलीत सुकवणे : ही पद्धत पारंपरिक म्हणून मानली जाते. यात भाजीपाला सावलीत सुकवला जातो.

२) सोलर किंवा इलेक्ट्रिकल निर्जलीकरण : यामध्ये सोलार किंवा इलेक्ट्रिक ऊर्जेवर वापरली जाणारी साधने वापरून निर्जलीकरण केले जाते.

३) अन्य पद्धती : भाजीपाला निर्जलीकरणाच्या काही नवीन पद्धतीही आलेल्या आहेत. त्यामधील कॅबिनेट ड्रायर, व्हॅक्युम ड्रायर, मायक्रोवेव्ह ड्रायर, टनेल ड्रायर, फ्रिज ड्रायर या यंत्र सामग्रीचा वापर केला जातो.

वरील पद्धती कशा वापरल्या जातात याची सविस्तर माहिती आपल्याला कृषी विद्यापीठाच्या अन्नप्रक्रिया विभागातून मिळू शकते. आपला व्यवसाय निर्माण करण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरते.

बाजारपेठ

सध्या सर्वत्र सुकवलेल्या भाज्या खाण्याची संस्कृती रुजत आहे. त्यांची मागणीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक हॉटेल्स, विविध दुकाने, एपीएमसी, वाशी मार्केट, मुंबई तसेच घरगुती पातळीवरही या फळ व भाजीपाल्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. सूप पावडर, अन्न उद्योग, कॅन केलेले खाद्य उद्योग, एक्सटूडेट स्कॅन फूड उद्योग, बेकरी उद्योग, बेबी फूड उद्योग, पाळीव प्राण्यांचे खाद्य उद्योग, प्रक्रिया केलेले मांस उद्योग या उद्योगांमध्ये देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे

आपल्या रोजच्या वापरात सर्व भाज्या अशा आहेत की ज्या सुकवून लाभदायकरित्या विकल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, आजकाल हिरवा मटार सुकवण्याचे काम खूप चांगले चालू आहे. कारण मटार बाराही महिने खाल्ला जातो. तसेच बटाट्याचा खप बारमाही होत असतो. त्याची भाजी बनवली जाते आणि इतर पदार्थासाठीही बटाट्याचा वापर केला जातो. यंत्राद्वारे बटाट्याची साल काढून त्या सुकवून फायदेशीरपणे विकल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे केळी खूप स्वस्त झाली की अशा कच्च्या केळीच्या चकत्या किंवा तुकडे कापून सुकवले जातात. त्याच प्रमाणे कोबी, पुदिना, टोमॅटो, कांदा या सर्व भाज्या सुद्धा निर्जलीकरण केल्या जातात.

भाजीपाला निर्जलीकरणासाठी काही परवाने व नोंदणी आवश्यक आहे. त्यामध्ये एफएसएसआय नोंदणी अनिवार्य आहे. त्याचबरोबर व्यवसायिकाचा पत्ता, व्यवसायाचा पत्ता व नाव, व्यवसायाचा तपशील, जीएसटी नोंदणी, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मान्यता परवाना इत्यादी प्रक्रियेची आवश्यकता असते.

भाजीपाला साठवणुकीचा कालावधी वाढवण्यासाठी निर्जलीकरण ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. यामध्ये अलीकडे सावलीत सुकवणे ही पद्धत घरगुती स्तरावर न राहता त्याला व्यवसायिक स्वरूप आले आहे. तांत्रिक पद्धतीने भाजीपाल्यातील पाण्याचा अंश कमी करून त्याचा साठवण कालावधी वाढवण्यात येतो. ठराविक हंगामामध्ये मिळणारा भाजीपाला बाजारपेठेत एकदम आल्यास दर पडतात. अशावेळी त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून साठवणुकीचा कालावधी वाढविल्यास त्याची मूल्यवृद्धी होते. शिवाय योग्य वेळी विक्री करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टोमॅटो. टोमॅटोचे बाजार भाव कधी दोन ते पाच रुपये असतात तर कधी शंभर ते दीडशे रुपये असतात. या बाजारभावातील चढउताराचा फायदा घेण्यासाठी टोमॅटोचा निर्जलीकरण केल्यास आपल्या उद्योगांमध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.