|| रेणू दांडेकर

‘शिक्षांतर’ हा एक वेगळा प्रवास आहे. या प्रवासाचा रस्ता वेगळा आहे, गाठायचं ठिकाण वेगळं आहे. ‘शिक्षांतर’ हे एक धाडस, एक कल्पक जगणं आहे. यामागे निश्चित, ठाम विचार आहे. औपचारिकता सोडून २० वर्षे या वाटेवर आनंदाने चाललेले हे प्रवासी आहेत. ही ‘वारी’ वेगळी आहे. इथे येणारी मुलं त्यांना काय करायचंय आहे त्यासाठी दोन वर्ष देतात.. ज्याला जे येतं, करावंसं वाटतं, पण घरचे करू देत नाहीत ते इथे येऊन करतात. राजस्थानमधील उदयपूर येथील ‘शिक्षांतर’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेविषयी..

‘शिक्षांतर, २१ फतेहपुरा, उदयपूर ३१३००४, राजस्थान’ : या पत्त्यावर तुम्हाला भेटतील विधी जैन, मनीष जैन आणि त्यांचे समविचारी स्नेही. ‘शिक्षांतर’च्या गल्लीत शिरताना आपण ठरावीक प्रकारची इमारत असेल, मुलं असतील, शिक्षक असतील, कार्यालय असेल अशी कल्पना करून शोध घेऊ लागतो. तर एक जण एका बंगल्याकडे बोट दाखवून सांगतो, ‘‘हेच शिक्षांतर. या गल्लीत ‘शिक्षांतर’ पाहायला येणारा माणूस आम्ही ओळखतो.’’ मी गेट उघडायच्या विचारात असते; पण त्याच वेळी इथे पोहोचेपर्यंतचा सारा प्रवास आठवून जातो..

मार्चमध्ये जयपूर, भोपाळ इथल्या शाळा पाहत असतानाच उदयपूरला यायचं ठरलं होतं; पण ‘शिक्षांतर’ बघणं जमत नव्हतं. विधी जैन यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालं तेव्हा त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. विचारलं, ‘‘तुम्ही काय पाहायला येणार आहात?’’

‘‘मला तुमची शाळा पाहायचीय.’’

‘‘शाळा नाहीच आहे आमची. मग काय पाहाणार तुम्ही?’’

‘‘मी ऐकलंय ‘शिक्षांतर’बद्दल?’’

‘‘काय ऐकलंय?’’

‘‘वेगळ्या पद्धतीचं  हे लर्निग सेंटर आहे.’’

‘‘तुम्ही काय करता? का यायचंय तुम्हाला हे बघायला?’’

‘‘भारतातल्या अशा सगळ्या संस्था पाहतेय. आत्तापर्यंत बऱ्याच संस्था पाहिल्या. तिथली अध्यापनपद्धती, विचार, अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकं, मूल्यमापन..’’

‘‘हे इथे काहीच नाही. आमचा यावर विश्वासच नाही. तरीही तुम्हाला यायचं असलं तर फोन करून या. आत्ता गडबडीत आहे.’’ पुन्हा काही दिवसांनी त्यांना फोन केला, ‘‘महाराष्ट्रात एक संस्था एक मोठा पुरस्कार देते. मला..’’

‘‘आम्ही पुरस्कार वगैरे घेत नाही. आमचा यावर विश्वास नाही. स्पर्धा, मूल्यमापन यात आम्ही पडत नाही.’’

‘‘तरी मला यायचं आहे, तुम्हाला भेटायचंय.’’

‘‘आत्ता मी आहे, पण मनीष नाही. आम्ही दोघं असताना तुम्ही यावं. दोघांशी बोलण्याची गरज आहे असं वाटतं..’’

पुन्हा काही दिवस गेले.

..अखेर आजचा दिवस उजाडला.. नि ‘शिक्षांतर’चं गेट उघडून मी आत आले. सगळ्या भिंती वेगवेगळ्या चित्रांनी भरगच्च होत्या. अगदी टोकापर्यंत वेगवेगळी पण अर्थपूर्ण चित्रे होती. एका कोपऱ्यात वाद्यं होती. भिंतीवर ‘तोते की शिक्षा’ ही रवींद्रनाथांची चित्ररूप गोष्ट होती. एका कोपऱ्यात कॅरम बोर्ड, बुद्धिबळ होते. दुसऱ्या कोपऱ्यात वेगवेगळी बियाणं होती. मध्ये एक टेबल नि कडेने गाद्या अंथरल्या होत्या. मधल्या हॉलमध्ये निसर्गऔषधी आणि उत्पादने होती. स्वयंपाकघरात मुलं स्वयंपाक करत होती. तिथेही काय-काय लिहिले होते. क्षणभर वाटून गेलं, ‘आपण एवढय़ा लांबून नक्की का आणि काय पाहायला आलोय?’

मागच्या खोलीमध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिकच्या वस्तू होत्या. एक तरुणी आणि बारा-तेरा वर्षांचा मुलगा संगणकावर काम करत होते. अंगणात शेतीचे काही प्रयोग केले होते. भाजीपाला होता. सगळं काही वेगळं होतं. मी पाहात होते, ‘शिक्षांतर’चे विविध उपक्रम, पण ज्यांना भेटायचं होतं ते विधी नि मनीष जैन कुठे दिसत नव्हते. तेवढय़ात एक २४-२५ वर्षांचा हैदराबादचा एक युवक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी सी.ए. ड्रॉप आऊट आहे.’’

‘‘कुठून आलात?’’

‘‘हैदराबादहून.’’

‘‘इतक्या लांब?’’

‘‘जे मनाला जवळचं वाटतं तिथे इतर अंतरं संपतात. मग लांब काहीच वाटत नाही. हे शेतीतील प्रयोग ‘अरण्यम’ संस्थेतून आलेला मुलगा करतो. तो हैदराबादचाच आहे. तो आत स्वयंपाक करतोय.’’ त्याने सांगितलं.

एवढय़ात विधी जैन आल्या. मोठं कुंकू, मोकळे केस, भरीव-आकर्षक चेहरा, डोळे काजळाने अधिक काळेभोर झालेले.. आम्ही पुढच्या खोलीत आलो. त्या म्हणाल्या, ‘‘इथे येणाऱ्याला आम्ही ‘तू कुठे शिकत होतास? कितवीत आहेस? घरी कोण-कोण आहे? काय करतात?’ हे प्रश्न विचारत नाही. तुला काय करावंसं वाटतंय, काय करता येतं, ते इथे सुरू कर,’ असं सांगून निश्चिंत केलं जातं. माणसं जोडली जातात. ती कामाला लागतात. त्या-त्या कामालाच आम्ही ‘विद्यापीठ’ म्हणतो..’’

‘‘स्वराज काय आहे?’’ मी विचारलं.

‘‘नावातच सगळं आहे. इथे येणारे त्यांना काय करायचंय आहे त्यासाठी दोन वर्ष देतात.. नंतर मनापासून मनातलं प्रत्यक्षात आणतात. उदयपूरला ‘फेमस कॅफे’ आहे. इथल्या दोन मुलांनी सुरू केलाय. ती ‘स्वराज’मध्ये होती.’’

काही तरी फोनवर बोलण्यासाठी त्या बाहेर गेल्या. इतक्यात  संगणकावर एक १२-१३ वर्षांचा मुलगा काम करत होता. मी त्याला विचारलं, ‘‘तू काय करतोस?’’

‘‘मी फिल्म बनवतोय. मला ‘इंटरेस्ट’ आहे त्यात.’’

‘‘तू बनवलेली एखादी फिल्म दाखव ना?’’

‘‘तुम्हाला ही फिल्म दाखवू का? क्रिएटिव्ह कट्टा?  पाहा आवडली तर. नाही तर बंद करेन.’’ तो फिल्म शोधू लागला. डोक्यावर केसांचे चॉकलेटी रंग दिलेलं टोपले होते.

‘‘कितवीत शिकतो?’’

‘‘सहावीत असताना शाळा सोडली.’’

‘‘घर कुठं आहे?’’

‘‘दिल्लीला. वडील पोलीस खात्यात आहेत..’’

मनीष जैन यांचा ‘कन्सेप्ट’ हा अड्डा आहे. ज्याला जे येतं, करावंसं वाटतं, पण घरचे करू देत नाहीत अशी मुलं त्यांना वेळ मिळेल तेव्हा इथे येतात. खेळतात, वस्तू बनवतात, शिवणकाम करतात, सुतारकाम, मातीकाम करतात. वेशभूषा-केशभूषा करतात. मुलं आनंदात असतात. त्यांना वयोगट नाही. कोणीही या अड्डय़ावर यावं.. ‘शिक्षांतर’चं हे वेगळं जग मी बघत होते. ही फिल्मही एका लहान मुलाने बनवली होती.

‘‘देशात अनेक ठिकाणी असे अड्डे सुरू आहेत.’’ मनीष जैन सांगतात. इथे येऊन वेगळं काही करण्यातला आनंद मुलं मिळवतात.’’

तिथे नोकरी करणारी एक तरुणी. एम.ए., बी.एड. झालेली. म्हणाली, ‘‘माझ्या तीन शाळा होत्या. दोन बंद केल्या. एक सुरू आहे. ती चालवणंही अवघड आहे. मीपण आधी शाळेतच शिक्षिका म्हणून काम केलं, आता इथे. छान वाटतं. ती शाळा पुढे कशी न्यायची हा प्रश्न आहे.’’

‘‘इथे पैसे कसे उभे राहतात?’’ तिनं एका कार्डपेपरवर लिहिलेला बोर्ड दाखवला. ‘‘आम्ही देणग्या घेत नाही. मनीषभाई-विधीदीदींचे ओळखीचे, मित्र-मैत्रिणी पैसे देतात. त्यावर चालतं सगळं. आम्ही चौघे जण पगारी आहोत. बाकी मुलं येतात-जातात. मनीषभाईंशी बोलतात. ते वेळ देतात. दररोज जेवढे जण येतील तेवढय़ांना पैसे न घेता जेवण देतात, बनवतातही स्वेच्छेने.’’

बोलत असतानाच जेवायची वेळ झाली. प्रत्येक जण ताट आणणं, वाटय़ा आणणं आपापलं काम करतात. दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण होतं. रस्सा, भात, भाजी, कोशिंबीर. विधी जैन आणि सर्व जण गोलाकार बसून जेवू लागले. प्रत्येक जण आपापली ओळख देत नाव आणि काय करायला आवडतं ते सांगत होता. कुणी सायकलवर भारतभर फिरलेलं होतं. कुणी पक्ष्यांवर काम केलं होतं. कुणी काही, कुणी काही. थोडय़ा वेळाने मनीषजी आले. साधारण दोन वाजले होते. तेही जेवणात सहभागी झाले. प्रत्येकानं आपापलं ताट उचललं, धुतलं. कुणी तरी स्वयंपाकघर स्वच्छ केलं होतं. पुन्हा चर्चा, गप्पा, प्रश्न, शंका आणि मनीषजींचं बोलणं. हळूहळू वेगवेगळ्या वयांची मुलं-मुली येऊ लागली. ज्याला जे करायचं तिथं-तिथं जो तो गुंतला.

मनीषजींभोवती कोंडाळं जमलं. विधी आणि मनीषजींची मुलगीही यात होती. ती शाळेत गेली नव्हती, महाविद्यालयातही नाही. ती छान चित्रं काढत होती. ज्यांचा या बंधयुक्ततेवर विश्वासच नव्हता त्या मनीष-विधीदीदींनी आपल्या मुलीलाही यापासून विमुक्त केलं होतं. दोघांचेही आई-वडील सगळं जग पाहिलेले, मोठय़ा हुद्दय़ावर, मोठय़ा पगारावर काम करणारे होते. ते सोडून या दोघांनी ‘शिक्षांतर’ची स्थापना केली. ते वर्ष होतं, १९९८.

‘शिक्षांतर’मध्ये आल्यापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. काय आहे या ‘शिक्षांतर’मागची कल्पना? ही मुले पुढे आयुष्यात काय करणार? त्यांना नोकरी कशी मिळणार? मग माझ्या लक्षात आलं, आपण चाकोरीबद्ध विचारांच्या गर्तेत बुडालोय. वेगळा विचार आपण करू शकत नाही, मग जगणं तर लांबच. इथला प्रवास मात्र खूपच वेगळा आहे, रस्ता वेगळा आहे, गाठायचं ठिकाण वेगळं आहे. ‘शिक्षांतर’ हे एक धाडस आहे, कल्पक जगणं आहे. यामागे निश्चित, ठाम विचार आहे. सगळ्या औपचारिकता सोडून २० वर्षे या वाटेवर आनंदाने चाललेले हे प्रवासी आहेत. अशा वाटेवर सगळ्यांना नाहीच प्रवास करता येणार. ही वारी काही जणांसाठीच. असं काही जगावेगळं सुरू असणं हेसुद्धा वेगळ्या जगण्यावरचा प्रवास दृढ करतं.

‘शिक्षांतर’मागे मनीष जैन यांची ठोस संकल्पना आहे. विकासाच्या पुनर्रचनेसाठी केलेले जन आंदोलन आहे. माणसाला लहानपणापासून घट्ट बांधून ठेवून गुलाम बनवणाऱ्या सर्व संस्था आणि शक्ती यांना सखोलपणे समजून घेऊन त्यांनाच आव्हान देणे आहे. सध्याच्या शालेय शिक्षणाबाबत काही चुकीच्या धारणा असताना स्थानिक लोकभाषा, परंपरा, ज्ञान आणि नैसर्गिक वैशिष्टय़ांना ‘शिक्षांतर’ महत्त्व देते आणि यांना भरभक्कम करण्यासाठी बांधून घेते. हे आंदोलन उदयपूर येथे १९९८ पासून सुरू आहे. ‘शिक्षांतर’चा गट स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो. हे काम क्रियात्मक शोध घेते. ‘शिक्षांतर’च्या मते, प्रत्येक व्यक्ती एक सर्जनाचा स्रोत आहे. मात्र त्यासाठी

प्रत्येकाला व्यक्त व्हायला एक अवकाश द्यावा लागतो. तिथे माणूस चुकत-चुकत शिकतो. ज्यांना व्यक्त व्हायचंय त्यांना हा अवकाश ‘शिक्षांतर’ पुरेपूर देतो.

 संपर्क –

  • शिक्षांतर २१ फतेहपुरा,
  • उदयपूर ३१३००४, राजस्थान
  • ईमेल – shikshantar@yahoo.com
  • website – swaraj.org/shikshantar

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

(उर्वरित भाग २४ ऑगस्टच्या अंकात)