विकासाचे आशावादी चित्र  

मार्चच्या पुरवणीतील ‘सुशिक्षित लोकप्रतिनिधी, सुशासित गाव’ या लेखातील गावाच्या विकासाचे चित्र अतिशय आशादायी आहे. ‘चतुरंग’मधील यापूर्वीच्या लेखांतून अशाच प्रकारे वेगवेगळ्या गावातील लोकप्रतिनिधी त्यांना मिळणाऱ्या अल्प निधीतून आपल्या गावाचा उत्तमरीत्या विकास करीत असल्याचे वाचनात आले. अशा वेळी मुंबईसारख्या मोठय़ा शहरातील लोकप्रतिनिधी त्यांना मिळणाऱ्या घसघशीत निधीतून शहराच्या विकासासाठी नेमके कोणते भरीव काम करतात? असा प्रश्न पडला.

शहरातील बहुतेक प्रभागात प्रामुख्याने अमुक इमारतीत लादीकरण /काँक्रीटीकरण, पाइपलाइन बदलणे, किरकोळ दुरुस्ती करणे अशाच भरीव (?) कामांचे फलक झळकत असतात. पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करणे, परिसरात स्वच्छता राखणे यासाठी स्वत: पुढाकार घेऊन त्यासाठी निधीचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. तरच ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’ हे चित्र प्रत्यक्षात येईल.

– अरुणा गोलटकर, मुंबई

विश्वमनाच्या आनंदाचा अनुभव

माधुरी ताम्हणे यांचा १६ मार्चच्या अंकातील लेख वाचला, खूप भावला. फिलीपाच्या तोंडून जे वैश्विक सत्य प्रकट झाले आहे तोच खरा ईश्वर आहे. या विश्वाचे एक विश्वमन असते, आपण जितके शुद्ध व विशाल  होत जाऊ  तितकेच या विश्वमनाशी जोडले जातो आणि या विश्वमनाच्या आनंदाचा अनुभव आपल्यालाही येऊ  लागतो. खरा ईश्वर म्हणजे निष्कपट प्रेम व  विशाल अंत:करण होय. पौर्वात्य व पाश्चिमात्य संतांनी व तत्त्वचिंतकांनीही  हेच सांगितले आहे. लेखातील एक वाक्य की ‘आपली प्रार्थना अहंकारातून येते म्हणूनच ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही,’ हे तर अगदीच पटले ; नव्हे तो स्वानुभव आहे. या लेखातून खूप काही शिकायला मिळाले. असेच उत्तमोत्तम लेख आम्हास वाचायला मिळत राहोत.

ईशा अविनाश अभ्यंकर, बोरिवली

पालकांच्या लैंगिक साक्षरतेची गरज

विषय खूपच ‘संवेदनशील’आहे, तरीही गरज आहेच पूर्वतयारीची! मुळात ‘लैंगिकता’ हा विषयच दुर्लक्षित झाल्याचे सर्वत्र दिसते. कारणे ही तशीच आहेत. पारंपरिक विचारांचे पगडे, ‘आम्हाला कुणी शिकवलं? समजलं ना आपोआपच, मग कशाला सविस्तर सांगायला हवंय?’, ‘वैद्यकीय शिक्षण घेतलंय मग पुन्हा काय शिकायचं?’ असे विविध कंगोरे आहेत या विषयाला.

मी गेली १५ वर्षे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या सर्च, शोधग्राम, गडचिरोलीला आदिवासी बांधवांचे शस्त्रक्रिया शिबिरात वर्षांतून दोन वेळा (मार्च व सप्टेंबर) जातोय. अम्मांनी (डॉ राणी बंग)‘तारुण्यभान’ शिबिराचा झपाटाच लावलाय. आत्तापर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘तारुण्यभान’ची शिबिरे पौगंडावस्थेतून तारुण्यात येणाऱ्या मुला-मुलींसाठी झाली आहेत, ती पुढेही सुरूच राहतील. खरं तर ‘लैगिकता’ हा विषय पाठय़पुस्तकात,अभ्यासक्रमात सक्तीचा यायला हवाय. तसा हा विषय संवेदनशील असल्याने तुम्हीच वाचा, समजेल तुम्हाला, असे न सांगता शिक्षकांनी देखील ‘समाजभान’ जाणून हा विषय शास्त्रीयदृष्टय़ा विद्यार्थ्यांना शिकवायला हवाय आणि ‘पालक सभा’ घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवायला हवाय. पुस्तकं आहेतच तरीही ‘लैगिकता’ हा संवेदनशील विषय पालकांना देखील समजून सांगण्यासाठी ‘चर्चा सत्रे’ वारंवार होणे गरजेचे आहे. ‘तारुण्यभान’ शिबिरे ऐकली की हे तीव्रतेने लक्षात येते, मुलं/मुली अगदी उत्सुकतेने सहभागी होतात आणि त्यांचे अनुभव देखील खुल्या मनाने सांगतात आणि अम्मांना लिहूनही देतात. ‘‘आम्ही आमच्या आई-बाबांकडे देखील एवढे मनमोकळेपणाने बोलत नाही कारण ते आमचे ऐकूनच घेत नाहीत,’’असं मुली आणि मुलं देखील स्पष्टपणे बोलतात.

पालकांनी पाल्यांना ही शास्त्रीय माहिती सांगायला हवीय, त्यांचं ही ऐकून घ्यायला हवंय. ‘सुसंवाद’ झाला की हे तणावाचे प्रसंग नक्की कमी करता येतील, असे नक्की वाटते.

– डॉ किरण भिंगार्डे, कोल्हापूर.

‘ शिवी’मधून समाजवास्तवाची मांडणी

‘सुत्तडगुत्तड’ या लेखमालेतील राजन गवस यांचा ‘शिवी’ हा लेख (१६ मार्च) वाचला. अतिशय सूक्ष्म निरीक्षणाने ‘शिवी’ या विषयावर त्यांनी या लेखात चर्चा घडवून आणली. आईला उद्देशून एकूण सहाशे शिव्यांचा संग्रह प्रकाशात आणला आहे. स्त्रियांवरील अत्याचार, अवहेलना, छळ, हिंसाचार या बाबतीमध्ये या शिव्या भर घालतात. तसेच दलित, शोषित समाजाच्या जगण्याबाबतही शिव्या आहेत. मराठी भाषिक, सुशिक्षित मराठी समाजामध्ये शिव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आमचे वडील आम्हाला नेहमी शिव्या द्यायचे पण आम्ही कधीच शिवी उच्चारली नाही. कधी कधी ती ‘शिवी’ न राहता तो बोलण्याचा भागच बनतो. काही प्रमुख जिल्ह्य़ांमध्ये आपल्याला असे आढळून येईल. राजन गवस यांनी अतिशय वेगळा विषय यानिमित्ताने वाचकांसमोर आणलेला आहे. ठरावीक सणांना समाजामध्ये शिवी दिली जाते हे मात्र गवस यांच्या या लेखामध्ये आढळून आले नाही. तसेच शिवी ही भाषिक अभिव्यक्ती आहे. ती जर कुत्सित भावनेने वापरली नाही तर! ‘शिवी’ या अनोख्या विषयामुळे लेख वाचनीय व नावीन्यपूर्ण वाटला.

– विठ्ठल जाधव, शिरूरकासार (बीड)