15 August 2020

News Flash

‘कोर्ट’शिप

करिअरच्या सुरुवातीचा काळ दोघांसाठी कठीण होता. कधी कधी तर मोजकेच पैसे असायचे, मात्र तो काळ आमचं नातं अधिक परिपक्व करणारा होता. विकासना चित्रपट पहाण्याची हुक्की

| November 15, 2014 01:01 am

15-zali‘‘करिअरच्या सुरुवातीचा काळ दोघांसाठी कठीण होता. कधी कधी तर मोजकेच पैसे असायचे, मात्र तो काळ आमचं नातं अधिक परिपक्व करणारा होता. विकासना चित्रपट पहाण्याची हुक्की यायची तर मला घरात तेल नसल्याची आठवण यायची, पण आम्ही तेलाला काट मारून करमणुकीला प्राधान्य द्यायचो. लग्न होईपर्यंत स्वयंपाक करण्याशी माझा संबंधच आला नव्हता, मग चहा करणं, कुकर लावणं, फोडणीचं वरण अशा प्राथमिक गोष्टी मी यांच्याकडूनच शिकले. आज यशाने चारी बाजूंनी आम्हाला कवेत घेतलं आहे. आमचं लग्नाआधी कोर्टात सुरू झालेलं कोर्टशिप, प्रियाराधन, आजही तसंच सुरू आहे, असंच मला वाटतं.’’सांगताहेत, निवृत्त वरिष्ठ अॅडव्होकेट कुमकुम सिरपूरकर आपले पती, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्याबरोबरच्या ४१ वर्षांच्या सहजीवनाविषयी. 

तो १९६७ चा काळ, मी नुकतीच आर्ट्स ग्रॅज्युएट होऊन, नागपूरच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्या वेळी मुली सर्रास एलएल.बी. होत नसत. आम्ही बंगाली आणि बऱ्याच वर्षांपासून नागपूरमध्ये स्थायिक होतो. आमचं घराणंही नावाजलेलं होतं. माझे आजोबा रायबहादूर डे, रिटायर्ट डिस्ट्रिक्ट जज होते. वडीलही वकील होते. नागपुरात आमचा भलामोठा बंगला, आईवडिलांची मी एकुलती एक लेक असल्याने, अतिशय लाडाकोडात वाढलेली. अभ्यासात मी पहिल्यापासूनच खूपच हुशार. साहजिकच मीही वकील होऊन नाव कमवावं अशी सगळ्यांची मनीषा होती.
ch16लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे मी नाटय़विभागाची अध्यक्ष झाले. कॉलेजमध्ये त्यावर्षी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटक बसवलं जात होतं. त्यात ‘आचार्य’ची भूमिका करणाऱ्या विकास सिरपूरकरशी माझी दोस्ती झाली. आमचं भलंमोठं मित्रमंडळ होतं. आम्ही सगळेच ब्राइट स्टुडंटस्, विकास तर मॅट्रिकला चंद्रपूर जिल्हय़ातून सर्वप्रथम आले होते. नाटय़, संगीत, साहित्य, काव्य साऱ्यांचीच आवड आणि उत्तम जाण असलेले विकास लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. आमची मैत्री छान जमली होती.
एलएल.बी.ला मला ‘हिंदू लॉ’ या विषयात सुवर्णपदक मिळालं. आता आई-वडिलांची इच्छा होती, एखाद्या प्रतिष्ठित, खानदानी बंगाली कुटुंबात माझं लग्न लावून द्यावं, त्याप्रमाणे त्यांनी वरसंशोधनही सुरू केलं होतं. पण माझ्या मनाची तयारी नव्हती. मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. योगायोगानं मी आणि विकास कोर्टात आमनेसामने आलो. दोघंही विरुद्ध पार्टीचे वकील. दोघंही उत्कृष्ट कैफियत मांडायचो. त्यातूनच प्रेमाची रुजवात झाली. कोर्टात आमची ‘कोर्टशिप’ सुरू झाली. प्रेम फुलत गेलं. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. विकासची कौटुंबिक पाश्र्वभूमी माझ्याशी मिळतीजुळती होती. त्यांचे वडील वरोडय़ाचे प्रख्यात वकील आणि राजकारणी. आईसुद्धा वकील. वरोडय़ातली पहिली महिला वकील आणि सामाजिक कार्यकर्ती. त्या अतिशय प्रेमळआणि पुढारलेल्या विचारांच्या होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नानंतर मुलं झाल्यावर त्या एलएल.बी. झाल्या तेही पहिल्या वर्गात, तेसुद्धा कुठल्याही कॉलेजला न जाता, स्वत:चा अभ्यास स्वत: करून! आमच्या लग्नाचा निर्णय आम्ही घरच्यांना कळवला. विकासच्या घरून पूर्ण पाठिंबा मिळाला, पण माझ्या घरून पूर्ण विरोध. वडिलांनी धमकी दिली, ‘आमच्या मर्जीविरुद्ध लग्न करशील तर आमच्याशी संबंध तुटतील.’ पण माझा निर्णय ठाम होता. त्यांच्या विरोधाला न जुमानता मी घर सोडलं आणि विकासशी विवाहबद्ध झाले. माजी परमप्रिय मैत्रीण, मीरा खडककर (निवृत्त न्यायाधीश) हिनं माझं कन्यादान केलं आणि आपलं नातं कायम निभावलं. लग्न झालं, माहेर तुटलं. दोघांची प्रॅक्टिस सुरू होती, पण जम बसला नव्हता. आर्थिक चणचण अधूनमधून जाणवत होती. आजोबांचा भलामोठा वाडा सोडून मी विकासबरोबर भाडय़ाच्या घरात राहू लागले. आमच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहू लागले.
कधी कधी तर मोजके पैसे असायचे. पण तो काळ आमचं नातं अधिक परिपक्व करणारा, आमच्या सहजीवनाला आकार देणारा होता. विकासना चित्रपट पाहण्याची हुक्की यायची तर मला घरात तेल नसल्याची आठवण यायची, पण तेलाला काट मारून आम्ही करमणुकीला प्राधान्य द्यायचो. लग्न होईपर्यंत स्वयंपाक करण्याशी माझा कधीच संबंध आला नव्हता, कारण घरात पाच-सहा नोकर, स्वयंपाकाला पंडित. पण विकासना उत्तम स्वयंपाक करता येत होता. चहा करणं, कुकर लावणं, फोडणीचं वरण अशा प्राथमिक गोष्टी मी त्यांच्याकडूनच शिकले. तो काळ असा होता की, कुठल्याही कुटुंबात, सुनेला ‘सासुरवास’ सोसण्याखेरीज पर्याय नव्हता. पण माझ्या सासूबाई त्याला अपवाद होत्या. सासूबाई, सासरे, दीर, नणंद आणि मुख्य म्हणजे पती, साऱ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं की, माझी झोळीच अपुरी पडली. माझं माहेर तुटलं होतं, पण ‘सासर’ नावाचं समृद्ध माहेर मला मिळालं होतं. विकास माझ्यासाठी बंगाली भाषा शिकले. इतकंच नाही, त्यात तरबेजही झाले. लग्नानंतर वर्षांतच आमच्या मुलाचा, संग्रामचा जन्म झाला. त्या वेळी मला आईची प्रकर्षांनं आठवण झाली. पण सासूबाईंनी माझं बाळंतपण इतकं निगुतीनं केलं की माझ्या आईनंसुद्धा तितकं केलं नसतं.
आम्ही दोघांनी आमच्या प्रॅक्टिसची सुरुवात उच्च न्यायालयातून सुरू केली. बघता बघता जम बसू लागला. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचच्या केसेस घ्यायला सुरुवात केली. आमचं दोघांचं करिअर घडायला सुरुवात झाली. दरम्यान, मुलीचा, आदितीचा जन्म झाला. कुटुंबाचा चौथा कोन पूर्ण झाला. भाडय़ाच्या जागेतून आम्ही स्वत:च्या जागेत स्थलांतरित झालो.
माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझं सासर, माझा संसार, माझी प्रॅक्टिस, सारं काही दृष्ट लागण्याजोगं उत्कृष्ट होतं. मात्र एकच उणीव होती, माझ्या माहेरची. आईबाबा एकाच गावात राहून, मला माहेरी जाता येत नव्हतं, ना ते माझ्याकडे येत होते. सारंच अवघड. मुलांच्या संगोपनाला वेळ देता यावा म्हणून आंबेडकर कॉलेजच्या लॉ कॉलेजमध्ये मी दहा वर्षे लेक्चररशिप केली. या शिकवण्यामुळे मला भरपूर यश आणि कीर्ती मिळाली. त्याच वेळी विकासच्या यशाचा अश्वमेध घोडा वेगानं दौडत होता. ‘हायकोर्ट बार असोसिएशनचे सेक्रेटरी’ म्हणून त्यांची निवड झाली. पुढे मीही हायकोर्ट बार असोसिएशनची अध्यक्ष म्हणून निवड झालेली पहिली स्त्री ठरले. विकास अतिशय मितभाषी, मनमिळाऊ आणि स्वत:च्या कामावर निष्ठा असणारे असल्याने त्यांचा संपर्क अफाट होता. आमच्याकडे फिर्यादींची अक्षरश: रीघ लागलेली असे.
अशातच १९९२ मध्ये विकासची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुंबईला नेमणूक झाली. खरं तर नागपूरमधली उत्तम प्रॅक्टिस सोडून ‘न्यायाधीश’ व्हायचं म्हणजे, बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागणार होता. शिवाय घर, मुलं, त्यांचं शिक्षण, व्यवसाय या साऱ्यांचा भार माझ्या एकटीवर पडणार होता. त्यामुळे ते द्विधा मन:स्थितीत होते. परंतु मी, माझे सासरे, सासूबाई सर्वानी पाठिंबा दिल्याने, विकासनी न्यायाधीश होणं स्वीकारलं. मी आणि मुलं शिक्षणासाठी नागपूरला राहणार असल्याने, दोन ध्रुवांवर दोघे आपण, असा आमचा संसार सुरू झाला.
तत्पूर्वी आम्ही संग्रामच्या मुंजीचा घाट घातला. लग्नाला चौदा वर्षे झाली होती. एक दिवस अचानक विकासनी, आमची कार माझ्या माहेरच्या बंगल्यासमोर थांबवली. मी गोंधळले. ‘कुमकुम, आपण तुझ्या माहेरी, त्यांच्या नातवाच्या मुंजीचं निमंत्रण द्यायला चाललोय.’ माझी तयारी नव्हती, पण विकासनी माझा हात धरून जवळजवळ ओढतच मला आत नेलं. विकास बाबांच्या ऑफिसमध्ये एकटेच गेले आणि मी मात्र परक्यासारखी व्हरांडय़ात उभी राहिले. इतक्यात आतून आई आली आणि मला आत घेऊन गेली. आईबाबा, इतक्या प्रेमानं आणि आपुलकीनं वागले की, मधला १४ वर्षांचा दुरावाच पुसला गेला. आमची दिलजमाई झाली आणि १४ वर्षे थोपवून ठेवलेली प्रेमाची सारी कसर, त्यांनी भरून काढली. माझं तुटलेलं माहेर, परत सांधलं गेलं. त्यांना माझा आणि विकासचा खूपच अभिमान वाटत होता. मी खरोखर भरून पावले, तृप्त झाले, सुखावले.
मी आणि विकास अतिशय समाधानी होतो. विकास यशाच्या एकेक पायऱ्या चढत होते. प्रथम मुंबई उच्च न्यायालय, पाच वर्षांत मद्रास न्यायालय, उत्तरांचल न्यायालयाचे मुख्य चीफ न्यायाधीश, कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशी चढती कमान होती. देशविदेशातल्या जस्टिस कॉन्स्फरन्सचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. भारत, चीन, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका, तुर्कस्थान आणि इंग्लंडचे कॉन्फर्न्सेस जज म्हणून नेमणूक झाल्यावर त्या त्या ठिकाणी त्यांनी ज्युडिशिअल अॅकॅडमीज सुरू केल्या. न्यू दिल्लीच्या बार असोसिएशनच्या लीगल एज्युकेशनल कमिटीचं सभासदत्व त्यांना बहाल करण्यात आलं. न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेले अनेक निकाल त्या त्या वेळी खूप गाजले. विशेषत: लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातला पाकिस्तानी अतिरेकी महम्मद अरिफ याच्या फाशीच्या शिक्षेचा निकाल, केरळ लीकर ट्रॅजेडीची केस, कोईमतूरच्या लक्ष्मी मिल्सच्या मालकाच्या मुलाच्या प्रेम प्रकरणाची केस अशा अक्षरश: असंख्य केसेसचे निकाल खूपच गाजले.
विकासच्या उत्कर्षांबरोबर माझीही घोडदौड चालूच होती. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचच्या कॉन्स्टिटय़ूशनल, क्रिमिनल, सिव्हिल आणि मॅट्रिमोनिअल केसेस मी चाळीस वर्षे पाहिल्या. नागपूरच्या गाजलेल्या ‘गोवारी हत्याकांडच्या’ चौकशीसाठी नेमलेल्या ‘दाणी कमिशनची’ कमिशनर्स कांऊन्सेल म्हणून मी काम पाहिलं. सुप्रीम कोर्टात, इन्डिपेन्डट अॅपिअरन्सेस मी दिले आहेत. नागपूर विद्यापीठाच्या लॉ फॅकल्टीची सिनेट मेंबर म्हणून पाच वर्षे मी काम केलं. नागपूर जिल्ह्य़ाच्या, फ्री लीगल एडस् आणि अॅडव्हाइस कमिटी तसेच नागपूर पोलीस कमिशनरेटच्या सोशल सिक्युरिटी सेलची मी सदस्य होते.
पण तोही प्रवास सुरुवातीला सोपा नव्हता. मी जेव्हा हायकोर्ट बार असोसिएशनची अध्यक्ष म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं, तेव्हा बऱ्याच जणांनी माझं मानसिक खच्चीकरण करायचा प्रयत्न केला. पण मी बधले नाही. एका वरिष्ठाने मला सल्ला दिला, ‘तुम्ही जर ही निवडणूक लढलात, तर तुमच्या पतीच्या करिअरवर दुष्परिणाम होतील.’ त्यांच्या शब्दांनी, माझं मन विचलित झालं. त्या वेळी विकास मद्रास हायकोर्टात न्यायाधीश होते. मी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले, ‘माझ्या करिअरची तू मुळीच चिंता करू नकोस. तू तुझ्या करिअरचा विचार कर. या लढाईतून अजिबात माघार घेऊ नकोस. उलट हे आव्हान स्वीकार आणि स्वत:चं करिअर घडव.’ त्यांच्या शब्दांनी मला दिलासा मिळाला. विकासनी मला फक्त शाब्दिक आधारच दिला असं नाही तर ती निवडणूक होईपर्यंत ते नागपूरला आलेच नाहीत. उगाच त्यांच्यामुळे मी निवडणूक जिंकले असं कुणाला वाटू नये म्हणून. माझं सारं यश मी, माझ्या स्वत:च्या हिमतीवर मिळवलं, याचा विकासना नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
विकास हायकोर्टात न्यायाधीश होण्यापूर्वी आम्ही दोघं वकील म्हणून एकत्र प्रॅक्टिस करत होतो, तेव्हाची गोष्ट. मुलं लहान होती. त्यांचं संगोपन व्यवस्थित करणं आवश्यक होतं. त्यांचं खाणं, पिणं, शाळा, अभ्यास, खेळ, छंद साऱ्याच गोष्टींना प्राधान्य देणं भाग होतं. त्या काळात महिला वकिलांच्या परिषदा भारतात विविध ठिकाणी होत असत. मला त्यांना उपस्थित राहावं लागत असे. माझ्या अनुपस्थितीत विकास, माझ्या साऱ्या भूमिका पार पाडत असत. मला प्रत्येक परिषिदेला उपस्थित राहायला भाग पाडत. एरवी कठोर आणि शिस्तप्रिय असलेले विकास, आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत फार हळवे होत हे मला त्या वेळी लक्षात आलं. एकदा एका कॉन्फरन्ससाठी मी कोचीला गेले होते. त्याच वेळी तिथे मोठी दंगल उसळली. त्या बातमीनं विकास हवालदिल झाले आणि फोनवर मला म्हणाले, ‘तू घाबरू नकोस, मी येतोय तिथे.’ पण मीच त्यांना रोखलं आणि सांगितलं, ‘तुम्ही मुळीच काळजी करू नका आणि येऊही नका. आम्ही सगळ्या सुरक्षित आहोत.’ माझ्या बरोबरीच्या इतर स्त्रियांनीही त्यांना तशी हमी दिली, तेव्हा त्यांच्या जिवात जीव आला.
आज आमच्या लग्नाला ४१ वर्षे झाली आहेत. मुलगा, सून दोघंही यशस्वी वकील आहेत. दोघांची प्रॅक्टिस उत्तम चालते आहे. सुनेने एलएल.बी. आणि एलएल.एम.मध्येही घवघवीत यश मिळवलं आहे. मुलगी, जावई बंगळुरूला आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. तीन नातू आहेत. सध्या आम्ही नागपूरमध्ये माझ्या आजोबांच्या मोठय़ा बंगल्यात (रायबहाद्दूर डें यांच्या) राहात आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असल्याने चोवीस तास पोलिसांची सुरक्षा असते. न्यायाधीश म्हणून विकास जसे यशस्वी झाले, तसेच माणूस, नवरा, पिता, आजोबा म्हणूनही ते यशस्वी झाले आहेत. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येकाला ते आपलेच वाटतात आणि हवेहवेसे वाटतात. इंग्रजी, मराठी, बंगाली, तमीळ, मल्याळी अशा भाषांत ते पारंगत असून, सध्या उर्दू भाषेचा अभ्यास चालू आहे.
आज मी सुखाने संसार करतेय, पण मला सुरुवातीचा एक प्रसंग राहून राहून आठवतोय, माझे पती, माझे सासू-सासरे, दीर, नणंद सगळेच खरंतर बुद्धिवादी. तरीही एकदा सहज गंमत म्हणून आणि कोणा स्नेह्य़ानं माझी आणि विकासची जन्मकुंडली एका प्रख्यात ज्योतिषाकडे दिली म्हणून केवळ कुतूहलापोटी आम्ही दोघं त्या ज्योतिषाकडे गेलो. तो म्हणाला, ‘मला सांगायला संकोच वाटतो की, तुमच्या कुंडलीतले जेमतेम दहा ते बाराच गुण मिळताहेत. खरं तर, तुमच्या भविष्यात खडाष्टकाचा योग लिहिलेला दिसतोय. पटणार नाही अजिबात तुमचं..’ विकासना अतिशय संताप आला. त्यांनी माझा हात धरला आणि मला तिथून बाहेर काढत म्हणाले, ‘हे बघ कुमकुम, अगदी प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं जरी येऊन सांगितलं ना की तुमचे गुण जुळत नाहीत तरी बेहेत्तर. तुला माहीत आहे नं, आपण दोघांनी एकमेकांचे हात धरलेत ते कधीच न सोडण्यासाठी आणि खडाष्टक? ते तर शक्यच नाही. तुझ्या डोळ्यातून एक थेंब अश्रूही येऊ देणार नाही, असं वचन मी पूर्वी दिलं होतं आणि आत्ताही देतो. चल.. उगाच नाही ते विचार मनात येऊ देऊ नकोस.’ विकासचे ते आश्वासक शब्द मला सुखावून गेले आणि तेच सुख आजही माझ्या संसारात भरून ओसंडून वाहात आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 1:01 am

Web Title: how they balance their relation in married life
Next Stories
1 हास्याची अद्भुत संजीवनी
2 पर्यावरणाला साथ कायद्याची
3 हृदयाची भाषा
Just Now!
X