उमा बापट – umaajitbapat@gmail.com

रोजच्या दिनक्रमातल्या साध्या गोष्टींपासून जीवनातल्या महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्यावर निवड करण्याची वेळ येते.  ती करताना बाकीचे जरी एखादा विशिष्ट मार्ग निवडत असतील तरी तो योग्य पर्याय आहे का, हे पारख करून ठरवावं लागतं. लहान मुलांना या गोष्टीची ओळख करून देणं ही एक कसोटी असते. मुलांसाठीचे अनेक निर्णय घरातले दुसरेच कुणीतरी घेत असतात. अशा परिस्थितीत नेमकी निवड करणं मुलांना शिकू देण्यात पालकत्वाचा कस लागतो.

सोनाराला पारख असते सोन्याची, शेतकऱ्याला जाण असते नेमक्या जातीच्या बी-बियाणाची.  शितावरून भाताची परीक्षा असते. कोणत्याही गोष्टीतला गाभा कळायला त्या विषयातल्या माहितीच्या सखोल अभ्यासाबरोबर प्रत्यक्ष अनुभव असेल तर जाण येत जाते. इंग्रजीत ‘साइट’ आणि ‘इनसाइट’ असे दोन वेगळे शब्द व त्याचे भिन्न अर्थ आहेत. डोळ्याला दिसणं आणि जाणणं यात फरक असतो. तसंच मराठी भाषेत देखील नजरेस पडणं, डोळयांनी पाहणं आणि निरीक्षण- निरखून लक्ष देऊन पाहणं, परीक्षण- पारखून घेणं, हे शब्द भाषेच्या समृद्धीच्या पलीकडे जाऊन संकल्पनेतल्या बारकाव्यांच्या छटा म्हणून प्रत्यक्षात वापरता येऊ शकतात.

तान्हेपणी जी वस्तू समोर दिसेल ती तोंडात घालून बघायची, ही जवळ जवळ प्रतिक्षिप्त क्रिया असते. आजूबाजूच्या परिस्थितीला जाणून घेण्याची  सुरुवात  झालेली असते. खाण्याजोगं काय असतं, काय खायचं नाही, काय तोंडात घालायचं नाही, हे बाळ हळूहळू शिकत जातं. डोळयाला दिसणं, ते काय आहे हे ओळखणं, निरीक्षण करणं, या समजून घेण्यातल्या पायऱ्या असतात. त्यानंतरचा टप्पा म्हणजे समजून घेतलेल्या माहितीचं परीक्षण करून त्याच्या आधारे निर्णयापर्यंत जाता येणं. हे फक्त तान्हेपणापुरतं मर्यादित आहे, असं वाटायचं कारण नाही.  किंबहुना कोणत्याही वयात एखादी निवड करताना त्या पायऱ्यांमधून जाणं गरजेचं आहे. बाळाला कोणती खाण्याजोगी वस्तू आहे आणि कोणती नाही ही मूलभूत गोष्ट शिकायची असते. तर शाळकरी मुलाला इतर मुलं गंमत म्हणून मधली सुट्टी सोडून वर्ग सुरू असताना वर्गात खाऊ खात असतील, तरी मी तसं

करणार नाही, हे शिकावं लागतं. पालक झाल्यावर ज्या बागांमध्ये हिरवळीवर खायचं नाही, असा नियम असेल तिथं आपल्या मुलांना खाऊ देता येणार नाही हे उमजावं लागतं. प्रौढांना चित्रपट किंवा नाटय़गृहामध्ये खाद्यपदार्थ चालणार नाहीत, असं लिहिलेलं असेल तर तो नियम पाळण्यासाठी आहे हे कृतीतून कळावं लागतं. काय आणि कुठे खायचं याची निवड आबालवृद्धांना करायची असते. नुसतं डोळ्याला दिसलं म्हणून ती निवड करता येत नाही. कुणीतरी चित्रपटगृहात खात असेल तर आम्हीसुद्धा खाल्ल्यानं काय बिघडणार आहे, हा निवडीचा निकष असू शकत नाही.

कशाचा संयम बाळगावा, कशासाठी निंदा ऐकायची तयारी असावी, यावर गेल्या लेखांमध्ये आपण विचार केला आहे. ‘निर्मोही संयम’

(२५ एप्रिल) या लेखात आपण एक मैत्रीण पाहिली होती. स्वत:च्या हौसेसाठी पाककृती करणारी. पण किचकट पदार्थ करताना आपला लहान मुलगा काय करतो आहे याची पुरेशी माहिती असायची गरज तिला वाटली नव्हती. आपली हौस पूर्ण करताना आपल्या इतर भूमिकांच्या कर्तव्याचं भान हवं. यासाठी योग्य निवड करण्याची कुवत सोबतीला हवी. प्राधान्य ठरवता येणं हा त्यातला कळीचा मुद्दा असतो. बाबा झाल्यावर मित्रांसाठी किंवा सामाजिक कामासाठी किती आणि कसा वेळ द्यायचा आणि मुलांना वेळ देण्यासाठी काय आवरतं घ्यायचं या निवडीत सारासार विवेक येतो. इथे स्वत:च्या मोहाला मुरड घालणं, कधी आपली चूक नसतानाही मित्रांची बोलणी खाणं, म्हणजे गेल्या लेखात आपण पाहिलेलं ‘निंदा निभावणं’

( ९ मे) असतं. त्यासोबत योग्य-अयोग्यातली निवड करता येणं हे पण महत्त्वाचं आहे. असं न कंटाळता, सातत्यानं आवश्यक तो संयम ठेवणं, वेळप्रसंगी निंदा निभावणं आणि योग्य ती निवड करणं, यासाठी कधी वैचारिक, मानसिक, भावनिक, शारीरिक कष्ट घेणं म्हणजे एक प्रकारे ‘निरलस श्रमणं’ असतं. या सगळ्याची जोडणी आपल्या रोजच्या व्यवहारात होते तेव्हा आपण समग्र जगण्याकडे प्रवास करतो.  दुसऱ्यांच्या दबावानं आपलं वागणं ठरवण्याचा ताण येत नाही. निवड कशाची करायची ते दडपणामुळे ठरत नाही.

लहानपणापासून मूल्यांवर आधारित निवड करायची, अशा गोष्टी आपण ऐकत आलेलो असतो. पुढच्या पिढीला सांगतही राहतो. जशी प्रामाणिक लाकूडतोडय़ाची गोष्ट.  ही गोष्ट काही फक्त लहान मुलांना सांगण्यासाठी आहे का? लाकूडतोडय़ा प्रौढ असताना आणि त्याच्या कामात वापरल्या जाणाऱ्या वस्तूबाबत प्रामाणिक होता, असा उल्लेख असलेली ती गोष्ट आहे. मग अनेकांना वाहतुकीचे नियम प्रामाणिकपणे पाळण्याची अडचण का होत असावी?  हिरवा दिवा सुरू झाल्यावर गाडी सुरू करण्याची नेमकी निवड होते का?  की लाल दिवा चालू असतानाच वाहन सुरू करून पुढे जाणं ही राजरोस निवड ठरून जाते? जर आपण योग्य निवड करू शकत असू तर ते मुलांपर्यंत आपल्या कृतीतून पोहोचतं. वैद्यकीय क्षेत्रात काही ठिकाणी बाजारीकरण आपल्यावर येऊन आदळत असताना जे डॉक्टर रुग्णसेवा जबाबदारीनं, आपल्या भूमिकेचं भान ठेवून काम करत राहतात, त्यांच्या मुलांना आपण प्रलोभनांना बळी पडायचं नसतं, आपल्या नेमक्या निवडीबाबत डगमगायचं नाही, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकतं. जे शिक्षक स्वत:ची टिपणं काढून शिकवतात, वर्गाच्या नाटकासाठी स्वत: काही लेखन करतात, तेव्हा आयत्या उपलब्ध असलेल्या सरधोपट पर्यायांशिवाय स्व-प्रयत्नांतून नवनिर्मितीचा मार्ग निवडता येऊ शकतो, याची दारंच ते विद्यार्थ्यांंसमोर खुली करत असतात. अशा अनुभवाबरोबरच मुलांना स्वत:लाही त्यांच्या आयुष्यात छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांत निवड करायची संधी देणं गरजेचं असतं.

काही वेळेला मुलांसाठी निर्णय दुसरेच कुणीतरी घेत असतात. दोन गोष्टी समोर असताना काय निवडायचं हे ठरवता येणं, हा नेमकी निवड करणं शिकण्याचा भाग आहे.  कनिष्कचा अभ्यास राहिला आहे आणि मित्र खेळायला बोलावत आहेत, तर त्याची आजी परस्पर सांगते, की तो आत्ता अभ्यास करतो आहे, त्याला हाका मारू नका. सोनालीनं नाचात भाग घ्यायचा, की कार्यक्रमाचं निवेदन करायचं, हे शाळेत बाईंनी आधीच ठरवलेलं असतं. इशितानं मैत्रिणींबरोबर चित्रपटाला  जावं, की न जावं, यात तिनं काही विचार केला आहे का हे न विचारताच बाबानं जाहीर केलेलं असतं, की तिला जाता येणार नाही.  हे निर्णय पालक म्हणून बरोबर असतील. पण त्याचबरोबर कोणत्या निकषांच्या आधारे आपण हे ठरवायचं असतं, योग्य काय, अयोग्य काय, निवडीपर्यंत जाणं सोपं नसलं तर काय प्रकियेतून जायचं, हे उलगडून दाखवता येण्यात पालकत्वाचा कस लागतो. अशा कसदार संस्कारांतून योग्य निवड करायची, जे निवडू त्याची जबाबदारी घ्यायची आणि स्वकष्टानं ती पेलायची, असं करत मुलं मोठी होतात. वेगळ्या वाटा निवडू शकतात. पण मार्ग योग्य असेल हा धागा सोडत नाहीत. अशी पालकांना खात्री वाटणं हे पण त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेल्या परस्पर विश्वासाच्या नात्याचं देणं असतं.

‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा.. काय भुललासी वरलीया रंगा..’ संत चोखामेळा त्यांच्या अभंगात वरवर वेडय़ावाकडय़ा दिसणाऱ्या उसामध्ये आत मात्र गोड रस असतो, केवळ वरच्या रंगरूपावर गेलो तर आतला गोडवा कळणार नाही, हे सोप्या उदाहरणावरून सांगतात. याउलट सध्याच्या काळात वरून झगमगाट असणाऱ्या अनेक गोष्टी थोपवता येणार नाहीत. तेव्हा निवड करताना नीरक्षीरविवेक जागा ठेवून निवड कशी करायची ही कसोटी पदोपदी द्यावी लागणार आहे. बालवाडीपासून उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी उपलब्ध असलेल्या शिकवणी वर्गापर्यंत निवडीबाबत गोंधळून जावं अशीच परिस्थिती आहे.  इतके हरतऱ्हेचे, भिन्न दर्जाचे आणि भरमसाठ पर्याय असताना नेमकी निवड ही तारेवरची कसरत वाटायला लागली आहे. अशा अनेक प्रकारच्या नव्या आव्हानांमध्ये नीरक्षीरविवेकाची गाढी बैठक लागेल. चौफेर विचारांची कायमची सवय असेल तर ते जमेल. दूध आणि पाणी वेगळं करणं हंसाला जमतं, अशा अर्थाचं  संस्कृत सुभाषित सर्वपरिचित आहे. ही विचारसरणी अंगीकारूया. योग्य निवड करण्याची क्षमता जोपासूया. आजच्या समाजाची तशी धाटणी घडवूया. सारासार विचारसरणीला कुटुंबातल्या आणि आजूबाजूच्या वातावरणाची सकस जोड मिळवून देऊया. निरामय घरटय़ांसाठी अनेकानेक जणांनी समग्र जीवनशैलीची नेमकी निवड करण्याकडे वाटचाल करूया.