News Flash

यूपीएससीची तयारी : यूपीएससीच्या तयारीचे बिगूल

या परीक्षेच्या तयारीचा प्रारंभ करताना पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

देशातील नागरी सेवा पदांच्या भरतीसाठी केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षेतील भिन्न टप्पे, विविध विषय, व्यापक अभ्यासक्रम, प्रश्नांचे आव्हानात्मक स्वरूप आणि तीव्र स्वरूपाची स्पर्धा यामुळे यूपीएससी परीक्षा गुंतागुंतीची व आव्हानात्मक ठरते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीचा प्रारंभ करताना पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप – यूपीएससी परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत वा व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन निराळ्या टप्प्यांचा समावेश असणारी ही परीक्षा आहे. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे. तसेच पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ (द४ं’्रऋ८्रल्लॠ ळी२३) स्वरूपाचा आहे. वस्तुनिष्ठ व नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नेमकेपणा व अचूकता याची हमी देण्याशिवाय पर्यायच नसतो. मूलभूत संकल्पनांचे आकलन, आवश्यक माहितीचे पुन्हा पुन्हा वाचन, अभ्यासाचे मजबुतीकरण, स्मरणशक्तीचा विकास, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय बाजूला सारून बरोबर पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य आणि अचूकता या आधारेच पूर्वपरीक्षेत यश संपादन करता येईल. मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असल्यामुळे त्यानुसार अभ्यासपद्धतीत पूरक बदल करणे अत्यावश्यक ठरते. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकणे व समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य पद्धतीने मुलाखत मंडळापर्यंत पोहोचवणे, औपचारिक भाषा, आत्मविश्वासपूर्वक देहबोली, संभाषणात आवश्यक इतर सर्व औपचारिकता या सर्वाचे भान ठेवावे लागते. थोडक्यात प्रत्येक टप्प्याचे भिन्नत्व लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धती विकसित करावी.

अभ्यासक्रमाचे आकलन – पूर्वपरीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरी सेवा कलचाचणी’ हे दोन विषय तर मुख्य परीक्षेत निबंध, सामान्य अध्ययन (चार पेपर्स), वैकल्पिक विषय आणि अनिवार्य इंग्रजी तसेच भारतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. केंद्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही टप्प्यांतील उपरोक्त विषयांचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन व आकलन अत्यावश्यक ठरते. अभ्यासाच्या आकलनाद्वारे एखाद्या ‘विषयाची व्याप्ती’ किती आहे याचा प्राथमिक अंदाज घेता येतो. ‘अभ्यास व वेळेचे नियोजन’ करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे आकलन पायाभूत ठरते. मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तर उपरोक्त परिच्छेदात अधोरेखित केलेल्या घटकांची तयारी महत्त्वाची ठरते.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण – परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात जे जे विषय समाविष्ट केले आहेत, त्यावरील गेल्या ५-६ वर्षांतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कलचाचणी या विषयांच्या किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. मुख्य परीक्षेच्या बाबतीत जरी २०१३ पासून नवी परीक्षा योजना स्वीकारली तरी सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंधाच्या जुन्या पद्धतीतील प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरतील.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षांची संबंधित विषयावरील प्रश्नपत्रिका बारकाईने वाचणे; प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकरण व अभ्यास घटकावर आधारित आहे हे पाहणे; त्या प्रश्नाचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान अथवा विश्लेषणात्मक आहे हे लक्षात घेणे; प्रश्नात चालू घडामोडीचे आयाम अथवा संबंधित घटकाच्या भवितव्याविषयी काही विचारले आहे का हे जाणून घेणे होय. प्रश्न वर्णनात्मक, चर्चात्मक, स्पष्टीकरणात्मक, चिकित्सक, मूल्यमापनात्मक की उपाययोजनात्मक आहे याचेही आकलन महत्त्वाचे ठरते. अशा रीतीने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासल्यास त्या त्या विषयाच्या ‘अभ्यासाची व्याप्ती’ ठरवणे जसे शक्य होईल तसेच अभ्यासास ‘परीक्षाभिमुख’ बनवणे सुलभ जाईल.

संदर्भ पुस्तकांचे संकलन – उपरोक्त बाबींचा विचार केल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ पुस्तकांची यादी मिळवणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊनच संदर्भाची यादी निश्चित करावी. त्या दृष्टीने विचार केल्यास ‘एनसीईआरटी’ची इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजरचना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरील क्रमिक पुस्तके हा प्राथमिक संदर्भ ठरतो. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी किमान एक प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते. काही वेळा दुसरा एखादा संदर्भग्रंथ वाचायचा असल्यास त्याचीही तयारी ठेवावी. त्याचप्रमाणे मराठी वर्तमानपत्रासह इंग्रजीतील किमान एक वर्तमानपत्र, काही नियतकालिके आणि भारत वार्षकिी या संदर्भसाहित्याचा समावेश अत्यावश्यक आहे. अशा रीतीने ‘एनसीईआरटी’द्वारा विषयाचा संकल्पनात्मक पाया, प्रमाणित संदर्भग्रंथ याद्वारा संबंधित विषयाचे सखोल आकलन आणि वर्तमानपत्र, नियतकालिकांद्वारे विषयाचे समकालीन (चालू घडामोडी) आयाम पक्के करणे सुलभ जाईल. संदर्भसाहित्याविषयी नेहमी एक काळजी घेणे अत्यावश्यक ठरते, ती म्हणजे भाराभर पुस्तके वाचण्यापेक्षा त्या त्या विषयांचे मूलभूत एखाद-दुसरे संदर्भ पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून तो पक्का करण्यावर भर द्यावा.

नियोजन – प्राथमिक तयारीतील शेवटचा परंतु तेवढाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास व वेळेचे नियोजन होय. वस्तुत यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, त्यातील विषय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके या उपरोक्त चíचलेल्या घटकांचे आकलन ‘नियोजन’ ठरवण्यासाठी पायाभूत ठरते यात शंका नाही. अर्थात ‘अभ्यास व वेळेच्या’ नियोजनाची सविस्तर चर्चा पुढील लेखात करूयात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:48 am

Web Title: upsc exam preparation 4
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : डिजिटल एमबीए
2 रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची वस्तुस्थिती
3 करिअरमंत्र
Just Now!
X