आजच्या लेखात विविध टप्प्यांवर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे यूपीएससीच्या अभ्यासासाठीचे दैनंदिन नियोजन कसे असावे, याविषयी जाणून घेणार आहोत.

हल्ली बरेच विद्यार्थी बारावी झाल्यावर लगेचच यूपीएससीच्या तयारीला सुरुवात करतात. या विद्यार्थ्यांकडे पदवी पूर्ण होईपर्यंत ३-४ वर्षांचा वेळ असतो. शिवाय त्यांना आपापला पदवी शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ राखीव ठेवावा लागतो. परिणामी त्यांचे यूपीएससी परीक्षेच्या तयारीचे नियोजन दीर्घकालीन असावे. अशा विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि संदर्भ पुस्तकांची प्राथमिक माहिती प्राप्त करून या परीक्षेसाठी आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करावे. त्या दृष्टीने विचार करता विविध विषयांची ‘एनसीईआरटी’ची पाठय़पुस्तके, मराठीबरोबरच एक इंग्रजी वर्तमानपत्र आणि एखादे नियतकालिक यांच्या वाचनास सुरुवात करावी. अर्थात पदवी शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक कालावधी राखीव ठेवूनच उर्वरित वेळेचे नियोजन करावे. यूपीएससी परीक्षेच्या नावाखाली आपल्या पदवी शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

पदवी शिक्षण उत्तम रीतीने केल्यास यूपीएससीसाठी आवश्यक अनेक मूलभूत कौशल्यांचा विकास साधण्यास मदतच होईल, हे लक्षात घ्या. थोडक्यात, दररोज आणि आठवडय़ाभरात प्राप्त होणारा उर्वरित वेळच यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी उपयोगात आणावा. अशा रीतीने उपलब्ध वेळेचे महाविद्यालयीन पदवी शिक्षण, वर्तमानपत्र आणि ‘एनसीईआरटी’ अशा तीन घटकांसाठी विभागणी करावी. एनसीईआरटीच्या योग्य आकलनाद्वारे संबंधित विषयाचा संकल्पनात्मक पाया मजबूत करता येईल तर वर्तमानपत्रांच्या नियमित वाचनामुळे समकालीन घडामोडी, त्यातील कळीचे मुद्दे याविषयी भान विकसित करता येईल. या काळात अवांतर वाचनाची सवय विकसित करणे उपयुक्त ठरते. उपरोक्त बाबींच्या वाचन-आकलनाबरोबरच आणखी एका बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे ठरते ती बाब म्हणजे लेखन व संवादकौशल्याचा विकास होय. भरपूर वाचन, विविध स्पर्धा व उपक्रमांतील सहभाग आणि सातत्यपूर्ण लेखन याद्वारे लेखन व संवादकौशल्याचा विकास साधता येईल. एकंदर विचार करता ‘उपलब्ध वेळ’ आणि त्यात अभ्यासाचे ‘विविध घटक’ याचे भान ठेवून आपापले दैनंदिन नियोजन आखावे.

अर्थात जे विद्यार्थी पदवीधर असून या वर्षी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी दैनंदिन नियोजनाचा आराखडा अधिक सूक्ष्म व सविस्तरपणे निर्धारित करणे महत्त्वपूर्ण ठरते. वर्तमान स्थितीत विद्यार्थी ज्या परीक्षेची (मुख्य किंवा पूर्व) तयारी करीत आहे, त्यानुसार दैनंदिन नियोजनाचे स्वरूप बदलते. मुख्य परीक्षेसाठी दैनंदिन नियोजनाची आखणी करताना सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्र- नियतकालिके, निबंध आणि लेखन सराव या घटकांसाठी उपलब्ध वेळेचे नियोजन करावे लागते. वर्तमानपत्राच्या वाचनासाठी आवश्यक २ तास राखीव ठेवून उरलेल्या वेळेत दररोज सामान्य अध्ययनातील एक विषय आणि वैकल्पिक विषय अशी तयारी करता येईल. अन्यथा आठवडा विभागून त्यातील चार दिवस सामान्य अध्ययन, दोन दिवस वैकल्पिक विषय आणि एक दिवस नियतकालिके अशी विभागणी करता येते. याशिवाय अभ्यासलेल्या प्रकरणांवरील प्रश्नोत्तरांच्या सरावासाठी आठवडय़ातील काही वेळ राखीव ठेवावा, ज्यामुळे लेखनकौशल्याचा समांतरपणे विकास करता येईल.

थोडक्यात, दिवस अथवा आठवडय़ाची विभागणी करून दैनंदिन नियोजन ठरवता येऊ शकते. तथापि, यातील कोणते ‘नियोजन प्रारूप स्वीकारायचे याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात द्विधावस्था निर्माण होते. त्यामुळे प्रारंभी दोन्ही प्रारूपाचा अवलंब करून त्यातील कोणते प्रारूप आपल्याला जास्त पूरक-पोषक आहे याची खातरजमा करूनच नियोजनाची आखणी/ अंमलबजावणी करावी.

एवढेच नव्हे तर आपापल्या गरजेनुसार या दोन्ही प्रारूपात बदल करता येऊ शकतात आणि स्वतचे निराळे प्रारूपही विकसित करता येते. आपण कोणते प्रारूप स्वीकारतो यापेक्षा निवडलेल्या प्रारूपात उपलब्ध वेळेचा प्रभावी वापर होणे महत्त्वाचे असते.

पूर्वपरीक्षेचा विचार करता सामान्य अध्ययन, नागरी सेवा कलचाचणी, चालू घडामोडी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव या मुख्य घटकांसाठी उपलब्ध वेळेचे वाटप करणे महत्त्वाचे ठरते. वर्तमानपत्रासाठी २ तास, सामान्य अध्ययन ६-७ तास आणि २-३ तास कलचाचणी असे दैनंदिन नियोजन करता येते किंवा उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे आठवडा विभागूनही नियोजन करता येते. दोन्ही परीक्षांसाठी उजळणीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे जाणून दररोज, आठवडा, पंधरवडा, महिना अशा भिन्न कालक्रमातील विशिष्ट वेळ उजळणीसाठी राखीव ठेवावी.

थोडक्यात, एका बाजूला दीर्घकालीन अथवा वार्षकि नियोजन केल्यानंतर त्यास मूर्त स्वरूप देऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दैनंदिन नियोजनाची आखणी व अंमलबजावणी करणे अगत्याचे ठरते.