राजन गवस

झाड वजा केलं तर जगण्यात उरतं तरी काय? झाड जोजवतं आयुष्य. झाड वाढवतं आयुष्य. झाडच जगण्याचा उत्सव. झाडाला मिठी मारून जगत आले सारे. झाडाशी बोलावं, झाडाशी खेळावं. पानांना तळहातांवर सांभाळत आयुष्य जपावं. जोजवावं. झाड आहे तर जगणं आहे. पण आता खूप आधुनिक झालो आपण. मलोन्मल झाडच दिसू नये हे नवं प्राक्तन. याला कुणी म्हणतात विकास पण जगणंच होत चाललं आहे भकास! झाडच आयुष्यातून हद्दपार व्हायला लागलंय हे किती भयंकर!

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

झाड माझ्यातून उगवतं. माझ्या आत माझ्या बाहेर पसरतं, मला वेढून टाकतं झाड. माझ्या आत उगवलेली अनेक झाडं जोजवत आलो आहे इथवर. झाडांना मी विसरूच शकत नाही कधी. कारण झाडांनीच बांधले आहे माझं आयुष्य. झाडांनीच समृद्ध केलं आहे माझं जगणं.

झाडं माझ्याभोवती पिंगा घालतात, झाडं बोलतात, झाडं माझा श्वास होतात. आमच्या ओढय़ाच्या काठाला कधीकाळी बच्याची चिक्कार झाडं होती. एकदम सुळकं वाटणारं झाड. त्याला आडव्या तिडव्या सुटलेल्या फांद्या. छोटी म्हणता येणार नाहीत पण मध्यम आकाराची पानं. सतत हिरवीगार. एखाद्या फांदीला सहज हाबका मारला तर फांदी तुटून खाली यायची. इतकं ठिसूळ. त्याच्या बुंध्याला खवल्याखवल्यांची साल. एका रांगेत वाढलेली असायची ही झाडं. हे झाड खारुताईचं आवडतं. एका झाडावर तीन-चार खारुटय़ा असायच्याच. शेंडय़ापासून खोडापर्यंत सारख्या करायच्या वरखाली. मध्येच शेपटीचा गोंडा उंचावून इवले इवले डोळे किलकिले करून बघायच्या सभोवार. पुन्हा त्यांचा एकमेकींचा पाठशिवणीचा चालायचा खेळ. मध्येच त्यांची चिरचिर! या सगळ्या खारुताईंना या झाडाशिवाय चनच पडायची नाही. बच्याचं झाड बाकी कुणालाच उपयोगी पडायचं नाही फारसं. पण हक्काचं अंगण असायचं खारुताईचं! गुरं ओढय़ाच्या काठाला सोडली की, खारुताईचा बच्याच्या झाडावरचा खेळ बघत बघत कुठल्या कुठं निघून जायचा वेळ. चानीमारे उन्हाळ्यात घिरटय़ा घालायचे ओढय़ाच्या काठानं. आणि खारुटय़ा व्हायच्या एकदम न्हाईनपत! एखादी दिसलीच तर तिला अलगद टिपायचे. कधी फास लावायचे तर कधी चपळाईने पकडून घालायचे खिशात. भयंकर राग यायचा त्यांचा. ते गेले की खारुटय़ा पुन्हा बच्याच्या झाडावर. कसं कळायचं त्यांना कुणास ठाऊक? पण वैऱ्यांचा वास यायचा त्यांना. अजबच असतात त्यांची घ्राणेंद्रियं. कदाचित बच्याच्या पानांनी शिकवलं असेल त्यांना हे जन्मजात!

काय झालं कोणास ठाऊक? पण आमच्या ओढय़ाकाठची बच्याची झाडं अचानकच झाली गायब. आज औषधालाही नाही सापडत बच्याचं झाड. आमच्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकाला या झाडांविषयी सांगितलं, तर तो पुस्तकी नाव विचारायला लागला. आम्हाला कुठलं ठाऊक?  म्हटलं, आम्ही त्याला बच्याचं झाड म्हणतो. त्याचं दुसरं नाव आमच्या कोणाला माहीत नाही. नंतर त्या प्राध्यापकालाच आणला आमच्या ओढय़ाकाठी. डोहाजवळ एकमेव उरलेलं बारीक झाड दाखवलं त्याला. तो एकदम चिंताक्रांत. त्याने काढले फोटो. पण त्यालाही नाही सांगता आलं बच्याचं पुस्तकी नाव. नंतर सांगतो म्हणाला. पण आजतागायत त्यानं नाही सांगितलं काही. फक्त म्हणाला, ‘‘हे झाड खूपच छोटय़ा मुळांचं आहे. त्यामुळे जसजशी पाण्याची पातळी खाली जाईल तसतसे हे झाड संपत जाणार. इथली पाणीपातळी खोल गेलीय म्हणून संपलीत ही इथली झाडं.’’ त्यानं सहज सांगून टाकलं. माझ्या काळजात धस्स झालं. म्हणजे इथलं एकेक झाड पाणी पातळी खाली गेल्यावर संपत जाणार? त्यानं निर्वकिार होकार भरला. अशी कित्येक झाडं माझ्या अवतीभवती जगत होती, जगत आहेत ज्यांची नावं वनस्पतीशास्त्राच्या कोशात नोंद नाहीत. स्वत:ची नोंद न ठेवता काही गायब झाली पृथ्वीवरून त्यांचं दु:ख कोणाला?

आमच्या घराभोवती किर्र जंगल होतं. हिंमतबहादूर सतत यायचे शिकारीला. आमच्या या डागाडात. भयप्रद जंगल होतं डागाडात. इथल्या शिकारकथा ऐकता ऐकताच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्या या भोवतालच्या किर्र जंगलात फक्त करवंदीच्या जाळ्या, रानबोरीची खुरटी झाडं आणि काटेफडय़ाची झुडपं उरली. ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत बालपण गेलं ती झाडं दिकोपाल झाली. बिचाऱ्या झाडांना कसे फुटले पाय? आणि कुठे झाली परागंदा? त्यातलीच चार-दोन आता शिल्लक उरली. चंदनाची चोरांनी पळवली. बाभळीची वसब नको म्हणून तोडून टाकली. गावठी आंब्याची, शिसमाची झाडं घरं बांधता बांधता संपून गेली. एकदुसरी चिंच आणि कुठंतरी आंबा बाकी सगळा शेवगाच शेवगा! झाडच आयुष्यातून हद्दपार व्हायला लागलंय हे किती भयंकर! आतून बाहेरून सगळंच व्यापलं होतं झाडांनी. चिंचेला बांधलेला पाळणा बारमाही असायचा झुलत. उंबराच्या ढोलीत लपवून ठेवले होते आयुष्याचे मौलिक दस्तऐवज. जिवंत वेळूला चीर पाडून साठवत गेलो होतो सापडलेली प-प. धावडय़ाच्या बेचक्यात लटकवून ठेवलं होतं दप्तर आणि तिथंच टांगला होता मेंदू. रानात सापडलेलं मोरपिस द्यायचं कुणालातरी म्हणून अलगद ठेवलं होतं बाभळीच्या खोबणीत. पेरूच्या झाडावर पसरवून ठेवली होती आयुष्याची स्वप्नं. गुंजेच्या पाल्यात उधार ठेवली होती जीभ. कुंबळाच्या काटय़ाला आणि जोंधळ्याच्या सडीला, हयातभर जपून ठेवलंय पायांच्या खुरटात. झाडंच होती आमच्या आठवणींचे खंदक आणि श्वासाची भुयारं.

आमचं जगणंच व्यापलेलं होतं झाडांनी. आई बाळंत झाली तेव्हा पहिल्यांदा सोबतीला आला कडुलिंब. दारातल्या पाण्याच्या लोटक्यात. नंतर बाजल्याखालच्या धुनीच्या बुट्टीत. बारशाला पाळण्याच्या दोरीला फुटल्या फुलांच्या माळा, आंब्याच्या डहाळ्या आणि अंगाखाली अलगद पळसाचं पान. त्यावर ठेवलेल्या घुगऱ्या. रांगताना पाहिली अंगणातली तुळस. परसातले मोगऱ्याचे ताटवे आणि जास्वंदीच्या हिरव्यागार पानात फुललेले लालभडक फुलांचे गेंद. शेवग्यावर चढलेला जगदाळ्याचा वेल आणि बोकडलेल्या घेवडय़ाचा स्वैर संभार! हळूहळू एक एक वेल, एक एक झाड बोट धरून आयुष्याला घेऊन गेलं घनदाट जंगलात!

नंतर आयुष्यच झालं झाड. आमच्या वर्षांची सुरुवात गुढीचा पाडवा. चला उठा. सकाळी सकाळी कडुलिंबाची झाडं शोधा. आठ-दहा डहाळ्या आणा. जिथं असेल आंबा त्याच्या पाच-सहा डहाळ्या. चाफ्याची, मोगरीची फुलं. माळा करा. आंबे लागले असतील तर कैऱ्या आणाच. कैऱ्या-कडुलिंब, गूळ- खोबरं, भिजलेली डाळ आणि आमचे उन्हात वाळत घातलेले आयुष्य. गुढीचा नवेद्य घरातल्या प्रत्येकानं खाल्लाच पाहिजे. उन्हाळा सोसायचा असेल तर. गुढीला शेलकी काठी. तीही उंच. संध्याकाळी गुढी उतरली की काठी सगळ्या कामाला उपयुक्त. कुकुडकोंबा दिसला तर शुभशकुन. पाडवा सरतो ना सरतो तोवर येते अक्षय्यतृतीया. आळी टोकणा. मांडव घाला. खास आंबरसाचा सण. ‘पाडव्याला पाड, आखितीला राड’ आमच्या खेडय़ातली खास म्हण. अक्षय्यतृतीयेचा खास मुहूर्त. पाडव्याला कुदळ मारा. अक्षय्यतृतीयेला रान तयार. सर्जनोत्सुक माती. यात एकदा वळीव जातोच पडून. वाट बघायची असतेही आणि नसतेही पावसाची. करायची धुळओप. टोकणायची बीबियाणं. रोहिणी निघाली की धाकधूक. मग मृग. झाडं एकदम हिरवा शालू पांघरुन. हिरवेपण वाटत जातात आभाळभर!  मृग निघायच्या दिवशी शोधायचा शेवगा. त्याच्या कोवळ्या पानांची भाजी. ही भाजी खाल्ली एकदा की, पावसाळा बिनघोर. संपन्न आरोग्य! शेवगा पसरत जातो शरीरात ऊर्जेचे स्रोत. सगळी शेतातल्या कामांची धांदल. रान वेचा, तरवा टाका, मेसकाठी तोडा, तिकाटणं  शोधा, कुरीला दांडकी घाला. झाडाला विनवणी. सावलीला सांभाळणी. आला पाऊस, रान अंकुरते बेभान! पेरणी झाली की, बेंदराची प्रतीक्षा. शोधा पिंपळ. मोळ्याच्या वळा दोऱ्या. पिंपळाच्या पानाचं तोरण बेंदराला. कुंबळाच्या शिऱ्याचा खच करीला. कर तुटली. कुंबळाचं सापडेल ते काटूक घेऊन चला घराकडं. दारात ओवाळणी. ‘इडापीडा टळू दे’. नागपंचमी येते तोऱ्यात. दारातल्या झाडाला बांधा पाळणा. स्वत:ला जोजवत बघायचे आभाळ. आणि पसरायचे स्वत:ला आभाळात. एकमेव असायची संधी. आला गणुबा. शोधा हरेती. आणा काकडी. सापडतोच पेरू. भाताचे लोंब. गणपतीचे तोरण. म्हणा आरती. फूल फुलायला लागलेल्या गौराई शोधा. विहिरीवर, ओढय़ावर तांबे घासून भरली गौराई. वाजत येते दारात. ‘आली गौराई अंगणी, तिचे लिंबलोण काढा.’ यातच शेतीची कामं. पिकाचं तरारणं. हवं-नको बघा. बहरून आलेलं रान आणि ठेंगणं झालेलं आभाळ. अशातच आलेला दसरा. आपटय़ाचं झाड शोधा. फांद्या तोडून उभ्या पिकात लपवून ठेवा. शिलंगण आलं की, सोनं लुटा. दिवाळी समोरच. मुसळ शोधा. पनाचा साळोता, गवळणींचा वाडा, गायीचे पाय घरभर. वाडा जातो उतू. सुरू होते सुगी. जोंधळ्याच्या पानावर अवतरते भुईंब. जमिनीची पूजा झाडांच्या सोबत. येतो शिमगा रानातलं, मनातलं सगळं जातं पेटत. कुठेतरी पडतो एरंड भविष्याच्या दिशा दाखवत.

जगण्यात झाडाला सोबत घेऊन मांडलेला हा नैसर्गिक खेळ. झाडच वजा केलं तर जगण्यात उरतं तरी काय? झाड हेच जगणं. झाडासोबतच आयुष्य. झाड जोजवतं आयुष्य. झाड वाढवतं आयुष्य. झाडच जगण्याचा उत्सव. झाडाला मिठी मारून जगत आले सारे. झाडाशी बोलावं, झाडाशी खेळावं. पानांना तळहातांवर सांभाळत आयुष्य जपावं. जोजवावं. झाड आहे तर जगणं आहे. वड-पिंपळ आयुष्याचे साथीदार. त्यांनी किती पाहिले असतात उन्हाळे-पावसाळे. माणसं असतात मर्त्य. पिंपळ, वड कैक पिढय़ांचे साथीदार. जगण्याला सजवतात झाडं. जगण्याचंच आरास मांडून गीत गातात झाडं. आता खूप आधुनिक झालो आपण. चौपदरी सहापदरी रस्ते आलेत. डोंगरच्या डोंगर पोखरून उंदीर काढणं सुरू झालं आहे. उंदराच्याच अवलादीनी खाऊन टाकली करोडो झाडे. उंदीरच सांगायला लागले, आधुनिकतेचे तत्त्वज्ञान. मलोनमल झाडच दिसू नये हे नवं प्राक्तन. याला कुणी म्हणतात विकास पण जगणंच होत चाललं आहे भकास. झाड हद्दपार झालं आयुष्यातून. चकाचक मेट्रोच्या विळख्यात, सिमेंटच्या कोरडय़ा जंगलात झाडांना जागाच नाही जगायला. झाडांची कत्तल करणाऱ्यांची आततायी दुनिया. श्वास हवा आहे कोणाला? अलीकडे  झाडांचा नष्टावा करणारेच हे सांगायला लागले की ‘झाडे लावा झाडे जगवा.’ याला काय म्हणाल? आता कोणत्या कोणत्याच सण-समारंभाला लागत नाही झाड. सगळी कृत्रिम झाडांची पदास. कुठे कुठे गच्चीत तरारते बोनसाय झाडांची पदास! पण बोनसाय झाडांचं होऊच शकत नाही जंगल. झाडांना वगळून जगता येईल आपल्याला? कधीतरी, कुणीतरी स्वत:लाच विचारावा प्रश्न. झाडांना पडतच नसतात प्रश्न. नुसती पानगळ. म्हणूही शकतं कुणी झाडांची गरजच नाही पृथ्वीवर. आपण आहोत हे खूप झालं. अशा जमान्यात कोणीतरी शोधत असतो झाडांना, त्यांच्या निर्दयी कत्तलखोरांना. अमानुष झालेल्या हिंस्र श्वापदांना. झाडांनाच द्यायची असते मूठमाती. पण झाड वजा करून पृथ्वीवर उरेल का माती?

काहीजण म्हणतात कृत्रिम प्राणवायू, कृत्रिम अन्नधान्य शोधणारच आहे माणूस पण त्यांना झाड शोधता येईल? माणसाला झाड होण्याच्या अवकाशाला येईल का शोधता? कधी कधी झाड झपाटायचं, झाडाला लागीर व्हायचं, झाड धरलं असंही आपण म्हणायचो. पण आता कृत्रिम झाड धरणार कसं, झपाटणार कसं? आपल्याला झाड होताच येणार नाही. आपण सारे वाळवंटाच्या शोधात निघालो आहोत. हे सत्य कोणी कोणाला सांगायचं!

chaturang@expressindia.com