31 October 2020

News Flash

खंबीरता महत्त्वाची

पडसाद

(संग्रहित छायाचित्र)

खंबीरता महत्त्वाची

कर्करोगाशी लढाई संबंधित स्त्रियांचे मनोगत (१ फेब्रुवारी)वाचले. त्या निमित्ताने मलाही व्यक्त व्हावेसे वाटले. जीवनात रूप, गुण, पैसा, प्रसिद्धी प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी सुख-दु:खाचे चक्र हे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद पाळत नाही. तीन-चार वर्षांपूर्वी मला पचनासंबंधी तक्रारी सुरू झाल्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त व इतर तपासणी करूनही काही निदान झाले नाही. शेवटी माझ्या यजमानांनी डॉ. भाचीच्या सल्ल्याने चाचण्या करायचे ठरवले आणि कर्करोगाचे निदान झाले. या वेळी माझे वय ७२ वर्षे होते. सर्व तपासण्या करून शस्त्रक्रिया पार पडली. या सर्व कालावधीत माझ्या दोघी डॉक्टर भाच्यांचे सहकार्य लाभले. या भावना एवढय़ासाठी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत की जर मृत्यू अटळ आहे, तो केव्हा आणि कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्याचा मी विचारच केला नाही. माझे दोन भाऊ  कर्करोगाने गेले. त्यांच्या वेदना मी जवळून बघितल्या होत्या. माझी शस्त्रक्रिया सफल झाली, त्यानंतर सहा केमो झाल्या. संपूर्ण प्रवास वेदनायुक्त होता. कर्करोग नुसता शरीर पोखरत नाही, मनाची खंबीरता आणि सहनशक्ती याचाही कस लागतो. जवळचे नातेवाईक, पती, मुलगा, सून, मित्र-मैत्रिणींची साथ आणि देवाची कृपा यामुळे मी आज तरी कर्करोगमुक्त आहे.  कर्करोगाचे रुग्ण बरेचदा आपला आजार लपवतात. त्यामुळे जे रोगाने दगावतात किंवा ज्यांचे हाल होतात ते लोकांना दिसतात. परंतु जे लोकांना कळू न देता उपचारांनी बरे होतात ते लोकांना माहीत नसतात त्यामुळे कर्करोगाची भीती वाढते. आपण बरे होऊ  शकतो हा विश्वास मनात बाळगून परिस्थितीला तोंड द्यावे. मुख्य म्हणजे आधी परिस्थितीचा स्वीकार करावा. कर्करोगमुक्त झाल्यानंतर आपोआपच मनोबल वाढते, कारण आपण मृत्यूच्या दारातून परत आलेलो असतो, त्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगावा ही प्रेरणा मिळते. मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक वृत्ती असेल तर या परिस्थितीवर मात करणे शक्य होते हा माझा अनुभव आहे.

– शोभा राजे, नागपूर.

कर्करोगाशी खंबीर लढा

कर्करोगाशी झगडणाऱ्या चौघींचे विचार वाचून मला आठवले २००१ हे वर्ष. त्या वर्षी फेब्रुवारीमध्ये माझे स्तनाच्या कर्करोगाचे ऑपरेशन झाले. त्यातून बाहेर येण्यासाठी वेळेवर झालेले ऑपरेशन व केमो, एकही गोळी चुकू न देता घेतलेली औषधं, अ‍ॅलोपथीबरोबर आयुर्वेद व होमिओपथीचे उपचार ऑपरेशननंतर थकवा येणार नाही असे केलेले काम. कुटुंबीय, इतर नातेवाईक व परिचितांचे सहकार्य आणि शुभेच्छा यांचा मोलाचा वाटा होता. सोन्याचे पाणी, कृष्णतुळस, गव्हांकुरांचा रस याचाही मला खूप फायदा झाला. डॉ. अरविंद बावडेकरांचे ‘कॅन्सर माझा सांगाती’ हे पुस्तक आणि डॉ. अनिल अवचटांच्या पत्नी सुनंदा यांच्यावरील एका दिवाळी अंकातील लेखामुळे मला सकारात्मक जगण्याची प्रेरणा मिळाली. तुमचे एखादे ध्येयही तुम्हाला प्रेरणा देते. मी एकुलती एक, मी वर्षांचीही नसताना माझे वडील वारले होते त्यामुळे माझे ध्येय होते आईला माझा मृत्यू बघायला लागू नये. त्या ध्येयानुसार जगले. कर्करोगाने मला शिकविले क्षुल्लक गोष्टी लावून न घेणे आणि मनाने खंबीर राहणे आणि ते मी करते आहेच.

– वासंती सिधये, पुणे

.. चटका लावून गेला

१ फेब्रुवारी २०२०च्या अंकातील ‘जागतिक कर्करोग दिवस’ या निमित्ताने काही संघर्ष कहाण्या वाचल्या, त्यापैकी ‘माझा साक्षात्कारी कर्करोग’ हा हेमा भाटवडेकर यांनी कर्करोगाशी केलेला दीर्घकालीन सामना मनाला उत्कट स्पर्श करून गेला. व्यवसाय व कुटुंबामध्ये गुंतून पडल्याने स्वत:कडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या रक्ताच्या कर्करोगाने डोके वर काढले. या काळात वाचन केलेल्या पुस्तकांनी त्यांना स्वत:च्या शरीरावर प्रेम करायला शिकवून वेदना सहन करण्याचे मानसिक बळ दिले. या दरम्यान व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता त्यांनी नियमित योग, प्राणायाम व श्वसनप्रकारांची जोड देऊन संपूर्ण भारत-श्रीलंका भ्रमण केले, त्याचे मोठे कौतुक वाटते. प्रतिकारशक्ती शून्यावर आणून घेतलेले पुढील उपचार त्यांच्या मन:शक्तीचा खंबीरपणा दाखवतात. त्यामुळेच त्यांनी या असाध्य आजारावर यशस्वी मात करून सर्व कर्करोगरुग्णांसाठी, ‘आत्मशक्तीच्या चमत्कारा’चे आत्मसिद्ध उदाहरणच ठेवले आहे. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! या महत्त्वाच्या विषयासंबंधी वेगवेगळ्या स्त्रियांचे अनुभव प्रसिद्ध केल्याबद्दल ‘चतुरंग’चे आभार.

डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, पुणे

अस्सल गद्धेपंचविशी

‘गद्धेपंचविशी’ या सदरातील (२५ जानेवारी) वैभव मांगले यांचा ‘पेरलं ते उगवलं’ हा मनोगतपर लेख वाचला. लेख अत्यंत संवेदनशीलतेने आणि जागरूकपणे लिहिला आहे. त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीचं अस्सलपण यात पदोपदी उमटलं आहे. लेखन खूप प्रामाणिक आहे. त्यात कुठलाही अभिनिवेश नाही. शिवाय त्याला तत्त्वज्ञानाची किनार आहे. त्यामुळे त्यातलं चिंतन वाचकाला नवा विचार देऊन जाणारं आहे. वैभव मांगले त्यांच्यातल्या अस्सल अभिनयाने नट म्हणून चांगलेच आहेत, पण एक माणूस म्हणूनही ते तितकेच सहृदयी आहेत हे त्यांच्या या लेखनाने सिद्ध केले आहे.

-भाग्यश्री पेठकर, नागपूर

स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा

‘गावोगावीचं महिला पायदळ,’ हा भीम रासभर यांचा लेख वाचला. आज गावोगांवी विविध पदावर, स्थानांवर स्त्रियांचं ‘राज्य’ सुरू झालेलं दिसतं खरं, पण त्यातील बऱ्याच स्त्रिया राजकीय नेत्यांच्या नातेवाईक (बायको, सून, मुलगी) असतात. चूल आणि मूल या बंधनात अडकलेल्या स्त्रिया घराबाहेर पडल्या पाहिजेत व पुरुषांनी महिलांना राजकीय, सामाजिक, क्षेत्रात येण्यास प्रवृत्त केले तरच ३३ टक्के महिला आरक्षणाला अर्थ राहील. कायदे व कामकाजाच्या व्यवस्थेसंदर्भात कर्तबगार नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांना प्रशिक्षण दिल्यास, पुरुषांची मक्तेदारी मानलेल्या सर्व पदांवर त्यांची निवड होऊन, त्या चांगलं काम करतील.

याकरता पहिल्यांदा महिला धोरण बनविणाऱ्या महाराष्ट्रात, महिला आर्थिक विकास महामंडळाने सतत पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या नावापुढे आईचं नाव लावणे, किंवा घरावर पतीबरोबर पत्नीचे नाव लावून फक्त भागणार नाही, स्त्रियांनी पदर खोचायला हवा, हे लक्षात घ्यायला हवे.

-श्रीनिवास स. डोंगरे, दादर

हीच खरी श्रद्धांजली..

नीला भागवत आणि गीताली वि. मं. यांचे ‘सामाजिक विश्वाशी एकरूपता’ तसेच आरस्पानी माणुसकी’ हे दोन लेख साऱ्यांनाच विचार करावयास लावणारे आहेत. स्त्रीमुक्तीसाठी हाती घेतलेली चळवळ त्याच गतीने पुढे वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा अगदी तरुणाईला लाजवील अशा धडाडीने, उत्साहाने, जोमाने पुढे ध्येयवेडीच माणसे नेऊ शकतात हे विद्या बाळ यांनी दाखवून त्या अनंतात विलीन झाल्या. यातून तो बोध घेऊन साऱ्या समाजबांधवांनी एक दिलाने, एकसंध होऊन देशाच्या काना-कोपऱ्यांत ही चळवळ यशस्वी करावयास हवी. अविचार, अत्याचार, बळजबरी आसक्तीने आजही महिला टाहो फोडीत आहेत, मात्र कुणालाच त्यांचा आक्रोश ऐकू येत नाही. अनेक अत्याचारित स्त्रिया अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या अत्याचारित स्त्रियांच्या पाठीशी उभे राहून लढा उभारण्याची जबाबदारी समाजाची आहे आणि जर त्यांची ही जबाबदारी स्वीकारली तर हीच  विद्या बाळ यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!

– कीर्तिकुमार वर्तक, वसई

स्वेच्छामरणाची चळवळ पुढे जावी

स्त्रीमुक्तीच्या कार्यकर्त्यां विद्या बाळ यांचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ने ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. नीलम गोऱ्हे यांचा, तसेच ८ फेब्रुवारीच्या ‘चतुरंग’मध्ये नीला भागवत आणि गीताली वि. म. या लेखिकाद्वयींचे लेख प्रसिद्ध करून एका समृद्ध, चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकल्याबद्दल शतश: धन्यवाद!

नीलमताईंच्या ‘बुद्धी-भावनांचं दृढ नातं’ या शीर्षकातच खरं तर या लेखाचं सार सामावलेलं आहे. कोणतीही सामाजिक चळवळ उभी करणं असो किंवा एखादा नवीन विचार समाजाला देण्याचा प्रयत्न असो, त्याचा मार्ग हा विरोधातूनच असणार आणि तसाच भरपूर अनुभव विद्याताईंना आला. मला या लेखात हे जाणवलं की खरी मैत्री कशी असावी, वेगळे विचार, वेगळ्या वाटा, वेगळे निर्णय घेतले गेले तरी मैत्रीचा अतूट धागा, रेशीमबंध कायम राहिला, केवळ परस्पर सामंजस्याने! हा निखळ मैत्रीचा वस्तुपाठच म्हणायला हवा.

नीला भागवत आणि गीताली या देखील विद्याताईंशी अगदी एकनिष्ठतेने त्यांच्या सहकार्यकर्त्यां, एक भाची आणि एक सखीच! त्यांच्या प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार! किती भाग्यवान, ज्यांना अशा व्यक्तिमत्त्वाचा सहवास तर लाभलाच पण त्यांच्या आचार-विचारांच्या प्रभावात कार्य करण्याची संधी मिळाली. एक मुद्दा प्रकर्षांने भावला, जाणवला तो त्यांची ‘स्वेच्छामरणा’विषयीची मतं आणि जनजागृती! विशेषत: विकलांग अवस्थेत जीवन कंठणारे अनेक वृद्ध अवतीभवती बघितले की हा कायदा होण्याची आवश्यकता जाणवते. विद्याताईंचे विचार, स्वेच्छामरणाची चळवळ पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सुनंदा चिटणीस

हा नैसर्गिक दोष कसा काय?

रत्नाकर मतकरी यांना,

‘पुरुष हृदय बाई’ या सदरातील ‘पुरुषसुक्त’ हा आपला लेख वाचला. आपण फार मोठे आहात, मी लेखावर समीक्षा म्हणून ही प्रतिक्रिया देत नाहीये, तेवढी माझी कुवत नाही. आपण मोठय़ा मनाने ती केवळ एक प्रतिक्रिया म्हणून सोडून देऊ  शकताच.

‘लोकसत्ता’ची ‘चतुरंग’ पुरवणी म्हणजे बदलत्या स्त्री मनाचे प्रतिबिंबच आहे, नेहमीच वाचनीय असते. या वर्षी हे आगळेवेगळे सदरसुद्धा वाचनीयच आहे. आत्तापर्यंत केवळ चार भागच झालेत त्यामुळे त्याविषयी काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. तरीही चारपैकी तीन भागांचा सूर असा आहे की पुरुष जे काही चूक वागतात त्यात त्यांचा दोष नसतो, ते नैसर्गिक असते वगैरे. क्षमा असावी पण आपल्या लेखातही तसाच सूर आहे. नाही म्हणायला आपण सुरुवातीला सर्वाना माणूस समजता, असे सांगितलेय आणि एका ठिकाणी संस्कारांचा पण उल्लेख केलाय.

उपजत भावनेच्या आधारावर आपण लिहिलेय, ‘‘पुरुषाला स्वत:ची स्त्री मिळाली, तरी त्यांचे इतर स्त्रियांविषयी आकर्षण संपतच नाही. बहुतेक वेळा परिस्थितीमुळे त्याला परस्त्रीशी (मनात असूनही) संबंध ठेवता येत नाहीत.’’ या मागे संस्कार/बाह्य़ शिक्षण आहे असे आपले म्हणणे आहे. ते खरे आहे. मात्र ते स्त्रियांनाही लागू आहेच. त्यांचे संस्कार अथवा बाह्य़ शिक्षण यामुळे त्यांना परपुरुषाशी (मनात असूनही आणि आता फार सोपे असूनही, सर्व काळजी घेऊन – नैसर्गिक जोखीम टाळून) संबंध ठेवता येत नाहीत. हेही तितकेच खरे आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण जास्त आहे कारण वर्षांनुवर्षे हे स्त्री आणि पुरुष या दोघांवरही बिंबवण्यात आले आहे की स्त्री ही खुंटय़ाला बांधून ठेवायला हवी आणि पुरुष मोकाट फिरला तरी चालतो.

सर, विशेषत: भारत आणि इतर अनेक तथाकथित विकसनशील देशात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. तशीच ही तथाकथित संस्कृती आणि विवाह संस्था स्त्रियांच्या त्यागावरच टिकून आहे. आता स्त्रिया त्यात अडकू इच्छित नाहीत. म्हणून घटस्फोट वाढलेत. विषयांतर होतेय बहुतेक. सारांश असा की, उपजत भावना, आकर्षण हे स्त्री-पुरुष दोघांमध्ये असते. मी काही डॉक्टर अथवा संशोधक नाही. पण एक स्त्री आहेच त्यामुळे स्त्रियांचे शरीर, भावना मला चांगल्याच ठाऊक आहेत. स्त्रियांजवळही ‘लिटिल सिस्टर’ आहे. मी एका मोकळ्या वातावरणात वाढलेली स्त्री आहे. त्यात मला स्वातंत्र्यही मिळाले आणि संस्कारही मिळाले. उपजत भावनेच्या आहारी जाऊन आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली मी स्वैर व्हावे की संस्कार म्हणून जोडीदाराशी प्रामाणिक राहावे ही माझी निवड असेल. तसेच जोडीदारालाही ती आहेच, त्यात त्याने संस्कार निवडले तर हा त्याच्या संस्कारांचा विजय. शिवाय उपजत भावनेच्या आहारी जाऊन सर्व करायचे म्हटले तर इतर प्राणी आणि मनुष्यात काय फरक मग? त्याचे दुष्परिणाम एड्ससारख्या रोगातून समोर येतातच आहेत.

आज इंटरनेटच्या माध्यमातून विकृती बघायला, नको ते प्रयोग करून पाहायला सारे काही उपलब्ध आहे. आजची विकृती उद्याची संस्कृती होईल की काय असे वाटते. बिचारी निरागस मुलेही त्यातून सुटलेली नाहीत. त्यात आपल्यासारखे मोठे लेखक या उपजत भावनेला अधिक मोठे करत आपल्या लेखातून त्याचे समर्थन करत असतील तर विकृतांना बळच येईल. आणि शेवटी आपण म्हटल्याप्रमाणे लहानसहान गोष्ट म्हणून बलात्कार फार मनावर घेऊ  नये असे म्हणायचे का? निर्भया गेली म्हणून काय, मृत्यू तर निश्चित असतो, पाच जणांनी तिच्यावर पशूलाही लाजवेल अशा पद्धतीने बलात्कार केला, पण काय करणार ते ही पुरुषच ना, उपजत भावना!

फार कडू लिहिलेय मी मला मान्य आहे. त्याबद्दल क्षमा.

– स्वाती भाटिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:05 am

Web Title: chturang readers response letter abn 97
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : इतिहासाला जेव्हा जाग येते
2 यत्र तत्र सर्वत्र : राजकारणातील स्त्री
3 गद्धेपंचविशी : ‘दगडावरच्या पेरणी’तून अंकुरले बीज
Just Now!
X