07 December 2019

News Flash

तांबडं फुटतंय..

कडकलक्ष्मी जमातीचे लोक आधीपासूनच भटक्या प्रवृत्तीचे असल्यामुळे सध्या बेघर व भूमिहीन आहेत. निरक्षरता व अज्ञानाचा पगडा घट्ट आहे.

| August 15, 2015 01:03 am

कडकलक्ष्मी जमातीचे लोक आधीपासूनच भटक्या प्रवृत्तीचे असल्यामुळे सध्या बेघर व भूमिहीन आहेत. निरक्षरता व अज्ञानाचा पगडा घट्ट आहे. तरीही काही युवक-युवतींकडे पाहिलं की मात्र जमातीत तांबडं फुटतंय असं म्हणावंसं वाटतं. या जमातीतील रावसाहेब चव्हाण पहिले पदवीधर ठरले आहेत. तर पदवीधर अंकुश चव्हाण, संपतराव निंबाळकर हे खुल्या वर्गातून पोलीसमध्ये भरती झाले आहेत. या जमातीविषयी..

‘‘का य सांगू ताय्यो तुला? एकदा खाली बसलं की लगेच उठायला होत नाही बघ. डोस्क्यावर आठ-धा किलोचं देवीचं देऊळ, गळ्यात ढोलकी, काखत लेकरू अन् खांद्याला झोळी..सारं घेऊन सकाळी एकदा भाईर पडलं की, दिसभराचं फिरणं होऊन जागेवर परतायला आठ-दहा कोसाचं (साधारणपणे १५ ते २० कि.मी.) चालणं होतंय. तेबी सरळ चालणं न्हाई तर ठिकठिकाणी खेळ करीत, लोक देतील ते अन्नधान्य झोळीत घेत चालणं जेरीस आणतंय बघ. मान, पाठ, कंबर आखडून जाते. अन् बाप्याचंबी तसंच हाय. पायात घुंगरू, स्त्रीवेश धारण करण्यासाठी कमरला ‘कासेबट्टल’ (रंगीबेरंगी फडकी) बांधलेली, वरचं अंग उघडं, कपाळाला हळद-कुंकू, दंडाला हळदीचे पट्टे, हातात मोठा ‘इरगाळ’ (चाबूक) अशा वेशात ढोलकीच्या गुबुगुबु आवाजाच्या तालावर नाचत, उघडय़ा अंगावर चाबकाचे फटके मारून घेत दिसभर लोकात फिरायचं आणि फटके लागलेल्या दंडावर, पाठीवर देवीची हळद लावून रात्री कन्हत झोपायचं. दुसऱ्या दिवशी त्याच कामाला नव्या दमानं पुन्हा तयार व्हायचं. हाच आमचा रोजचा शिरस्ता हाय बघ,’’ हे सांगत होत्या, मुंबईत माहीम-धारावीच्या पुलाखाली उघडय़ावर तात्पुरता मुक्काम ठोकलेल्या कडकलक्ष्मी जमातीच्या महिला, गंगव्वा मारुती देवकर. थकले-भागलेले तिचे पती मारुती यांनी काहीच न अंथरता शेजारीच जमिनीला पाठ टेकली होती.
गंगव्वा व मारुतीसारखी कडकलक्ष्मी जमातीची अनेक जोडपी राज्यात तथा देशात आपण पाहतो. प्राचीन काळापासून जपलेल्या अंधश्रद्धा, रूढी-परंपरांशी यांची उपजीविका जोडलेली आहे. पूर्वी दुष्काळ, अतिवृष्टी, साथीचे रोग आदी संकटे म्हणजे कोपिष्ट देवतांची अवकृपा समजली जायची. पटकी (कॉलरा) किंवा प्लेगसारख्या रोगांची साथ आली की मरीआईचा कोप झाला किंवा ‘गावावरून मरीआईचा गाडा फिरला’ असं म्हटलं जायचं. कोपलेल्या देवतांना शांत केल्याशिवाय आपली हानी थांबणार नाही, अशी लोकांची मनोधारणा होती. काही प्रमाणात आजही आहे. देवतांना शांत करायचं म्हणजे त्यांना हवा तो नैवेद्य देऊन त्यांची प्रार्थना करायची. कडकलक्ष्मी जमातीचे लोक नेमकं हेच करतात. गावाच्या-लोकांच्या चुकांसाठी स्वत: मरीआईची माफी मागतात, देवीपुढे स्वत:स चाबकाने फोडून घेऊन लोकांसाठी वेदना सहन करतात. दंडात सुया टोचून घेऊन निघालेल्या रक्ताचा नैवेद्य देवीला देतात व लोकांना सुखी ठेवण्यासाठी लोकांच्या साक्षीने देवीची प्रार्थना व पूजा करतात. त्या मोबदल्यात लोक आपल्या मर्जीने देतील ते दान किंवा दक्षिणा घेऊन हे पुढील गावी जातात. धान्य व पैशाच्या रूपात दक्षिणा देण्याची प्रथा होती. वयोवृद्ध लोक सांगतात की एवढं धान्य जमा व्हायचं की ते वाहून आणण्यासाठी घोडा, गाढव किंवा बैलगाडीची गरज भासत असे. काळ बदलला. सुपाने वाढण्याऐवजी मुठीने वाढणं सुरू झालं. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व नवनवीन कायदे यामुळे आजकाल तेही बंद झाले. मर्जीने दिलं जात नाही म्हणून हात पसरून मागणं सुरू झालं आणि ही जमात भिक्षेकरी झाली. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार रस्त्यावर खेळ, कला प्रदर्शित करून भिक्षा मागणं गुन्हा ठरवण्यात आलं आहे.
मुळातला हा समाज आंध्र-तेलंगणातला. तेलगू भाषेचा प्रभाव असलेली यांची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. शेकडो र्वष आधीपासून हा समाज भारतभर विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पिढय़ांपासून तो महाराष्ट्राचाही रहिवासी आहे. स्थानिक मराठी भाषा बोलण्यात ते पुरेपूर सरावलेले आहेत. महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, औरंगाबाद येथे त्यांच्या वस्त्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात मंद्रूप, सांगोला, अकलूज, महुद, कडलज, मंगळवेढा, मरवडे, खूपसंगे, पेन्नूर, वांगी आदी ठिकाणी त्यांच्या वस्त्या आहेत. मात्र हा सारा समाज असाच वर्षांतून आठ-नऊ महिने गावोगाव फिरतो आणि पावसाळ्याचे तीन-चार महिने सोलापूर जिल्हय़ात सांगोला, मंद्रूप किंवा पेन्नूर ठिकाणी एकत्र येतो. या काळात आपसातील भांडण-तंटे जातपंचायतीत मिटविण्याची कामं केली जातात. लग्न जमविणं व लग्न लावणं ही कामंही या काळात केली जातात.
महाराष्ट्रात आपण त्यांना कडकलक्ष्मी म्हणतो, परंतु विभागवार आणि प्रांतवार यांना देऊळवाले, मरीआईवाले, मरगम्मा, बुरबुर-पोचम्मा, गुबुगुबु, बुगुबुगु आदी नावांनी हे ओळखले जातात. यांच्या परंपरागत व्यवसायाबद्दल लोकांत पूर्वीसारखी आस्था, प्रेम, आपुलकी राहिलेली नाही. आधीपासूनच हे लोक भटक्या प्रवृत्तीचे असल्यामुळे मुख्यत: बेघर व भूमिहीन आहेत. सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या संदर्भात ते साधनविहीन आहेत. भारताचे भूमिपुत्र असून अनेक पिढय़ांपासून महाराष्ट्राचे रहिवासी असले तरी ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्रांचे पुरावे नाहीत. निरक्षरता व अज्ञानाचा यांच्यावर एवढा दुष्परिणाम झाला आहे की त्यांची जात त्यांनाच माहीत नाही. अलीकडे सोलापूर जिल्हय़ात त्यांच्यापैकी काहींची मुलं-मुली शाळेत जात आहेत. त्यांची शाळेच्या दप्तरातली जात तपासली तर नंदीवाले, कोळी, महादेव कोळी, भिल्ल, भिक्षेकरी, फिरस्ते, कडकलक्ष्मी, तिरमळ अशी लिहिल्याचं कळतं. त्याबाबत पालकांना विचारलं तर ‘आम्हाला काहीच माहीत नाही, अंगुठा उठवा म्हणाले, आम्ही उठवला.’ असं उत्तर मिळतं. मुलामुलींना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अर्जाचा फॉर्म भरणाऱ्यांनी सदिच्छेने या चुका केलेल्या दिसतात. सख्ख्या भाऊ-बहिणीच्या जाती वेगळ्या लागल्याचं कळतं. भटक्या जमातीची पाश्र्वभूमी, पात्रता, निकष असूनही यांना स्वराज्यात शासनाच्या भटक्या जमातीच्या यादीत समावेश होण्यासाठी २००१ सालापर्यंत वाट पाहावी लागली.
अकलूजमधील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे कडकलक्ष्मी जमातीचे निरक्षर गोरख रामा चव्हाण यांचा मुलगा रणजीत चव्हाण याची जात शाळेत ‘नंदीवाले’ अशी लागली. रणजीतने दहावीत ७० टक्के आणि बारावीत ६० टक्के गुण मिळवून पुढील शिक्षणासाठी बारामती येथे ‘अ‍ॅग्री बायोटेक’ला भटक्या प्रवर्गातून प्रवेश घेतला. प्रवेश कायम होण्यासाठी जातीच्या दाखल्याचा ‘पडताळणी दाखला’ हवा असतो. पोलीस व खास अधिकाऱ्यांतर्फे गृह चौकशीचा योग्य अहवाल असूनसुद्धा तो दाखला मिळत नव्हता. शेवटी रणजीतच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी मरीआईचे देऊळ डोक्यावर घेऊन अंगाभोवती आसुडाचे फटकारे मारून घेत अकलूज ते सोलापूर पायी यात्रा काढून जातपडताळणी समितीच्या कार्यालयाला धडक दिली तेव्हा कुठे रणजीतला दाखला मिळाला.
सोलापूर जिल्ह्य़ातील मोहळ तालुक्यातील पेन्नूर गावात सुमारे तीन हजार लोकसंख्येची या जमातीची मोठी वस्ती आहे. याच समाजातले दगडू निंबाळकर यांनी जमातीत जागृती व संघटनकार्य यापूर्वीच सुरू केले आहे. त्यांनी स्वत: डोक्यावरच्या मरीआईपुढे कोरडे मारून घ्यायचं काम बंद केलं आहे. सर्वप्रथम स्वत:च्या मुला-मुलीस शिक्षणासाठी शाळेत घातले. जातपंचायतीतर्फे ठराव करुन नशाबंदीचा प्रचार सुरू केला. महिलांचा बचत गट व लहान मुलांसाठी बालवाडी सुरू केली. परंतु सरकारी यंत्रणेची पोलादी चौकट ते अद्याप ओलांडू शकलेले नाहीत.
काही युवक-युवतींकडे पाहिलं की मात्र जमातीत तांबडं फुटतंय असं म्हणावंसं वाटतं. पाचवीत असताना नवोदय विद्यालयात रावसाहेब चव्हाण यांना भटक्या जमातीचा उमेदवार म्हणून प्रवेश मिळाला होता. परंतु जातीचा दाखलाच मिळाला नाही म्हणून प्रवेश रद्द झाला. आता ते जात न सांगता, जातीचे फायदे न घेता, खुल्या गटातून जमातीतले पहिले पदवीधर झाले आहेत. दुसरे पदवीधर अंकुश चव्हाण आणि संपतराव निंबाळकर हे दोघेसुद्धा, जातीचा दाखला मिळत नाही म्हणून राखीव जागेशिवाय खुल्या वर्गातून पोलीसमध्ये भरती झाले आहेत.
कडकलक्ष्मीच्या अनेक कुटुंबांत हिंदू-मुस्लीम नावे आहेत. नगरचे रशीद उस्मान निंबाळकर स्वत: बी.एस्सी.चे विद्यार्थी असून पेन्नूर येथे गरीब मुलांसाठी त्यांनी एक मोफत क्रीडा अकादमी सुरू केली आहे. जमातीतले कल्याण जाधव यांनी आपली साडेचार एकर जमीन या कामी दोन वर्षे वापरण्यासाठी मोफत दिली आहे. कुस्ती, मैदानी खेळ, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यासाठी एकूण ७० जणांना याचा लाभ होतो आहे. यापैकी जमातीतल्या सहा मुलांसह एका मुलीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हे लोक कोणा देवाच्या नावे उपासतापास करत नाहीत. एकादशी, पौर्णिमा, अमावास्या, महाशिवरात्र, वगैरेंसारखे सण-उपवास करत नाहीत. डोक्यावरचे मरीआईचे देऊ ळ सोडले तर वस्तीत, पालात किंवा मनात कोणता देव नाही. देवाच्या मूर्त्यां नाहीत. देवाचे देऊळ नाही. मात्र वस्तीतल्या युवकांनी ‘रामा, पापा, दुर्गा देवस्थान’ या नावाचे एक समाज मंदिर बांधले आहे. आजच्या जमातीतल्या लोकविस्ताराचे ते पूर्वज, फार न्यायी व लोकहितवादी होते.
जमातीत कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन दोन बायका केल्या जात. पहिली देऊळ घेऊन पतीबरोबर फिरणारी तर दुसरी लेकरांची व स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळणारी. गरजेप्रमाणे या जबाबदाऱ्या बदलल्या जायच्या. मुलगी १३-१४ वर्षांची झाली की लग्नाची घाई केली जाते. मुलाचे १८-१९ व्या वर्षी लग्न होईल असे पाहिले जाते. लग्न मुलीच्या दारात केले जाते. हुंडा पद्धत बिलकूल नाही. लग्नाचा सारा खर्च मुलाच्या बाजूने करायचा असतो. लग्न लावण्याचा मान जमातीतल्या निंबाळकर घराण्यातील पुरुषांना आहे. भटजीला बोलविले जात नाही. आजपर्यंत जातीच्या सामान्य लोकांना पोलीस स्टेशन माहीत नाही. सारे वाद, मतभेद जात पंचायतीत मिटवले जातात. पंचायतीच्या चर्चेत व निर्णयप्रक्रियेत उपस्थित सर्व पुरुषांना सहभागी होता येते. मात्र कोणत्याही परिस्थितीत महिलेच्या पुनर्विवाहास मान्यता मिळत नाही. आजपर्यंत जिल्ह्यातील सुमारे तीस हजार लोकसंख्येत एकाही महिलेचा पुनर्विवाह झालेला नाही. पुरुषाचे पुनर्विवाह होऊ शकतात. जातपंचायतीत बसायला-ऐकायला महिलांना परवानगी आहे. परंतु बोलायला, मत मांडायला परवानगी नाही.
संपूर्ण समाज मांसाहारी आहे. वाडवडिलांपासून शिकारीचे तंत्र अवगत आहे. रानडुक्कर, रानमांजर, खवल्या मांजर, सायाळ, हरीण वगैरे प्राण्यांची शिकार करण्याची माहिती आहे. मात्र आता शिकार करण्यास बंदी असल्याने उपजीविकेचे तेही साधन त्यांच्यापासून हिरावून घेतले गेले आहे.
भिक्षा मागण्याचा परंपरागत व्यवसाय उपजीविकेसाठी फारसा उपयोगाचा नसल्याने बऱ्याचशा महिला व मुले-मुली आता भंगार वेचण्याचे काम करतात. त्यात खूप कष्ट असून तुलनेने उत्पन्न कमी आहे. पण तो धंदा किमान बेकायदेशीर तरी नाही. वेचलेला भंगार-कच्चा माल त्या त्या ठिकाणच्या छोटय़ा व्यापाऱ्याला विकावा लागतो. ते छोटे व्यापारी मोठय़ा व्यापाऱ्याला विकतात. या व्यवहारात व्यापाऱ्यांनाच जास्त फायदा होतो. म्हणून कचरा वेचणाऱ्या महिला-मुलींची मागणी आहे की कचरा साठविण्यासाठी जागा द्या, कच्च्या मालात प्लॅस्टिक जास्त असते. त्याचा पक्का माल करण्यासाठी प्रशिक्षण व साधने द्या. आम्हीही उत्पादन साधनाचे कुशल कामगार व मालक बनू. निराधार भिक्षेकरी ते जबाबदार मालक असे लोकशाहीला भूषणावह परिवर्तन होईल.
बेघर, भूमिहीन, साधनविहीन, पत्ताविहीन, अकुशल व अशिक्षित असलेल्या कडकलक्ष्मी जमातीच्या सुमारे तीस हजार लोकांना म्हणजेच सुमारे सहा हजार कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार व विकासाची विशेष संधी प्राधान्याने मिळण्यासाठी निवारा, उत्पन्नाचे पर्यायी साधन देण्याचे शिवाय त्यांना जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळेल असा मार्ग शोधण्याचे आव्हान समाज व शासनापुढे आहे.
pallavi.renke@gmail.com अ‍ॅड. पल्लवी रेणके

First Published on August 15, 2015 1:03 am

Web Title: tribes of maharashtra
टॅग Maharashtra,Tribes
Just Now!
X