मु. वा. कांत

‘‘अण्णांची साठ वर्षांची साहित्यसेवा व निर्मिती विविध आणि बहुपेडी होती. आपल्या साहित्यसंपदेत १० कवितासंग्रह, त्यात ‘दोनुली’, ‘पहाटतारा’, ‘बगळ्यांची माळ’, ‘मावळते शब्द’, ‘रुद्रवीणा’ आदींचा समावेश आहे.  मराठी काव्यसाहित्यात ‘नाटय़काव्य’ हा मुक्तछंदात्मक नवीनतम साहित्यप्रकार त्यांनी रुजू केला. ‘त्या तरूतळी विसरले गीत, ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे ’, ‘सखी शेजारणी’ आदी गाणी आजही रसिकांच्या मनात आहेत. पण त्यांना म्हणावी तेवढी राजमान्यता, लोकमान्यता मिळाली नाही.’’ आपले पिता वा. रा. कांत यांच्याविषयीची सांगताहेत त्यांचे पुत्र मु. वा. कांत.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

‘आभाळमाया’ या शब्दाच्या अर्थाला विविधता आहे. आभाळासारखी, आभाळाएवढी, आभाळाची माया! आपल्या मुलाच्या जीवनावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून वडील मुलांना मायेनं जपतात. ही जीवनातली मातृमायेसोबतची एक आवश्यक आभाळमाया. आईची मातृमाया व वडिलांची आभाळमाया मुलांचे संस्कारपूर्ण जीवन घडवीत असते. माझ्या दुर्दैवानं आईची मातृमाया मला अधिक काळ लाभू शकली नाही. वयाच्या बाराव्या वर्षीच माझ्या आईचं निधन झालं. साहजिकच वडिलांचा संसारगाडा एकचाकी झाला. पण मला वडिलांची आभाळमाया थोडी अधिकच मिळाली. मला ती प्रकर्षांनं जाणवली, कळली. अशी आभाळमाया देणारे माझे वडील म्हणजे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कविवर्य वामन रामराव अर्थात वा. रा. कांत.

खरं तर आईला झालेल्या कर्करोगामुळे १९६५ मध्ये आम्ही औरंगाबाद येथील घर सोडून मुंबईला आलो. माझं शालेय जीवन विस्कळीत झालं. परंतु महाराष्ट्रातील ज्येष्ठ कविवर्याचा मुलगा म्हणून मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘पार्ले टिळक विद्यालयात’ मला सहजी प्रवेश मिळाला. माझ्या आभाळमायेच्या जाणिवेची ही पहिली खूण. त्यावेळी अण्णा (आम्ही सारेच त्यांना अण्णा म्हणत असू) आकाशवाणी मुंबई केंद्रावर मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सरकारी नोकरी व आईचा आजार या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अण्णांची परिस्थिती केविलवाणी व तणावग्रस्त  झाली होती, हे त्यांच्या धीरगंभीर चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जाणवत असे. मुंबईच्या टाटा रुग्णालयात उपचारांसाठी आईला नेण्या-आणण्यासाठी त्यांच्या सोबत माझी थोरली बहीण कविता व मोठा भाऊ प्रकाश यांची सोबत अण्णांना मनोबल देणारी व धीराची वाटायची. कर्करोगासारख्या दुर्धर रोगाशी आई झगडत होती व आपल्याबरोबर आपली मुलंही सोशीक होऊन सारं सहन करत होती हे दुख अण्णांना खचितच बोचत असणार. मला मात्र त्यांनी घरातील या तणावापासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मला म्हणायचे, ‘‘पहा! इथे मुंबईतील एका नामांकित शाळेत तुझा दाखला झाला आहे. आता उत्तम अभ्यास करून हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत नाव कमव.’’

पुढे आई गेलीच. अण्णांनी आम्हा मुलांना धीर दिला. परंतु आईशिवाय घरात जी दुखभरली पोकळी निर्माण झाली होती ती जाणीव पुढे कित्येक वर्षांपर्यंत मनात चिकटून राहिली. कदाचित या विमनस्क पोकळीनेच मलाही माझ्यातला कवी सापडला असावा. एकदा घरात असाच एकटा बसलो असताना आईच्या फोटोकडे पहाताना मला ओळी सूचल्या,

पोरक्या घरावर माझ्या

काळोख अमेचा येतो

भिंतीवर फोटोमधला

आईचा डोळा भिजतो

कुटुंबप्रमुख म्हणून अण्णा आपली जबाबदारी निगुतीनं निभावित होते. घरात स्वयंपाकीणबाई आल्या व त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. अण्णांनीही स्वत:ला आकाशवाणीच्या नोकरीत गुंतवून घेतलं. १९७२ मध्ये अण्णा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून निवृत्त झाले.

आकाशवाणीचा विषय निघाला म्हणून त्याविषयी अण्णांच्या आयुष्यातला एक किस्सा आठवला. निजामांच्या काळात औरंगाबाद येथे एक आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आलं. अण्णांची नेमणूक या आकाशवाणी केंद्रात झाली, त्यांना त्यांच्या आवडीचं काम मिळालं. १९४५-४६ चा तो काळ. भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं ना औरंगाबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झालं होतं. मराठवाडा मुक्तीआंदोलनाचे वारे वाहू लागले होते. अण्णा मुडमध्ये आले की औरंगाबाद आकाशवाणी केंद्राची गोष्ट अगदी रंगात येऊन सांगायचे. तो काळ मराठी माणसासाठी व मराठी भाषेसाठी खूप कठीण होता. एकीकडे इंग्रजांचं देशावर आधिपत्य तर इथं मराठवाडय़ात निजामानं केलेली मराठीची गळचेपी.

मराठी भाषा बोलायला बंदी, मराठीतून शिक्षण नाही, मराठी वृत्तपत्र नाही. सगळ्या बाजूंनी मराठी भाषेची घूसमट चालू होती. उर्दू भाषेची दडपशाही व सक्ती होती. अशा वेळी अण्णांनी आपल्या कवितेतून मराठीसाठी जाज्वल्यपूर्ण जयघोष केला होता.

बंदी अशा गायनाते करोनी

गळे आमुचे कापले हे तरी

गातील गाणी मराठी कबंधे

मराठी खुल्या माळरानावरी

(मायभाषेस-रुद्रवीणा)

या व अशाच देशभक्तीपर गाण्यांचा मराठी कार्यक्रम अण्णांनी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून सादर केला. निजाम अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अण्णावर नजर ठेवली. गुप्त पोलीस त्यांच्यामागे फिरू लागले. पण अण्णांनी भूमिगत राहून असे कार्यक्रम सादर करण्याचा ठामपणा दाखवला. निजामांच्या भीतीमुळे छुप्या रीतीनं ते ही कामं करीत. याला ते ‘खुफिया रेडियो स्टेशन’ म्हणायचे. अण्णांच्या तोंडून हा सगळा काळ आमच्या डोळ्यासमोर उभा राह्य़चा. अण्णाही त्या थरारक आठवणींचे रोमांच अनुभवत.

माझ्या शिक्षणाचा काळ सुरू असतानाच माझ्यावर कवितेचे संस्कार हळू हळू होत गेल्याचं मला आठवतं. घरात बऱ्याच लेखक, कवी मंडळींची ये-जा होत असे. ‘जय नावाचा इतिहास’ लिहिणारे आनंद साधले, समीक्षक

व. दि. कुलकर्णी, प्रा. गंगाधर पाटील असे अनेकजण अण्णांच्या भेटीला येत असत. अण्णांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणारी बरीच नभोनाटय़ लिहिली आहेत. या नभोनाटय़ांच्या संहितेवर चर्चा करण्यासाठी बाळ कुडतरकर वगरे मंडळीही घरी येत असत. नव्या कवींना त्यांच्या कवितासंग्रहावर समीक्षण लिहिण्याची विनंती करण्यासाठी व प्रस्तावना लिहून हवी म्हणून अण्णांची भेट हवी असायची. अण्णांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही घरातच लहानसा कार्यक्रम योजला होता. काही निवडक मित्रांबरोबर कविवर्य वसंत बापट, मंगेश पाडगावकर, श्री. पु.भागवत आदी मंडळी आवर्जुन आली होती. त्यावेळेस एक छोटेखानी कविसंमेलनही घरातच झाल्याचं आठवतं.

अण्णांचा जन्म ६ ऑक्टोंबर १९१३ ला नांदेड येथे झाला. अण्णांचे वडील रामराव हे निजामाच्या काळात पोलीस अंमलदार होते. कठोर, प्रामाणिक, बेडर रामरावांना लोक आदराने ‘रामराव शिक्खान’ म्हणून संबोधित. हरिविजय, पांडवप्रताप, रामविजय व इतर  अध्यायाचे घरात दररोज पाठ व्हायचे. आजोबा शास्त्रीय संगीताचे व्यासंगी व चाहते होते. ते सतारही उत्तम वाजवीत. रामराव यांच्या तत्कालीन मानमरातबासंबंधी व त्यांच्या वैभवाबद्दल मी माहिती मिळवीत असताना मला असं कळलं की त्या काळी घोडय़ाच्या बग्गीत बसून अण्णा शाळेत जात असत.

१९२५ पासून अण्णांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. १९२८ मध्ये ‘मंदारमालेत’ त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली होती. नंतर वि. स. खांडेकरांनी आपल्या ‘जोत्स्ना’ मासिकासाठी अण्णांकडून कवितेची मागणी केली होती. रामरावांनी अण्णांच्या काव्यलेखनास कधी अडसर निर्माण केला नाही. अण्णांसाठी आजोबांची ती एक वेगळीच आभाळमाया होती.

नांदेड ही अण्णांची कर्मभूमी. आमच्या घराशेजारीच कविवर्य दे. लं. महाजन यांचं घर होतं. शेषवामनांचा वाडाही जवळच होता. त्यावेळची नवखी कवीमंडळी आपल्या काव्यलेखनात मार्गदर्शन घेण्यासाठी महाजनांच्या घरी येत असत. अण्णांचेही त्यांच्याशी विशेष ऋणानुबंध होते. गोदातटीच्या या घराच्या आठवणी अण्णांनी आपल्या बऱ्याच कवितांमधून वर्णन केल्या आहेत. आयुष्याच्या आपल्या शेवटल्या काळातही या घराच्या व घराभोवतालच्या परिसराचे स्मरण त्यांना होत असे. पक्षाघाताच्या आजारपणानंतर त्यांची वर्तमान स्मृती क्षीण झाली होती व नांदेडच्या आठवणी अधिक तीव्र झाल्या होत्या. त्या काळाला ते ‘रुबाया दौर’ असं काहीतरी म्हणत. ‘‘पायी बेडी वाजे तोवर गावे नाचून’ ही ‘रुद्रवीणा’ मधली स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेली कविता ते म्हणायचे. एकदा संध्याकाळी डायिनग टेबलावर चहा पीत असताना मला विचारलं, ‘‘अरे मुकुंद! अजून सकाळ झालीच नाही का?’  मी म्हणालो, ‘‘अहो अण्णा, सकाळ कधीच होऊन गेली. आता तुम्हाला संध्याकाळचा चहा दिलाय.’’ हे ऐकताच ते स्तब्ध झाले. थोडय़ा वेळानं आपल्या डोलणाऱ्या खुर्चीत जाऊन बसले. नंतर पाहिलं तर त्यांची एक कविता लिहून तयार होती. पक्षाघातामुळे त्यांच्या हातांची हालचाल सोयीस्कर होत नव्हती. वेडय़ावाकडय़ा अक्षरात लिहिलं होतं. मला म्हणाले, ‘‘मुकुंद! हे चांगल्या अक्षरात लिहून ठेव,’’ कविता होती

एक दिवस हरवला

हरवला माझ्या स्मृतीतून

हरवला सृष्टिचक्रातून

अस्तोदयाच्या फटीतून

एक दिवस हरवला

आमच्या आजोबांची बदली हैदराबाद येथे झाली अन् अण्णांचा नांदेडशी संबंध तुटला. वाडय़ाकडे लक्ष देणे झाले नाही. आज त्या पडक्या वाडय़ाची जमीन कुणी आगंतुकाने आपल्या नावे करून घेतली आहे. नांदेडचे आमदार सुधाकर डोईफोडे यांनी ‘लोकसत्ता’ मध्ये एक लेख लिहिला होता ‘शोध वा. रा. कांतांच्या घराचा’ मीही अण्णा निवर्तल्यानंतर त्या वाडय़ाची जमीन स्मारक म्हणून ‘एक कवी इथं जन्मला होता’ या हेतूने मिळविण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न केले होते; पण व्यर्थ गेले. आमच्या पडक्या वाडय़ाची जमीन खोदताना लोकांना आमच्या देवघरातल्या चांदीच्या मूर्त्यां मिळाल्या असे ऐकिवात आहे.

आजोबांच्या निधनानंतर अण्णांना उस्मानिया विद्यापीठातले इंटर पर्यंत झालेले शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि निजामदरबारीच शेतकी खात्यात एक सामान्य पदाची नोकरी पत्करावी लागली. हैदराबाद ते हिमायत सागर हे २० ते २२ मलांचे अंतर ते सायकलवरून रपेट मारीत जात. याच काळात त्यांचे काव्यलेखनही बहरत होते. या सायकल रपेटी दरम्यान स्थंडिलसंप्रदायी म्हणविणाऱ्या या कवीनं एक सुंदर, तरल व भावमधुर गीत लिहिलं होतं, ‘त्या तरूतळी विसरले गीत,’ सुधीर फडके यांच्या स्वरात व यशवंत देव यांच्या मधुर संगीतामुळे हे भावगीत आज साठ वर्षांनंतरही अजरामर व लोकप्रिय आहे. त्यांची ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे ’, ‘सखी शेजारणी’ आदी गाणी आजही रसिकांच्या मनात आहेत.

कविवर्य कुसुमाग्रज व अण्णा हे समकालीन कविद्वय असले तरी कुसुमाग्रजांच्या पूर्वीपासून अण्णांनी काव्यलेखनास सुरुवात केली होती. अण्णांच्या जन्मशताब्दी निमित्तानं एका त्रमासिकात परळी वैजनाथ येथील प्रा. मधु जामकर यांनी अण्णांसंबधी लिहिताना असं म्हटलं आहे की ‘त्या काळी सर्व समीक्षक अण्णा व कुसुमाग्रजांवर लिहीत असत. त्यातही कुसुमाग्रजांच्या मापाने अण्णांच्या कवितेचे मूल्यमापन होत असे. मराठवाडय़ातील तत्कालीन स्थिती व एकूण देशात चालू असलेले स्वातंत्र्यलढय़ाचे धगधगते आंदोलन अण्णांच्या कविशक्तीला प्रेरक ठरले. त्यांच्या कवितेत निजामी लढय़ाची जी पाश्र्वभूमी येते ती सर्वस्वी भिन्न होती. परंतु तिला सतत कुसुमाग्रजांशी तुलना करून दुय्यम ठरविण्यात आले. अण्णांनी लिहिलेली आर्त व ललित मधुर प्रणयगीते त्यांच्या प्रतिभेचे मनोज्ञ दर्शन घडवितात. पण त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाले.’ अशाच एका समारंभात संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसारक लेखक वामन देशपांडे यांची भेट झाली असता मला म्हणाले, ‘‘अरे मुकुंद! तुझे वडील वा. रा. कांत खूप मोठे कवी होते, पण शापित गंधर्वच राहिले.’’

अण्णांची साठ वर्षांची साहित्यसेवा व निर्मिती विविध आणि बहुपेडी होती. आपल्या साहित्यसंपदेत १० कवितासंग्रह, त्यात‘दोनुली’, ‘पहाटतारा’, ‘बगळ्यांची माळ’, ‘मावळते शब्द’, ‘रुद्रवीणा’ आदींचा समावेश आहे, तसेच १० अनुवादित ग्रंथ प्रकाशित करीत असतानाच मराठी काव्यसाहित्यात ‘नाटय़काव्य’ हा मुक्तछंदात्मक नवीनतम साहित्यप्रकार त्यांनी रुजू केला. जवळ जवळ १५-१६ नाटय़काव्य आकाशवाणी केंद्रांवरून प्रक्षेपित झाली आहेत. अनेक वृत्तपत्रांसाठी व मासिकांसाठी ललित लेख व प्रसंगविशेष लेख लिहिले. स्वत:ची काव्यविषयक भूमिका स्पष्ट करणारे त्यांचे लेख खूप गाजले. त्यांचा आवडता प्रसिद्ध उर्दू गझलाकार मिर्झा गालिब यांच्या प्रेमजीवनावर आधारित ‘मी पराभवाचा शब्द’ शीर्षकाचे मराठीतील एकमेव नाटक लिहिले. मात्र त्याला रंगभूमी पहाण्याचं भाग्य मिळाले नाही. महाभारतातील महत्त्वाचे पात्रविशेष लक्षात घेऊन अण्णांनी १९७२ मध्ये लिहिलेले नाटय़काव्य ‘मरणगंध’  म्हणजे अण्णांच्या नाटय़काव्य या लेखनप्रकारातला उच्च मर्मिबदू. त्याचेही मंचीयकरण झाले नाही, पण या नाटय़काव्य संग्रहाला उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा शासनातर्फे पुरस्कार मिळाला.

१९७० च्या दशकात मी अण्णांना सतत काहीतरी लिहीत असतानाच्या अवस्थेतच पाहिलं. या दरम्यान त्यांनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ व दिल्लीच्याच साहित्य अ‍ॅकडमीतर्फे आलेल्या इतर भाषेतील अनेक ग्रंथांचे मराठी अनुवाद केले. यामध्ये यशपाल शर्मा यांचे ‘मनुष्यके रूप’, मौलाना अब्दुल हलीम शर्र यांचे ‘गुजस्ता लखनौ,’  डॉ. राजेंद्रसिह बेदी यांची ‘एक चादर मलीसी’ कादंबरी, हैदर यांचा ‘मिर्झा गालिब’ हा इंग्रजी ग्रंथ, डॉ. रफिक झकेरिया यांची ‘सुलताना रझिया’ ही कादंबरी, व्ही. आर. नार्ला यांचा इंग्रजी ग्रंथ ‘वेमनां’, आंग्ल कादंबरीकार ए. डी. गोखाला यांची ‘मध्यस्थ’ ही कादंबरी, गजानन मुक्तिबोध यांच्या कविता, ‘मं हूं अपनी शिकस्तकी आवाज’ शीर्षकाच्या मिर्झा गालिब याच्या गजलांचा अनुवाद आदी साहित्याचा समावेश होता. शिवाय आकाशवाणीसाठी नाटय़काव्यांचीही मागणी होतीच. त्यामुळे या काळात मी अण्णांना सतत मान मोडून १२-१२ तास लिहीत असताना पाहिलेले आहे. अण्णांची लेखननिष्ठा अभंग व अतूट होती. कल्पनाशक्ती व प्रतिभा तर वर्णनापलीकडची होती. त्याचं प्रत्येक लेखन हे अभिजात होतं.

या काळात घरातली परिस्थितीही बदलली. भावा-बहिणींचे विवाह होऊन त्यांनी वेगळाले संसार थाटले. घरात मी व अण्णा दोघेच उरलो. अण्णांचे काव्यलेखन, ग्रंथलेखन समृद्धीला होते. त्यांना विविध ठिकाणचे कविता संमेलनाचे आमंत्रण असायचे. मी त्यांना सोबत म्हणून नाशिक, औरंगाबाद, परभणी, हैदराबाद आदी विविध ठिकाणी जायचो. अखिल भारतीय संमेलनाच्या नांदेड येथील साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे अण्णांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठरला. परंतु शंकर पाटील यांना मानाचं अनुमोदन देऊन अण्णांनी आपलं नाव मागे घेतलं. याच साहित्य संमेलनाअंतर्गत मलाही कविता वाचनाचं आमंत्रण होतं. महाराष्ट्रातील ज्येष्ठतम कविवर्य वडिलांसमोर कविता वाचनाचा माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग.

‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राने दर आठवडय़ाचं कविसंमेलन आयोजित केलं होतं. प्रतिथयश कवी योग्य त्या कवितांची निवड करायचे. एका आठवडय़ात अण्णादेखील कवितांची निवड करणार होते. मीही एक कविता पाठवली होती. अण्णांच्या हाती आली. मला बोलावून त्यांनी सांगितलं, ‘‘मी तू पाठवलेली कविता पाहिली. पण मी तुझ्या कवितेची निवड करणार नाही. लोकांचा असा समज होईल की तू मुलगा आहेस म्हणून मी ती निवडली. तुझ्याऐवजी यावेळी दुसऱ्या एखाद्या कवीला निवडलं तर त्याचा आनंद किती मोठा असेल? तू निराश होवू नकोस. दूसरे कुणी परीक्षक असले की पुन्हा कविता पाठव.’’ हे ऐकून मी जरा खट्ट झालो. अण्णांचा विचारही पटण्यासारखा होता.

पुढील आठवडय़ात कविवर्य वसंत बापट यांनी माझ्या कवितेची निवड केली. पण अण्णांनी माझी कविता स्वीकारली नाही हा प्रसंग त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर यांना कळविला. त्यावेळी तळवलकरांचे त्यांच्या सहीनीशी आलेले पत्र अजूनही मी जपून ठेवले आहे. ४२ वर्षांपूर्वीच्या या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, ‘‘तुम्ही जो प्रसंग लिहिला आहे तो समीक्षक म्हणून श्री. वा.रा. कांत यांच्या नि:पक्षपाती वृत्तीचा व बुद्धीचा द्योतक आहे. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे प्रकट होते हेही खरे आहे. एक कवी म्हणूनही मला त्यांच्याविषयी आदर आहे.’’

असंच एक पत्र श्री. पु. भागवतांनी मला

७ फेब्रुवारी १९९२ रोजी लिहिलं होतं. अण्णांना ‘मावळते शब्द’ या अखेरच्या काव्यसंग्रहास शासनाने ‘केशवसुत पुरस्कार’ दिला होता तो प्रसंग. या पत्रात श्री. पु. भागवत लिहितात, ‘‘कविवर्य वा. रा. कांत यांना ‘केशवसुत पुरस्कार’ मिळाला यात औचित्य आहे. त्यांना तो निधनोत्तर मिळाला हा दैवाचा उपरोध खरा, त्याची हळहळ वाटली, इलाज नाही असेच म्हणायचे. त्यांना कोणता गौरव वा सुख, यश वेळच्या वेळी मिळाले? त्यांचे अभिनंदन तुम्ही स्वीकारा.’’ दोन वेगवेगळ्या प्रसंगी दोन विभिन्न क्षेत्रातल्या प्रतिथयश व्यक्तींनी अण्णांबद्दलचा मानस मजजवळ प्रकट केला याचं मला एक अनन्य महत्त्व आहे. अण्णांच्या अनेक साहित्यिक मित्रमंडळींनी अण्णांशी केलेला पत्रव्यवहार मी जपून ठेवला आहे.

अण्णांच्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करवा, असे ठरले. गौरव समितीची स्थापना झाली.  महाराष्ट्राचे तत्कालीन वित्त मंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्ष होते. इतर साहित्यिक मित्रांपेक्षा त्यांनीच या कार्यात जास्त पुढाकार घेतला. दुर्दैवानं अण्णांना याच सुमारास अर्धागवायूचा आघात झाला व त्यामुळे हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात करावा लागला. सुशीलकुमार शिंदे यांनी आमच्या निवासस्थानी येऊन अण्णांचा सत्कार केला. या प्रसंगी कविवर्य शंकर वैद्य, केशव मेश्राम, संगीतकार यशवंत देव उपस्थित होते.

अण्णांच्या दीर्घ साहित्यसेवेबद्दल याच सुमारास ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ यांनी त्यांना गौरववृत्ती देऊन सत्कार केला होता. या वेळेस साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारीसुद्धा निवासस्थानी आले होते. अण्णांना उत्कृष्ट वाड्.मयनिर्मितीचे चार पुरस्कार शासनातर्फे मिळाले आहेत.

अण्णांच्या साहित्यावर मराठवाडा विद्यापीठात प्रबंध सादर करून औरंगाबाद येथील अरुणा चौधरी यांनी डॉक्टरेट मिळविली. त्यांनी त्यावेळी म्हटल्यानुसार, ‘‘अण्णांच्या पूर्वी व अण्णांच्या नंतर त्यांच्या तुलनेचा कवी अजून मराठवाडय़ातून दृष्टिपथात आलेला नाही. इतके विपुल, समृद्ध, तेजस्वी व बहुपेडी वाड्.मय लिहिणाऱ्या कवीला सरकारने ‘पदम्’ किताब बहाल करायला हवा होता. पण अगदी साहित्य अकादमीनंही त्यांच्या कर्तृवाची दखल घेतली नाही, हे दुखपूर्ण आहे.’’

अण्णांच्या समग्र साहित्यनिर्मितीचा ग्रंथ प्रसिद्ध करावा म्हणून मी साहित्य संस्कृती मंडळास विनंती केली, तद्नुसार ‘कविवर्य

वा. रा. कांत-काव्य सृजनाचा समग्र ग्रंथ’ असा फक्त काव्यलेखनाचाच समावेश असलेला ग्रंथ २०१८ मध्ये मराठी भाषादिनी प्रकाशित झाला. त्यांच्या इतर साहित्याचा ‘समग्र वा. रा. कांत साहित्य-खंड-२’ लवकरच प्रकाशित होणार आहे. या दोन्ही समग्र ग्रंथांचे संपादन मंडळाने माझ्यावर सोपविल्यामुळे माझ्या आभाळमायेचे थोडेतरी ऋण मी फेडल्याचे समाधान मला मिळू शकेल.

विलक्षण काव्यप्रतिभेची सर्जनशील साहित्यसंपत्ती मागे ठेवून पण काव्यप्रातांत आपली थोडी उपेक्षाच झाली ही एक व गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात आपलं एखादंही भावगीत स्वरबद्ध झालं नाही ही दुसरी सल मनात बाळगूनच कविवर्य अण्णांनी या जगाचा निरोप घेतला. तरीही स्वत:च्या कवितेवर त्यांना आत्मविश्वास होता. अखेरच्या आजारपणातही आपल्या शब्दांना त्यांनी निक्षून सांगितले होते-

‘‘मी पंगु झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो’

त्यांचे शब्दच या जगात चिरंतन राहणार आहेत याची शाश्वती त्यांना होती. त्यांनी लिहिलं,

माझी कलासृष्टी भव्य तुझ्याहुनी,

एकदा येऊनी पहा देवा

गभस्तीची झाडे, चांदण्याची वेल,

आनंदाची ओल, मातीत या

– अशी ही माझ्यावरची माझ्या अण्णांची आभाळमाया ..

मावळते शब्द

हिव्र्या अबोली रंगाचे

दिवस ते उजेडती;

सूर्य पक्व फळांपरी

झाडांमागे मावळती

पानें फुलें चुंबू वाके

निळें आकाश अधीर;

मासोळीची थरथर

जळीं घायाळ नजर.

झाडें येतात पानांत,

कळ्या येतात पणांत:

अनादी त्या लावण्याचा

उडे पदर वाऱ्यांत.

त्याच रुपाच्या वेधांत

गाणीं गातों सुंदराची;

जड अक्षरे चालती

जशी भिंत ज्ञानोबाची.

असें बोलतां हासतां

गेले निघून दिवस;

आता उरलीसे मागे

पिक्या फळांची मिठ्ठास.

कांही गुंजतें फुंजतें

पानाफुलांच्या आडोनी.

उगवायासाठी पुन्हा

मावळत्या शब्दांतुनी

६ मार्चच्या ‘आभाळमाया’ या सदरातील निनाद देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘संस्कारांचे ऋण’ या लेखात बादल सरकार यांचे ‘तुघलक’ असे अनवधानाने प्रसिद्ध झाले. ते गिरीश कर्नाड लिखित आणि विजय तेंडुलकर अनुवादित ‘तुघलक’ असे असायला हवे होते.