विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो मुलाखतीविषयक आजच्या या समारोपाच्या लेखात ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’साठी कोणत्या गुणवैशिष्टय़े व क्षमतांची आवश्यकता भासते याची चर्चा करणार आहोत.

मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीत स्वत:चे व्यक्तिगत जीवन, समाज आणि प्रशासनाविषयीचे उमेदवाराचे आकलन महत्त्वाचे ठरते. अर्थात या घटकांविषयीची जाण व भान अत्यंत स्पष्ट असले पाहिजे. संकल्पना, तथ्ये-माहिती, आकडेवारी इ. महत्त्वपूर्ण बाबतीत संदिग्धता वा डळमळीतपणा असू नये. आकलन व विचारातील स्पष्टता ही मुलाखतीसाठी आवश्यक मूलभूत गुणवैशिष्टय़े ठरतात.

मुलाखतीत विचारलेल्या कोणत्याही बाबींसदर्भातील स्वत:चे आकलन उमेदवाराने आत्मविश्वासपूर्वक मांडणे हा एका अर्थी मुलाखतप्रक्रियेचा गाभा आहे. किंबहुना मुलाखत कक्षात प्रवेश केल्यापासून ते मुलाखतीचा समारोप करून कक्षातून बाहेर पडेपर्यंतच्या संपूर्ण संवादप्रक्रियेत आत्मविश्वासाने प्रतिसाद देणे अपेक्षित असते. मुलाखतीसाठी आवश्यक घटकांची व्यवस्थित तयारी आणि पुरेशा मॉक इंटरव्ह्यूद्वारा संवादाची सवय याआधारे आत्मविश्वासाची हमी देता येईल.

निर्णयक्षमता ही मुलाखतीसाठी आवश्यक आणखी एक महत्त्वाची क्षमता होय. विचारलेल्या प्रश्नासंबंधी उमेदवाराचे आकलन काय व कसे आहे, आणि संबंधित मुद्दय़ाचा सारासार विचार करून प्राप्त परिस्थितीत निर्णय घेता येतो का, याची चाचणी विविध प्रश्नांद्वारे केली जाते. समाजवास्तवाचे वाचन जेवढे सूक्ष्म तेवढी निर्णयक्षमता प्रगल्भ होण्याची शक्यता जास्त हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न हाती घ्यावेत. मुलाखत मंडळ काही वेळा थेट परिस्थितीजन्य प्रश्न विचारून उमेदवाराची निर्णयक्षमता तपासण्याचा प्रयत्न करते. अशा स्थितीत दिलेल्या परिस्थितीचा योग्य विचार करून समर्पक निर्णय घेण्याची क्षमता सादर करणे जरुरीचे ठरते.

तसेच उमेदवाराकडे व्यापक, समग्र दृष्टी, आहे की नाही याचीही खातरजमा केली जाते. एखाद्या महत्त्वाचा प्रश्न वा मुद्दय़ासंबंधी मत वा भूमिका मांडताना त्याचा व्यापक व समग्रपणे विचार केलेला असावा. संबंधित मुद्दय़ाची पाश्र्वभूमी, सद्यस्थिती, कारणमीमांसा, त्याविषयी विविध मतप्रवाह, परिणाम, अशा व्यापक दृष्टीने पहावे. कोणताही प्रश्न सुटा सुटा करून न पाहता त्याचे इतर क्षेत्राशी असणारे संबंध बारकाईने अभ्यासावेत.

समाजातील भिन्न स्तर व घटकांचा विचार करताना भावी प्रशासक म्हणून उमेदवाराकडून व्यक्तिनिष्ठतेऐवजी वस्तुनिष्ठता आणि निपक्षपातीपणाची अपेक्षा असते. राजकीय पक्ष, त्यांच्या विचारधारा, विशिष्ट कृती कार्यक्रमास असणारे त्यांचे अग्रक्रम याविषयी उमेदवारांकडून तटस्थतेची अपेक्षा बाळगली जाते. सत्तेत कोणत्याही विचाराचा राजकीय पक्ष असला तरी आपली जबाबदारी तटस्थपणे पार पाडण्याचे कठीण काम प्रशासकांकडून अपेक्षित असते. प्रशासक कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हे तर संविधानाशी बांधील असतात हा विचार समोर ठेवून आपली भूमिका विकसित करणे महत्त्वाचे ठरते.

दुसऱ्या बाजूला, दुर्बल, वंचित घटकांविषयी संवेदनशील वृत्तीचीही अपेक्षा असते. त्यामुळे तटस्थेचा यांत्रिक अर्थ न घेता. व्यापक जनहित आणि शोषित घटकांविषयी संवेदनशील असणे महत्त्वाचे ठरते.

उमेदवाराकडून समाजातील महत्त्वाच्या समकालीन समस्यांचे जसे व्यापक, समग्र आकलन अपेक्षित असते तसेच त्याची उकल करण्यासाठी उपयुक्त संभाव्य उपाय सुचविण्याची ‘उपायात्मक क्षमता’ ही अभिप्रेत असते. कोणत्याही प्रश्न वा समस्येचा उपायात्मक विचार करताना प्रथमत: महत्त्वाची ठरते ती बाब म्हणजे विचाराधीन समस्येचे आकलन. हे आकलन जितके वस्तुनिष्ठ, व्यापक व चिकित्सक असेल तेवढे त्यावरील उपायांची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता अधिक. तसेच संबंधित समस्येवर आजपर्यंत करण्यात आलेल्या शासकीय, बिगर शासकीय पातळीवरील प्रयत्न-उपायांचे यथायोग्य मूल्यमापन मार्गदर्शक ठरते. अर्थात सुचविण्यात येणारे संभाव्य उपाय अति आदर्शवादी, काल्पनिक असणार नाहीत याची काळजी घ्यावी. उपाय शक्यतेच्या कोटीतील आणि व्यवहार्य असावेत याची खबरदारी घ्यावी. एखादा मूलग्राही उपाय सुचवावा असे वाटले तरी तो संबंधित प्रश्न-समस्येच्या वास्तविक आकलनाशी असंबंधित असा नसावा. नावीन्यपूर्ण विचार आणि प्रयोगशीलता स्वागतार्ह ठरू शकते परंतु ती समाजवास्तवाच्या योग्य आकलनावर अधिष्ठित असावी.

एकंदर विचार करता मुलाखतीसाठी आवश्यक घटकासंबंधी सुरुवातीपासूनच अभ्यास सुरू करणे, विविध स्रोतांद्वारे आपले आकलन वाढवणे, आवश्यक तेथे समर्पक आकडेवारी वा दाखल्यांचा आधार देणे, त्याविषयी सारासार विचार करणे, त्यातून उपयुक्त टिपणे काढणे, अभिरूप मुलाखतीद्वारा संवादकौशल्याचा विकास करणे या प्रमुख बाबींची नियोजनबद्ध आखणी केल्यास मुलाखतीसाठी उपयुक्त क्षमता व गुणवैशिष्टय़ांचा विकास साधता येईल, यात शंका नाही!