19 September 2020

News Flash

निरामय घरटं : नित्य नेमे विसर्जन!

शिकत जाण्याबरोबरच, काही गोष्टी सोडून देणं, जाणीवपूर्वक विसरणं किंवा वेगळ्या पद्धतीनं फिरून एकवार शिकणं, या प्रक्रिया करू  शकण्याचं सामर्थ्य माणसाला मिळालेलं आहे.

लहानपणी मुलं बहुतेकदा वर्तमानात जगू शकतात. त्यांना कोणाशी तरी झालेलं भांडण विसरता आलेलं असतं, भविष्याची चिंता करत बसायच्या विचारांनी अजून मनाला स्पर्श केलेला नसतो.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

शिकत जाण्याबरोबरच, काही गोष्टी सोडून देणं, जाणीवपूर्वक विसरणं किंवा वेगळ्या पद्धतीनं फिरून एकवार शिकणं, या प्रक्रिया करू  शकण्याचं सामथ्र्य माणसाला मिळालेलं आहे. या क्षमतेमुळे आपल्याला अनेक भार पेलणं सुसह्य़ होऊ शकतं. त्यासाठी आवश्यक असतं ते जीवनाच्या वेगवेगळया टप्प्यांवरचं विसर्जन..  कसं असतं ‘स्वीकारशील विसर्जन’, ‘जबाबदार विसर्जन’ आणि ‘अनलर्निग’.. उत्सर्जनाच्या या विविध क्षमतांविषयी..

गिरिजानं फोन करायला मोबाइल उचलला. मोबाइल उघडल्या उघडल्या ‘ खोली तुडुंब भरली आहे’ (अर्थात ‘स्टोरेज स्पेस रनिंग आऊट!’) अशी पूर्वसूचना मिळाली. खंडीभर फोटोंची शंृखला संपत नव्हती. सगळंच उडवून टाकायचं, की त्यात काही फारकत करायची? मोबाइलवर तर भरमसाठ महितीची दाटी झाली होतीच. त्यात गिरिजाच्या मनातही विचारांची गर्दी जमली. ‘डिलीट’ कधी, काय, किती करायचं, हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. मुळात किती साठवायचं, कुठे थांबायचं, काय सोडून द्यायचं.. गिरिजाला स्वत:च स्वत:साठी बदल करावासा वाटला. काय बदल करू शकेल गिरिजा?

‘दीड दिवस झाल्यानंतर गणपती गेला सोडून घर, तेव्हा अमृताला आले रडू, पेढासुद्धा लागला कडू..’ अशी विंदा करंदीकर यांची निरोप देताना वाटणाऱ्या भावनेला स्पर्श करणारी बालकविता आहे. आवडती गोष्ट सोडणं, लाडक्या व्यक्तीला  निरोप देणं, किंवा हव्याहव्याशा भावनेतून बाहेर येणं, सवयी बदलणं, काही आठवणी जाणीवपूर्वक विसरणं, हे क्लेशदायी वाटू शकतं. पण या धारणेतूनही बाहेर येता येतं. बहुतांश लोक हे करत असतात. कधी शारीरिक उत्सर्जन क्रियांप्रमाणे  भावनिक, वैचारिक उत्सर्जन नैसर्गिक असतं. कधी जाणीवपूर्वक विसर्जन करायचं असतं.  जशी उत्सर्जन ही निरोगी शरीराची प्राथमिक गरज आहे, तशी स्वस्थ मनाचीही ती आवश्यक प्रक्रिया आहे. ओघानं ती शरीरात जितकी सहज आणि नैसर्गिक आहे, तितकीच मनासाठीही. स्मरण आणि विस्मरण हातात हात घालून येतात. जसं  बारीकसारीक मुद्दे माणसाच्या विनासायास लक्षात राहू शकतात. तसंच काळाच्या ओघात अनावश्यक बारकावे माणूस आपोआप विसरूही शकतो. हे सतत चालू असतं. आपल्याला कित्येक वेळा आपण काय विसरलो हे लक्षातही येत नाही.  काही वेळेला मात्र काही बाबी ठरवून सोडून देणं, झालं-गेलं विसरून पुढे जाणं हे शिकावं लागतं. काही गोष्टींत आवश्यकतेपेक्षा जास्त काळ न रेंगाळणं, न अडकणं हेही जमावं लागतं. मुलाचं बोट धरावंही लागतं आणि सोडावंही लागतं.  कधी आपण सोडायच्या आधी मूल बोट सोडून धावायला लागतं. तेव्हा आजूबाजूला सगळं सुरक्षित आहे ना, हे पहावं लागतं. मूल धावतं तेव्हा लक्ष तर द्यायला हवंच, पण बोट आवळून चालत नाही. बोट सोडून धावणारं मूल वेगवेगळ्या  वयात वेगवेगळं समाधान देऊन जातं. बागेत दुडुदुडु सुटं पळायला लागणाऱ्या बाळाकडे आई-बाबा अचंब्यानं पाहत राहातात. सायकल चालवत आपली आपण फेरी मारून आलेल्या मुलीला आनंदानं टाळी देतात. पहिल्यांदाच शाळेच्या  लांबच्या सहलीला मुलाला पाठवताना त्याच्या मजेत मनापासून सहभागी होतात. मुलीच्या निवडीवर विश्वास ठेवत तिच्या पसंतीच्या जोडीदाराचं आपल्या कुटुंबात राजीखुशीनं स्वागत करतात. मुलांची काळजी असली, तरी भीती, धास्ती, अधिकारी नियंत्रण, अट्टहास हे विसर्जित होतं, असं वरच्या उदाहरणांवरून जाणवलं असेल. बोट जितकं अलगद आणि समंजसपणे सोडता येईल तितकं हे उत्सर्जन आपल्या जगण्यातलं अविभाज्य अंग बनून जाईल.

‘निरनिराळे सारे’ (२० जून) या लेखात उल्लेख झाल्याप्रमाणे टोकाच्या स्वभावांमुळे निर्माण झालेले, भिन्न प्रवृत्ती, सवयी यातून तयार झालेले आपापसातले ताण विसरून जुळवून घेता येतं. ताठा, दुराग्रह याला तिलांजली द्यायला ज्यांना जमतं  त्यांना स्वत:भोवतीची कुंपणं सैल सोडता येतात. शेजारपाजार वा कामाच्या वर्तुळात नातेसंबंधांतून उद्भवलेल्या किंवा अपरिचित परिस्थिती हाताळताना येणाऱ्या अडचणी सुकर कशा करायच्या याचा ‘स्वीकारशील विसर्जन’ हा जणू मंत्र बनून जातो.  विसर्जन म्हणजे नको तेव्हा नको ते कसंही टाकून देणं, असा अर्थ करून घेणं अपेक्षित नाही. आपल्याला नको ते कचऱ्यात टाकून कचरा घराबाहेर ठेवला की आपलं घर स्वच्छ, ही भूमिका जबाबदार विसर्जनात नाही. जबाबदार विसर्जन हे व्यक्ती आणि वातावरण यांच्या सामाईक हिताचा विचार करणारं असतं. बाजारात रास्त दरात पायपुसणं सहजी उपलब्ध असतानाही कवितानं जुन्या झालेल्या उशीच्या अभऱ्यांचं पायपुसणं बनवलं. वाचनाच्या आवडीमुळे जमलेली अनेक पुस्तकं वाचून झाल्यावर सरसकट रद्दीत देणं सुटसुटीत वाटतं खरं, मात्र सुरेशनं पुस्तकांच्या विषयांनुसार त्यांचं वर्गीकरण केलं आणि दोन-तीन वाचनालयांत तिथे नसलेली पुस्तकं पडताळून त्यानुसार आपली पुस्तकं भेट म्हणून पोहोचती केली. स्वकष्टानं बांधलेला आणि हौसेनं सजवलेला मोठा बंगला सोडून उतारवयात सांभाळायला झेपेल अशा नेटक्या लहान घरात राहायला अण्णा नि वहिनींनी पसंत केलं. विसर्जनातही जबाबदारीनं वागून समाधान मिळवणारी ही  रूपं अनेकांसाठी प्रेरक ठरू शकतात.

लहानपणी मुलं बहुतेकदा वर्तमानात जगू शकतात. त्यांना कोणाशी तरी झालेलं भांडण विसरता आलेलं असतं, भविष्याची चिंता करत बसायच्या विचारांनी अजून मनाला स्पर्श केलेला नसतो. विसर्जन आपोआप होतं अशी त्या वयातली मानसिक अवस्था असते. बालसुलभ सहजता वयाबरोबर टिकणार नसली तरी प्रौढ वयातही आसक्तीच्या आहारी आपण स्वत: न जाणं हे आवर्जून करता येईल. मुलांना त्यापासून लांब राहायला जमत असेल तर आपणच त्यांना त्यात ओढत  नाही ना हेही पहायला हवं. परिमला आठ वर्षांची असतानासुद्धा तिच्याकडे असलेल्या कपडय़ांबाबत खूश असायची. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम. ‘तुला नवीन कपडे आणायला जाऊ,’ असं तिची आई तिला नेहमी म्हणायची, पण परिमला  आईला पटवून द्यायची की माझ्याकडे खूप कपडे आहेत, मला नवीन काही नको. आई तिच्या प्रतिक्रियेवर थक्क व्हायची. हळूहळू परिमलाची आई स्वत:च्या खरेदीविषयी अधिक सजगतेनं विचार करायला लागली. तिच्याकडेही अनेक कपडे  असताना तिची खरेदी चालूच असायची. मुलीकडून शिकत आईपण ‘विनाकारण खरेदीचा सोस’ या सवयीचं विसर्जन करू शकली.  बऱ्याचदा मुळात नव्या गरजा आपणच निर्माण करत जातो. वाढता वाढता त्या वाढत जातात. आपण गुरफटत जातो. हे भूलभुलैयात शिरल्यासारखं होतं.

‘करोना’ आणि टाळेबंदीच्या निमित्तानं काही गरजा, सवयी विसर्जित करणं, जीवनशैली  बदलणं काही जणांनी गांभीर्यानं घेतलं आहे. तशी उदाहरणं तुमच्याही आजूबाजूला दिसू लागली असतीलच. कधी काही शिक्षकांना वाटत असतं, की तेच मुलांचं बेशिस्त वागणं सहन करतात. वेगवेगळ्या वयातल्या मुलांशी संवाद साधला तर समजतं, की मुलंसुद्धा मोठय़ांच्या अनेक बाबी स्वीकारत, काही सोडून देतात. कधी शिक्षकांच्या हातून चुकून  लेखनात एखादी चूक होते. मुलांनी ती ओळखलेली असते, पण ती गप्प राहतात. त्यांचा पूर्वानुभव त्यांना खुणावतो, की शिक्षक त्यांची चूक सहजी मान्य करतातच असं नाही. कधी शिक्षक वेगळ्या कारणानं चिडले आहेत हे मुलांना साफ  कळतं, तरी शिक्षकांचा ओरडा मुलं सहनशीलतेनं सोडून देतात. एकदा एका वर्गात मुलं दंगा करत असल्यानं शिक्षक वैतागले. ‘तुमच्यापैकी कुणीही पुढच्या तासाला हा पाठ शिकवा,’ असं त्यांनी जाहीर केलं. दोन विद्यार्थी पुढे झाले, त्यांनी  उत्तमरीत्या शिकवलं. हे पाहून शिक्षक चकित झाले. शिकवणं चालू असताना मुलांनी दंगा करणं उचित नाहीच, पण केवळ शिक्षक शिकवू शकतात या धारणेत आपण बांधलं जाणंही बरोबर नाही. त्या शिक्षकांना या अनुभवातून हे जाणवून  गेलं. आपल्या काही धारणा आणि पूर्वग्रहसुद्धा विसर्जित करता येतात.

‘न्यूरो प्लास्टिसिटी’ म्हणजे मानवाच्या मेंदूच्या लवचीकतेच्या ताकदीला पुरेपूर ओळखायला हवं. दोन गोष्टीतले आधी जोडलेले सहसंबंध विसरून पुन्हा नव्यानं शिकण्याची माणसाच्या मेंदूची क्षमता असते. याला ‘अनलर्निग’ असं संबोधलं जातं. अपरिचित भाषेचे नियम समजून घेताना काही प्रमाणात आणि काही वेळापुरती तरी डोक्यात पक्की बसलेली आपल्या भाषेतली वाक्यरचना बाजूला ठेवायला हळूहळू जमतं. भाषेतल्या गमतीजमती पण यात घडतात. हिंदी भाषेतला ‘शिक्षा’  आणि मराठी भाषेतला ‘शिक्षा’ हा शब्द एकच असला तरी अर्थ भिन्न आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेमुळे नवीन सहसंबंध जोडले जातात याची जाणीव होईल.  वैचारिक लवचीकता हा समूहगुणही असतो. गैर चालीरीती, अंधश्रद्धा विसर्जित करून विधायक मार्ग स्वीकारायची ताकद सामाजिक पातळीवरही असते. भारतात सती प्रथा थांबवणं, विधवा पुनर्विवाह रूढ करणं, अमेरिकेत स्त्रियांना निवडणुकीत मत देण्याचा अधिकार  नसताना तो मिळवणं.. जुन्या संकल्पना पुसून नव्यानं संकल्पना निर्माण करण्याची ही परिचित उदाहरणं आहेत.

गिरिजानं स्वत:शीच ठरवलं आहे,‘माझं साध्या गोष्टींत अतिचिकित्सा करत बसणं कसं कमी होईल त्यासाठी प्रयत्न करणार. घरातली जी किरकोळ वस्तू मी गेल्या वर्षभरात वापरली नाही त्या वस्तूचं मी नेमकं काय करू शकते ते रोज एका वस्तूच्या बाबतीत ठरवणार.’

उत्सर्जन नैसर्गिक आहे, ते तसंच टिकवूया. नित्यनेमे आवश्यक बाबींचं योग्य मार्गानं विसर्जन आवर्जून करूया. स्वच्छतेतून साकारणाऱ्या आपल्या घरटय़ाच्या सौंदर्याचा हा अनमोल पैलू अविरत पाडत राहूया. आदल्या दिवशी स्वत:नंच  काढलेली देखणी रांगोळी दुसऱ्या दिवशी आवरणं, जमीन सुबक सारवणं आणि परत नवी रेखीव रांगोळी रेखाटणं.. असंच तर आहे ‘नित्य नेमे विसर्जन’ आपल्याला नि साऱ्या घरटय़ाला ताजं, प्रसन्न ठेवणारं !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 12:48 am

Web Title: learn to leave things niramay gharta dd70
Next Stories
1 आक्रमकतेचा तळ शोधताना…
2 चित्रपुष्पांजली
3 गर्जा मराठीचा जयजयकार : इंग्रजी संभाषणाच्या अडचणीवर मात
Just Now!
X