रजनी परांजपे

‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण पुष्कळदा म्हणतो आणि ऐकतोही. तळागाळापर्यंत जाऊन हा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मार्गावरचे पहिले पाऊल. आम्ही जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले, मात्र अद्याप अनेक ठिकाणच्या मुलांना चांगले लिहिता-वाचता येत नाही. ही लेखमाला आजच्या लेखाबरोबर संपली असली तरीही त्यातून वाचनाचं महत्त्व ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केला तो सर्वदूर पसरावा.. इतकंच.

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
ग्रामविकासाची कहाणी
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

‘सर्वासाठी शिक्षण’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख. त्याची सुरुवात मी मनीषा भोसले या आमच्या प्रशिक्षिकेने घेतलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील एका प्रशिक्षणाच्या अहवालातील काही भाग देऊन करते आहे. ‘तेलंगणा आणि आंध्रच्या सीमेपासून अगदी ४० ते ५० किलोमीटरच्या आसपास मरकागोंदी, पुनागुडा, धनकदेवी, सीतागुडा, कुलगोडी, नंदप्पा, कोलामगुडाची, आसापूर गणेरी, गडचांदूर, जिवसी ही गावे वसलेली आहेत. या अकरा गावांमधून नऊ शिक्षिका आणि दोन  पर्यवेक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती आहे. येथे प्रामुख्याने कापूस, तूर आणि गहू ही पिके घेतली जातात. प्रशिक्षण नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे कापसाचा हंगाम सुरू होता. जे शिक्षक या प्रशिक्षणासाठी येत होते ते सर्व सकाळी कापूस काढण्याच्या कामाला जात. एक किलो कापूस काढल्यावर त्यांना ७ ते ८ रुपये मजुरी मिळते. एका दिवसामध्ये ५० ते ६० किलो किंवा जास्तही कापूस काढतात. हा त्यांचा नेहमीचा व्यवसाय; पण प्रशिक्षणामुळे त्यांचे या दिवसातील त्यांच्या कामाचे उत्पन्न त्यांना मिळणार नव्हते आणि त्यातील काहींना घरापासून जिवती या गावामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येण्यास वाहतुकीची सोय नसल्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात पायी यावे लागत होते, तर काही जणांचा रोज १०० रुपये प्रवास खर्च होत होता. त्यांना काही मानधन मिळणार नव्हते. पण तरीही मुलांना शिकवण्याची जिद्द असल्यामुळे या सर्वानी प्रशिक्षण पूर्ण केले.

बरेच पालक स्वत: १०-१४ वयोगटातील मुलांना या कामासाठी पाठवतात. त्यांना एका किलोमागे ४ रुपये उत्पन्न मिळते. यामुळेही मुलांचे शाळेत दाखल न होणे किंवा दाखल होऊनही नियमित शाळेत न जाणे, हे घडते. आठवीच्या वर्गात मूल असूनही चांगल्या प्रकारे लेखन-वाचन न करता येणारी मुले इथेही सापडतात. आमच्या प्रशिक्षणातील एका प्रशिक्षणार्थीलाही वाचन करताना अडचण येत होती. मनामध्ये एक शब्द वाचत, थोडा वेळ थांबत, मग अडखळत, एकेक शब्द मोठय़ाने वाचावा लागत होता; परंतु त्या खेडय़ामध्ये हा एकमेव मुलगा शिक्षकाचे काम करायला तयार असल्यामुळे त्यालाच प्रशिक्षण देऊन तयार करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. अहवालामधील थोडा भाग येथे देण्याचे मुख्य कारण मुले शाळेत जातात, पण शिकत नाहीत. त्यांना साधे लिहिता-वाचताही येत नाही हे सांगणे किंवा दाखवणे, हे नाही. तसेच शाळाच नसलेली लहान खेडीपाडी अजूनही अस्तित्वात आहेत, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.

अहवालामधले प्रशिक्षणार्थी म्हणजे साधी नववी, दहावी झालेली, रोजच्या पोटापाण्यासाठी मजुरी करणारी माणसे; पण संधी मिळाल्यावर त्याचा नीट उपयोग करून घेणारी, मुलांना शिकवण्याची इच्छा, जिद्द मनात असणारी, स्वत: शारीरिक कष्ट आणि आर्थिक झीज सोसूनही त्या दिशेने प्रयत्न करणारी माणसेही तेथे सापडतात, हे दाखवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश. अशी जिद्द, अशी इच्छा असणारी माणसे म्हणजे जणू तेलवात घालून तयार केलेल्या पणत्याच. फक्त ती पेटवणारा कोणी तरी पाहिजे..

इथे ज्यांना आपण शिक्षक म्हणून संबोधतो आहोत, ते आम्ही चालवत असलेल्या वर्गावरचे शिक्षक. सरकारी शाळांतून शिकवणारे शिक्षक नव्हेत. आमच्या वर्गाचा मुख्य उद्देश मुलांना चांगले लिहिता-वाचता आले पाहिजे हा. चांगले लिहिता-वाचता येणे, याचा अर्थ न अडखळता, न थांबता लिखित शब्द, वाक्ये सहजतेने वाचता येणे. ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण पुष्कळदा म्हणतो आणि ऐकतोही; पण आपल्याला ‘वाचवण्या’साठी असलेले ते वाचन कसे असले पाहिजे याचा विचार सहसा आपल्या मनात येत नाही. ते अस्खलित असेल असेच आपण गृहीत धरलेले असते; पण परिस्थिती तशी नाही, हे वारंवार निदर्शनास येते. त्यामुळेच शिक्षणाच्या मार्गातला पहिला टप्पा किंवा पायाचा दगड म्हणू या, चांगले लिहिता-वाचता येणे हाच आहे, हे लक्षात घेणे आवश्यक. तळागाळापर्यंत जाऊन हा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मार्गावरचे पहिले पाऊल.

पण तसे होताना दिसत नाही याचे कारण ‘आता ही मुले हातात मिळालीच आहेत तर त्यांना हेही शिकवले पाहिजे आणि तेही, फक्त लिहिता-वाचताच येऊन कसे चालेल,’ हा विचार आहे आणि तो चुकीचा नाही. चांगले लिहिता-वाचता आलेच पाहिजे, असा आग्रह धरण्याची दोन कारणे. एक तर पुढील शिक्षणाचा हा पाया आहे. तो पक्का नसेल तर काय होते, हे आपण पाहतोच आहोत. दुसरे म्हणजे, मधूनच शिक्षण सोडणारेही बरोबर काही तरी ठोस घेऊन जातील हेसुद्धा महत्वाचे. अर्थात तेवढेच करायचे नाही.

शिवाय जे-जे नवीन आहे ते-ते यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, हेसुद्धा खरेच; पण त्यातही पुष्कळदा थोडी घाई होते, असे वाटते. मुलाने घरात शिजवलेली प्रत्येक गोष्ट खाल्ली पाहिजे, त्याला त्या सर्व चवींची सवय लावणे फायद्याचे असते, हे खरे; पण सहा महिन्यांच्या मुलाला सर्व गोष्टी अगदी मऊ, त्याला खाता येतील अशा स्वरूपात दिल्या पाहिजेत, हे आपल्याला कोणी सांगावे लागत नाही. तसेच घरात आहे म्हणून मिरचीचा ठेचा कुणी त्याला चाटवत नाही. मुलांना शिकवताना मात्र अजून आईचे दूधही पुरेसे तोंडी लागले नाही तोच वाघिणीचे दूध पाजण्याची आमची घाई! चंद्रपूरजवळच्या दोन खेडय़ांमधल्या मुलांजवळ पाटय़ा-पेन्सिली अथवा वह्य़ा-पेन्सिली नव्हत्या. वह्य़ा आणि पेन्स होते. शिवाय वर्गातील भिंतीवर

‘ई-लर्निग’साठीचा पडदा होता ही वस्तुस्थिती आहे. ‘सर्वासाठी शिक्षण’ हे ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासक्रम जरी ठरलेला असेल तरी ते कसे, कुठल्या पद्धतीने, किती वेळात आणि कुठली साधनसामग्री वापरून शिकवायचे, हे मात्र परिस्थितीनुसारच ठरवणे आवश्यक आहे. कुठलाही अभ्यासक्रम असला, तरी ज्या भाषेत आपण शिकणार ती भाषा म्हणजेच त्याची लिपी, त्यातील शब्द, त्यातील मजकूर नीट वाचता येणे गरजेचेच. आकलन किंवा समजणे ही वाचल्यानंतरच होणारी क्रिया. आपण भाषा बोलतो, ऐकतो आणि त्यात व्यवहार करतो ते आकलनाच्याच आधारे; पण ऐकायलाच आले नाही तर समजणार कसे? वाचायलाच आले नाही तर आकलन होणार कसे?

हे पुन:पुन्हा लिहिण्याचे कारण एवढेच, की हे होताना दिसत नाही. ‘जुने जाऊ दे मरणालागूनी’ आणि ‘नवे ते हवे’ या विचारांनी झपाटल्यासारखे आपण वागतो. ही सर्व मुले अभ्यासक्रम पूर्ण करतील याची खात्री नाही. त्यामुळे काय-काय शिकवायचे त्याचा क्रम विचारपूर्वक ठरवला पाहिजे आणि त्या क्रमवारीत वाचनाचा क्रम पहिलाच; पण सर्वानाच हे पटते किंवा लक्षात येते, असे दिसत नाही.

अगदी अलीकडचा अनुभव. आम्ही एका अनाथाश्रमातील मुलांबरोबर काम करतो. त्यांचे वाचन पक्के व्हावे म्हणून तेथे वर्ग घेतो. गेल्या सहा महिन्यांत काही ना काही कारणाने वर्ग झाले नाहीत, असे प्रसंग पुष्कळ. यावरून ‘व्यवस्थापकांचे मुलांकडे लक्ष नाही’ हा आमचा निष्कर्ष; पण तसे नव्हते. एक दिवस ‘सकाळचा वर्ग होणार नाही,’ असे सांगितल्यावर आम्ही संध्याकाळी वर्ग घेतला. त्यावर आश्रमातून आम्हाला ताबडतोब विचारणा झाली- ‘संध्याकाळी वर्ग सुरू केला तर मुले खेळणार कधी?’ प्रश्न बरोबर; पण तो प्रश्न सकाळचे वर्ग बुडत होते तेव्हा चालकांना सुचला नाही, याचे कारण त्या वर्गाचे म्हणजेच मुलांना चांगले लिहिता-वाचता येण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसलेले नाही, हेच नाही का? ही लेखमाला आता संपली. त्यातून आजवर हेच ठसवण्याचा प्रयत्न केला.

‘मुलांचे शिक्षण’ हे ज्यांचे लक्ष्य आहे त्या शाळा, ते शिक्षक आणि निरनिराळ्या निवासी अथवा अनिवासी संस्थांनी, त्या देत असलेल्या शिक्षणाकडे या दृष्टिकोनातून बघावे. त्यांनी मुलांना वाचायला शिकवण्यासाठी खास प्रयत्न करावे. शिकलेले टिकून राहावे म्हणून निरनिराळे वाचायची संधी, म्हणजेच वयानुसार आणि पातळीनुसार निरनिराळी पुस्तके, साहित्य मुलांना वाचायला मिळेल याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे. एवढे केले तर शिक्षण आणि शैक्षणिक दर्जाचा जो प्रश्न आज नीरगाठ बसल्यासारखा वाटतो आहे, तो हळूहळू उकलायला सुरुवात होईल. किंबहुना, असे केले तरच ती सुरुवात होईल, ती व्हावी हीच या निमित्ताने प्रार्थना..

(सदर समाप्त)

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com