24 September 2020

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : उरलो उपचारापुरता!

‘थँक्यू’ आणि ‘सॉरी’ हे आपल्या रोजच्या बोलण्यात पदोपदी वापरले जाणारे शब्द. मात्र अलीकडे त्याबरोबर फक्त ‘मॅनर्स’च नव्हेत, तर संस्कृतीही जोडली गेली आहे.

साध्या शुभेच्छा देताना ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवरच्या कमेंट्स आणि त्याला येणारे ‘लाइक्स’ही नको इतके महत्त्वाचे ठरू लागले आहेत.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

‘थँक्यू’ आणि ‘सॉरी’ हे आपल्या रोजच्या बोलण्यात पदोपदी वापरले जाणारे शब्द. मात्र अलीकडे त्याबरोबर फक्त ‘मॅनर्स’च नव्हेत, तर संस्कृतीही जोडली गेली आहे. इतकी, की आता साध्या शुभेच्छा देताना ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवरच्या कमेंट्स आणि त्याला येणारे ‘लाइक्स’ही नको इतके महत्त्वाचे ठरू लागले आहेत. अति झालेले हे ‘उपचार’ जेव्हा पेलवेनात, तेव्हा बाप्पा केणींनी वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’लाच फोन लावला.  बागेतल्या सिमेंटच्या बाकावर बसून बाप्पा केणी पोरांचे खेळ बघत होते. बाग फुलांनी आणि मुलांनी डवरली होती. मुलांची बेभान पळापळ, आरडाओरडा, हमरीतुमरी, मध्येच गगनभेदी किंचाळ्या रंगात आल्या असताना एका पोराचं काहीतरी बिनसलं आणि ते कोपऱ्यात जाऊन रुसल्याचा अभिनय करायला लागलं.

बाप्पा केणींनी थोडा वेळ त्याला रुसू दिलं आणि नंतर जवळ बोलावून आपल्या खिशातलं एक चॉकलेट त्याच्यासमोर धरलं. तो आपला जन्मसिद्ध हक्क असल्याच्या थाटात पोरानं ते खेचलं, मटकावलं आणि चालायला, खरं तर पळायला सुरुवात केली. ‘‘हात्तिच्या! एवढय़ाच लाचेची सोय हवी होती होय,’’ या विचारानं बाप्पा केणींना हसू फुटणार तेवढय़ात दुरून कुठून तरी पोराच्या नावानं पुकारा झाला, ‘‘रेहान.. से थँक्यू टू अंकल बेटा.’’ इकडे बेटा मटामटा चॉकलेट खाण्यात गर्क. ऐकतोय कशाला?

‘‘थँक्यू केलंस बेटा? मला ऐकू नाही आलं तुझं थँक्यू. मी तुला शिकवलंय की नाही? कुणी काही दिलं की थँक्यू करायचं?’’ मातेचं मूल्यशिक्षण सुरू झालं. पोराला पळण्याचा अमूल्य वेळ कुठल्या तरी फालतू ‘थँक्यू’त दवडायचा नसावा. पुढचा काही वेळ मुलाला ‘थँक्यू’ म्हणायला लावायचं यावर माता ठाम आणि ‘वाट्टेल ते म्हणेन पण थँक्यू म्हणणार नाही’ असा पोराचा कृतनिश्चय याची रस्सीखेच सुरू राहिली. हाही एक खेळच, असं म्हणून गंमत बघणाऱ्या बाप्पा केणींसमोर एका क्षणी त्या आईनं पोराला कान धरून आणलं आणि ‘थँक्यू’ म्हणायला लावलं. खेळाची सगळी मजा तर गेलीच, पण रडक्या चेहऱ्यानं, डबडबत्या डोळ्यांनी म्हटलेलं ते सक्तीचं ‘थँक्यू’ बाप्पा केणींना उलट लागलंच. अजिजीनं ते म्हणाले, ‘‘अहो, राहू द्या. एक छोटंसं चॉकलेटच तर दिलंय.’’

‘‘असं कसं? काही मॅनर्स आहेत की नाहीत?’’ आई मुलाकडे पाहात म्हणाली.

‘‘आहेत.. म्हणजे.. असायला हरकत नाही. पण एवढं मानगूट धरून ते पाळलेच पाहिजेत असं काही नाही.’’ बाप्पा.

‘‘नो वे. आज एवढय़ावर सोडत्येय मी त्याला. पण पुन्हा असं केलंन तर उपाशी ठेवीन. वन काण्ट बी दॅट मॅनरलेस, यू नो.’’ आईनं धमकावलं.

यावरून निदानपक्षी आपण या पोराला काही चॉकलेटबिकलेट पुन्हा द्यायला जायचं नाही, एवढं मनाशी ठरवत बाप्पा केणी बाकावरून उठले.

बागेच्या फाटकाजवळ तरुणांचं एक टोळकं उभं होतं.  टवाळक्या, मोठमोठय़ांदा हसणं, यामध्ये गर्क होतं. बाप्पा केणी त्यांच्या बाजूनं सरकून जात असताना त्यातल्या एका तरुणाची थिरकती टांग त्यांच्या पायात अडकली आणि ते जरासे झेलपटले. एकीकडे कलंडून, एका झुडपाला धरून, सावरून कसेबसे आपल्या दोन पायांवर स्थिरावत होते. तेवढय़ात त्या टांगधारकाला लोकांनी धरला.

‘‘सॉरी बोल. सरांना सॉरी बोल.’’, ‘‘माफी मागा काकांची.’’, ‘‘माफी होत्येय का पोलिसांना बोलवू?’’ बाप्पा केणींना हा धक्का जास्त बसला. एवढं पोलीस बोलावण्याएवढं काही झालं नव्हतं त्यांच्या मते. पण त्यांच्यापेक्षा लोकच जास्त इरेला पेटले होते. ‘‘पाडतो तर पाडतो.. वर साधी ‘स्वारी’ नाही?’’ बाप्पा केणींना साधी स्वारी, ‘फोडणीची’ स्वारी, यापेक्षा तिथून आपली सवारी लवकर हलवण्यात रस होता. पण लोक त्यांनाही जाऊ देईनात. बऱ्याच घशांना व्यायाम मिळाल्यानंतर शेवटी एकदाचा तो टांग अडवणारा खेकसला, ‘‘ओ भाऊ.. स्वॉरी बर्का. बोललोय ना. चला, जावा घरला.’’ इतकं उद्धट किंवा तुच्छट सॉरी बाप्पा केणींनी आयुष्यात ऐकलं नव्हतं. तरीही सॉरीचं आन्हिक पूर्ण झाल्याच्या समाधानानं सारी ‘पब्लिक’ पांगली. बाप्पा केणींना मात्र घरी जाईपर्यंत तिची सोबत राहिली. मनात परिसंवाद सुरूच राहिला, ‘‘या ‘सॉरी’नं इथल्या नक्की कु णाचा काय लाभ झाला असेल बरं?’’

घरी पोहोचले तर बायकोची कु णीतरी भाची तिचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच भेटायला आली होती. तिला रस्त्यात पाहिलं असतं तर बाप्पांनी ओळखलंही नसतं इतपत ‘जवळचं’ नातं होतं. पण बाप्पांना बघताच, बुडाला काहीतरी टोचावं तशा झटक्यानं ती खुर्चीतून उठली आणि पोहताना पाण्यात सूर मारावा तशा आविर्भावात तिनं बाप्पांच्या पायाच्या दिशेनं सूर मारला. तिच्या ‘बटरफ्लाय स्ट्रोक’नं दचकलेल्या बाप्पा केणींना काही कळायच्या आत तिचा उजवा हात त्यांच्या उजव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या टाचेजवळची पॅण्टची कड आणि शेजारी काढून ठेवलेल्या चपलेचा अंगठा अशी धावती सफर करून विजेच्या वेगानं तिच्या छातीला जाऊन टेकला. साधारणपणे हा ‘नमस्कार’ असावा, असा अंदाज बाप्पा केणींना आला. पण नक्की माहीत असूनही अशा वेळी ‘आशीर्वाद देणं इज एक्स्पेक्टेड,’ हे काही आठवलं नाही. पॅण्टच्या कडेला आणि चपलेच्या अंगठय़ाला आशीर्वाद देणं मुदलात माहीतच नसावं. तरीही बाप्पांची बायको गहिवरून म्हणाली, ‘‘बरं झालं बाई तुम्ही वेळेवर आलात. आल्यापासून हिचं चाललं होतं. तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय इथून जायचं नाही. याला म्हणतात संस्कार.’’ बाप्पांच्या गुडघ्याची, पोटरीची हुळहुळ अजून थांबलीही नव्हती, त्यात मनात चुळबुळ सुरू झाली. ‘‘हा असा नमस्कार नक्की कु णाला, कोणते संस्कार दाखवून, पुढे नक्की कुणापर्यंत पोहोचत असेल बरं? की आम्हालाही सूर मारता येतो या सुरावरच संपतो तो?’’

बायकोची भाची परत जाईपर्यंत दिवस आणि एकूण उत्साह संपायला आलेला होता. वयानुपरत्वे बाप्पा केणींची देहाची किल्ली आताशा लवकर संपायची. त्या दृष्टीनं ते आवराआवर करायला जाणार तेवढय़ात त्यांची बायको म्हणाली, ‘‘अहो, राजस्थान ट्रिपमध्ये आपले फ्रेण्ड झालेल्या सावर्देकरांचा बर्थडे आहे हो आज. ‘एच.बी.डी.’ केलं का?’’

‘‘वाढदिवस आहे त्यांचा? तुला कसं कळलं?’’ बाप्पांनी विचारलं.

‘‘दिवसभर चाललंय की फेसबुकवर. ट्रिपमधल्या लोकांनी काय काय पाठवलंय.. केक्स, कॅण्डल्स, बुकेज..’’ बायकोनं माहिती दिली.

‘‘बोलतो उद्या फोनवर.’’

‘‘उद्या काय उद्या? आजचं महत्त्व उद्याला असणार का? निदान पाचशे लोकांनी ‘विश’ केलं असेल आज.’’

‘‘म्हणूनच ना. त्या पाचशेत आपण एक असलो काय, नसलो काय. काय एवढा फरक पडणार आहे? फोनवर त्यांच्याशी गप्पा केल्या तर मनं तरी रमतील, मोकळी होतील.’’ बाप्पा.

‘‘असे कसे हो तुम्ही? मॅनरलेस. लोक काय म्हणतील?’’

‘‘म्हणतील की आईनं काही वळण लावलं की नाही तुम्हाला?’’ बाप्पा केणींनी डोक्यावर उरलेलं विरळ, पांढरं जावळ कुरवाळत म्हटलं.

त्यांच्या आईचा उल्लेख आल्यावर प्रथेप्रमाणे त्यांची बायको उसळली आणि खेकसली. ‘‘तुम्ही मला शेंडय़ा लावू नका. फोन करा. लगेच. प्लीजच.’’

तिनं दरडावत ‘प्लीज’ म्हटलं. पुढे साहजिकच मैत्री, नाती टिकवण्याचं महत्त्व, जगात वागावे कसे?, एकूण ‘मॅनर्स’, ‘एटिकेट्स’ कशाशी खातात, ‘तीन दिवसांत तीनशे मॅनर्स’चं गाइड, एकेक माणसं कशी जगाच्या मागे ती मागेच राहतात, अशा दिशेनं तिचं भाषण घरंगळत गेलं. अजून काहीही ऐकावं लागू नये म्हणून नाइलाजानं बाप्पा केणींनी ‘एच.बी.डी.’ करून टाकलं. बायकोचा आत्मा तर शांत केला, पण त्यांच्या स्वत:च्या मनात खळबळ होतीच. एकदा साधं ‘हॅपी बर्थ डे’ म्हणायचं राहिलं म्हणून जी मैत्री तुटते ती मुळात तकलादूच नसणार का? मग ती टिकली काय आणि तुटली काय? काय फरक पडणारे? त्यासाठी आपण या वयात दर वेळेला नव्यानं ‘शहाणा मुलगा’ व्हायला घेणं कुठवर जमणारे? मुलांना वळण लावणं, रीतभात शिकवणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पूर्वीही होतंच. तेव्हाही ती-ती बंधनं पाळणं अनेकांच्या जीवावर येत होतंच. तरीही जे काही केलं जाई, त्याला कु णाच्या तरी धाकापोटी का असेना, पण किमान शिस्त होती, रीत-पद्धत होती. वाकून नमस्कार करताना गुडघ्यात वाकता कामा नये, उंबरठय़ावर किंवा तुळईखाली उभं राहून शुभेच्छा, आशीर्वाद देऊ नये, औक्षणही करू नये वगैरे दंडक होते. आता त्यातले फक्त शब्द उरलेत का? आणि ते वापरण्याच्या सरावावरून, सफाईवरून माणसाची किंमत ठरणार का?

बाप्पा केणींच्या ‘बर्थ डे विशेस’ना सावर्देकरांचं उत्तर, निदान ‘लाइक’ तरी आलंय का, याचा शोध दिवसभर त्यांची बायको अधूनमधून घेत राहिली. काही प्रतिसाद नाही म्हणून चुळबुळत राहिली. ‘‘तुम्ही एवढय़ा उशिरानं विश केलंत म्हणून ते रागवले तर नसतील?’’ अशा शंका काढत राहिली. शेवटी तर, ‘‘त्यांना फोन करून विचारूया का?’’ इथवर आली, तेव्हा बाप्पा केणी वैतागले. सरळ ‘व्वा हेल्पलाइन’वर फोन करून वत्सलावहिनींशीच बोलायला लागले.

‘‘वत्सलावहिनी, हे ‘सॉरी’, ‘थँक्यू’, ‘कर्टसी’, ‘मॅनर्स’, ‘माय प्लेजर’,पाया पडणे, ‘पैरी पोना’ वगैरेंचं बंड आता जरा जास्तच माजलंय का?’’

‘‘इंग्रज गेले तेव्हा ‘सॉरी’, ‘थँक्यू’ सोडून गेले मागे.’’ वत्सलावहिनी.

‘‘ते जुनं झालं हो. उगाच सगळ्याचं बिल इंग्रजांवर कुठे फाडत बसणार आपण? आपल्याकडेही नमस्कार-चमत्कार होतेच.’’

‘‘बरं वाटत होतं ना त्यानं? ‘फील गुड’ वगैरे? मग झालं तर.’’ वत्सलाबाईंचा मुद्दा.

‘‘तेच माझं म्हणणं आहे. क्षणभर बरं वाटण्यापलीकडे या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. पण सध्या तेच बोकाळतंय.’’

‘‘साधनं आहेत, माध्यमं आहेत. प्रचार-प्रसार होणारच.’’

‘‘वेळ घालवण्यापुरतं हे राहात नाही ना एका टप्प्यावर. हे करणं म्हणजे संस्कृती जपणं, वगैरे वाटायला लागतं तेव्हा गफलत होते.’’ बाप्पा.

‘‘चालायचंच. हा ज्याच्या-त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. कु णी जर उपचारांनाच संस्कृती ठरवणार असेल तर..’’

‘‘तर तो वेडाचार समजला पाहिजे. सुसंस्कृतपणा काय इतका फुटकळ आणि वरवरचा असतो होय?’’ बाप्पा ठामपणे म्हणाले.

‘‘नसायला पाहिजे. पण आता खोलात शिरायला वेळ आहे कु णाला? सगळं सोपं, इन्स्टण्ट हवंय ना.. घ्या!’’ वत्सलावहिनी.

‘‘मग संस्कृती, संस्कृती म्हणून आपण जी ऊठसूट उद्धारायला घेतो ती कोणती? तिची सुरुवात कशापासून? सांगता थोडं..’’

‘‘मार्गारेट मीडनं एकदाच सांगून ठेवलंय ते सांगते हवं तर.’’

‘‘मार्गारेट.. कोण होती ही?’’

‘‘प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ नाही का? तिच्या तो मांडीच्या हाडाचा सिद्धान्त प्रसिद्धच आहे. ऑनलाइन मिळतो की वाचायला. ज्या क्षणी माणसाचं मांडीचं तुटलेलं हाड जोडलं गेलं, त्या क्षणी संस्कृतीचा जन्म झाला असं म्हणते ती. म्हणजे बघा हं.. मांडीचं हाड तुटलं, माणूस जागीच खिळला. ना तो अन्नवस्त्र मिळवू शकत, ना तो संकटापासून स्वत:ला वाचवू शकत. तरीही तो जायबंदी असताना ते हाड- ‘फीमर बोन’ म्हणतात त्याला- ते जुळेपर्यंत तो जगू शकला.

म्हणजेच कु णीतरी त्याला जगवला. अन्नपाणी, देहधर्म, संरक्षण बाहेरून कु णीतरी त्याला पुरवलं. तो कोणतीही परतफेड करू शकत नव्हता, तरी त्याची गरज ओळखून दुसऱ्यांनी स्वत:हून त्याला मदत केली. एका माणसाला समोरच्या दुसऱ्या माणसासाठी थांबून काहीतरी करावंसं वाटणं हा संस्कृतीचा आरंभबिंदू

आहे असं म्हणते ती! आपण ‘सारांश’ म्हणूया हवं तर.’’

‘‘बापरे. वत्सलावहिनी, कुठून कुठे नेलंत?’’ बाप्पा.

‘‘बघा, वाटलं तर विचार करा. कळेल त्यांना सांगा. पण बाकी सगळे उपचार मात्र त्यांच्या त्यांच्या वजनानंच घ्या. तुकाराम महाराज काय म्हणाले होते, ‘उरलो उपकारापुरता.’ आताचा समाज म्हणतोय,‘उरलो उपचारापुरता.’ ’’

बाप्पा केणी क्षणभर अवाक्  झाले. जरा शब्द जुळवताहेत तेवढय़ात मागून पत्नीची ललकारी आली, ‘‘अहो, सावर्देकरांनी माझ्या फोनवर ‘थँक्स’ पाठवल्येत बरं का!’’

उपचारांचं वर्तुळ पूर्ण झाल्याची खुशी तिच्या शब्दांमधून ठिबकत होती. त्यापुढे काही बोलण्याची उमेद न राहिल्यानं बाप्पांनी वत्सलावहिनींचा फोन आणि मनातला विषय एकत्रच बंद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 5:58 am

Web Title: use of thank you sorry and please only as manners waa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : अतिक्रमण
2 निरामय घरटं : निचरा भावनिक साचलेपणाचा!
3 प्रत्येक जीव मोलाचा
Just Now!
X