18 February 2020

News Flash

स्वत:ला बदलताना: मी का बदलायचं?

समाजात वावरत असताना आपली जी काही चांगली-वाईट प्रतिमा असते ती समाजाच्या निरीक्षणातून, ऐकीव माहितीतून आणि आपल्या विविध वेळी स्पष्ट दिसणाऱ्या वागण्यातून तयार होत असते.

| July 5, 2014 01:07 am

समाजात वावरत असताना आपली जी काही चांगली-वाईट प्रतिमा असते ती समाजाच्या निरीक्षणातून, ऐकीव माहितीतून आणि आपल्या विविध वेळी स्पष्ट दिसणाऱ्या वागण्यातून तयार होत असते. स्वत:ला बदलायचे असेल तर पुढील प्रश्नांचा विचार करायला हवा, समाजाच्या या आरशातील प्रतिमांचा उपयोग होतो का? आणि जर होत असेल तर मी तो कसा करून घेणार आहे? या आरशातील प्रतिमातून मी काय शिकणार आहे?
आ पल्या सभोवतालच्या जगात सर्वत्र आरसे बसवण्याची योजना विश्वकम्र्याने केली आहे. आपल्या नकळत हे आरसे आपली प्रतिमा उमटवण्याचे काम बिनबोभाट करत असतात. त्यातले बरेचसे आरसे आपले रूप खूप सुंदर दाखवतात. काही आरसे आपलं विद्रूप प्रतििबब दाखवतात. काही आरसे सांगत असतात फाड तो मुखवटा आणि जसा आहेस तस्सा समोर उभा राहून तुझं खरं रूप पहा. या वाक्याशी थबकायला होतं! खरंच आपण जसं असतो तसं नेहमीच वागतो का?
आपल्याभोवती जे आरसे आहेत ते म्हणजे लोकांच्या नजरा! या नजरा सतत आपल्या वागण्या-बोलण्याचा त्यांच्या कुवतीनुसार अर्थ लावत असतात. हे आरसे आपल्या स्वत:ला ओळखायला मदत करीत असतात. दैनंदिन जीवनात एकाच वेळी आपण भिन्न भिन्न भूमिका करत असतो. कधी मालक तर कधी नोकर, कधी पती तर कधी पिता, कधी माता कधी कन्या, कधी पत्नी कधी सासू, कधी दाता तर कधी याचक. अशा एकपात्री खेळात भूमिका-परिस्थिती आणि आपले स्वत:चे मूळ व्यक्तिमत्त्व यांची सरमिसळ करत वेगवेगळी रूपे, मुखवटे वापरत असतो. इथेच गडबडीला सुरुवात होते. मग आपण कोणता मुखवटा कोणत्या आरशात चांगला दिसतो ‘तो मीच’ असे वाटून घ्यायला सुरुवात होते. त्यात आपल्याकडे ‘हाडाचा शिक्षक’, ‘राजकारणाचे बाळकडू’ अशा भोवतालच्या आरशातील प्रतिबिंबांनी सांगितल्यामुळे मीच तो अशी भावना निर्माण होते. अनेक आरसे भलतेच चलाख असतात. बघणाऱ्याला काय हवंय तेच उत्तर वारंवार देतात. ‘किती सुंदर दिसतेस तू, हसणं तर अगदी माधुरीसारखं!’, ‘केस किती छान नूतनसारखे.’ अशी उत्तरं ऐकायची सवय लागते आणि माणसं सोयीस्कररीत्या इतर आरशांना विसरत जातो. आपल्या लाडक्या आरशाच्या आवाजात इतर आरशांनी कोलाहल केला तरी ऐकूच येत नाही.
याचं दुसरं टोक म्हणजे थेट आमच्या विनयसारखं. त्याला काहीही सांगा, दाखवा, त्यातली कमतरताच त्याच्या डोळ्यात भरते. दुसऱ्या व्यक्तीच्या विकृत प्रतिबिंबांकडे तो पाहतोच, परंतु स्वत:ला पाहण्यासाठीसुद्धा वक्री आरसेच निवडतो. त्याची स्वत:च्या रूपाबद्दल (उदाहरणार्थ- देवाने रंग, त्वचा, कान सगळे आईसारखं दिलं आणि बापाचंच फेंद्र नाक द्यायची काय जरूर होती?), शिक्षणाबद्दल, (एम.ए. झालो पण प्रथम श्रेणीसाठी फक्त एकच गुण कमी!) आणि सर्वात महत्त्वाचं पत्नीबद्दल (खरं तर मला पसंत नव्हती, पण बाबांनी जोर केला, आईही थकत चाललेली, मग घातला हार. तो सदैव इतरांशी तुलना करे आणि स्वत:ला कमी लेखत नशिबाला दोष देत बसलेला असे.
तर काही जणांचं वेगळंच. ते या आरशाच्या प्रतिबिंबाकडे जाणूनबुजून लक्ष देत नाहीत, सामान्यत: स्त्रियांना अशा नजरांची जाणीव पुरुष मंडळींच्या तुलनेत जास्त असते. त्यांच्या सौंदर्याला दाद देणाऱ्या नजरा आणि ओंगळ, वासनांनी ओथंबून असलेल्या नजरेतला फरक त्यांना समजतो आणि कोणाला किती अंतरावर ठेवायचं हे बहुतेक स्त्रिया पक्कं जाणतात. परंतु समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातली प्रतिमा अजून बरेच काही सांगत असते, परंतु त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. अगदी जुनी आठवण आहे. १९७३-७४ मधली. वर्गातले आम्ही सर्वच जण नुकतेच किशोरवयात आलेलो. आमच्या वर्गशिक्षिका नेहमी फक्त पांढरी साडी नेसायच्या. ब्लाऊज पांढरेशुभ्र, पण मोठय़ा गळ्यांचे आणि तलम कापडाचे. त्या बाईंना एक सवय होती, जर एखाद्याला गणित जमत नसेल तर त्या त्याच्या बाकाशी जाऊन ओणवे होऊन ते गणित कसे सोडवायचे ते समजावून सांगायच्या. पण आम्हा मुलांना गणितात थोडाच रस होता? बाईंच्या ‘त्या’ दर्शनात सगळे खूश असायचे. म्हणूनच शाळेतल्या मुतारीतल्या भिंतींवर त्या बाईंची असंख्य चित्रे काढलेली होती. आता मागे वळून बघताना वाटतं, बाईंना आम्ही मुलं का इतक्या शंका विचारत आहोत हे कळत नसेल? त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांच्या नजरेचे इतके आरसे असतानासुद्धा त्यांच्या कपडय़ाचा म्हणजेच ब्लाऊजच्या गळ्याचा आकार कमी का झाला नाही? हे फक्त एक उदाहरण म्हणून कृपया लक्षात घ्या. सांगायचं इतकेच की, ‘मी आहे तसाच राहणार’, आरसे काही का म्हणेनात ही वृत्ती तुमचं समाजातलं स्थान ठरवत जाते.    
पण मुख्य प्रश्न हे आहेत की, या आरशातील प्रतिमांचा उपयोग होतो का? आणि जर होत असेल तर मी तो कसा करून घेणार आहे? या आरशातील प्रतिमांतून मी काय शिकणार आहे का? समाजात वावरत असताना आपली जी काही चांगली-वाईट प्रतिमा असते ती समाजाच्या निरीक्षणातून, ऐकीव माहितीतून, आणि आपल्या विविध वेळी स्पष्ट दिसणाऱ्या वागण्यातून तयार होत असते. माझ्या आठवणीत विभाकर म्हणून एक कार्यकत्रे होते. एका पुस्तकाच्या दुकानात ते नोकरी करीत होते. आजन्म ब्रह्मचारी राहून सेवा करणे हे त्यांचे व्रत होते. त्यांचे वैशिष्टय़ असे की, एखाद्या घरात कुणी वारलं तर संपूर्ण सदाशिव पेठेला विभाकरची आठवण येई. कोणीतरी सायकलवरून विभाकरला आवाज देई आणि दहा मिनिटांत तो त्या घरी हजर असे. एकदा का तो तिथे पोहोचला की सगळ्या गोष्टींचा तो अक्षरश: ताबा घेई. गुरुजींना बोलावणे, तिरडी योग्य रीतीने भक्कम बांधणे, मडके, पंचा, लाकडे सगळी व्यवस्था तो करे. आणि सवाष्ण बाई गेली तर- हिरवं लुगडं नेसवा, मळवट भरा, मंगळसूत्रातले दोन मणी ओठात ठेवा अशा सूचना देत असे. माझे आजोबा म्हणत, पुलंचा ‘नारायण’ हा लग्नवाला तर आमचा विभाकर ‘मयतवाला’.
सांगायची गोष्ट इतकीच की विभाकरसारखी त्या त्या विषयातील तज्ज्ञ माणसे असतात आणि त्यांच्या कृतीतून त्यांना एक व्यक्तिमत्त्व लाभते, पण हळूहळू काही गोष्टी कानावर
येऊ लागल्या. तेरावा झाला आणि घरी विधवा असेल तर विभाकर आवर्जून सांत्वन करायला जात असे आणि सांत्वनाच्या निमित्तानं या विधवांशी नको तितकी सलगी करणं सुरू होई.
तीन-चार जणींना हे अनुभव आले तेव्हा कुजबुज सुरू झाली. ‘सेवाभावी ब्रह्मचारी’, ‘हाकेला ओ देणारा’, ‘मयततज्ज्ञ’ आदी प्रतिमा असलेला विभाकार  समाजापासून लांब गेला. पुढे तो पुणे सोडून गेला. चार-पाच वर्षांनंतर एकदा तो घरी येऊन भेटून गेला. माझे आजोबा, वडील कुणीच पुरुष माणूस घरात नव्हतं.
आजीने काळजी म्हणून मला त्याच्या शेजारी बसवलं. त्याने खिशातून हळकुंडाची शेव दिली आणि तो आला त्यामुळे मला चक्क चहा मिळाला. (मी दहावीपर्यंत चहाला मला बंदी
होती. असो.)
 म्हणूनच महत्त्वाचं आहे काही गोष्टींचा तटस्थपणे नीट विचार करणं. पहिली म्हणजे समाजाच्या नजरेतलं माझं प्रतििबब हे वास्तव आहे का? की माझी प्रतिमा चांगली व्हावी म्हणून मी चढवलेला तो मुखवटा आहे, हे शोधून काढणे.
दुसरी गोष्ट म्हणजे जे आरसे आपण निवडतो ते आपल्याला सोयीचे वाटतात म्हणून निवडतो का ते प्रतििबब पाहून आपण आत्म-संतुष्टतेची भावना बळावते म्हणून?
तिसरी बाब म्हणजे आपल्या जीवनाचे लगाम आपण समाजात असलेल्या प्रतिमेच्या हातात देतोय का? म्हणजेच आपल्या प्रतिमा, केवळ समाजाला काय वाटेल, या दडपणाने बदलतो वा बदलण्याचा प्रयत्न करतो का? हीच वेळ आहे आपण नेमके काय करायचे आहे याची.
सर्वप्रथम आपण परखडपणे आणि प्रामाणिकपणे प्रश्न विचारावा, मी का बदलायचं?
हा प्रश्न मनात येणं अजिबात चुकीचे नाही. माझी एक मेव्हणी म्हणते, भाऊजी, माझी मुलगी दहावीत आहे, नवरा भरपूर पसे मिळवतो, माझे इंग्लिशचे वर्ग दुथडी भरून वाहात आहेत, सासू-सासरे दोघेही आता हयात नाहीत, पसा हा प्रश्नच नाही, माझे सगळे छंद मस्त चालू आहेत. घरात काही करावे लागत नाही, हे मोठ्ठं घर, फार्म हाऊस आहेच. आहे त्या परिस्थितीत माझे खूप चांगले चालले आहे? अजून या परिस्थितीत मी का बदलायचं?
आमच्या कार्यालयात एक शिपाई आहे. बरेच र्वष आमच्याकडे काम करतोय. आता १८ हजार पगार असेल. त्याची पत्नी घरोघरी जाऊन महिना अडीच हजार कमावते. मुलगा इंग्लिश माध्यमात शिकतो, पण तो गॅजेट्सचा व्यसनी आहे. सारखे नवे फोन घेतो. कधी नावपण न ऐकलेल्या कंपन्यांचे फोन आणतो, दोन महिन्यांत विकतो. त्याला ना आईवडिलांच्या कष्टाची पर्वा आहे ना आपल्या खऱ्या गरजांची? जे मी करतोय ते बरोबर आहे की नाही असा प्रश्नही कधी यांना भेडसावत नाही हा खरा प्रश्न आहे. यांच्याबाबतीत खरा मुद्दा हा आहे की मी आत्मसंतुष्ट राहणार आहे का प्रगतिशील?
माझे सर्व मुखवटे बाजूला काढून मी प्रामाणिकपणे स्वत:ची प्रतिमा तटस्थपणे पाहू शकण्याचे धाडस माझ्या अंगी आहे का? आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की आपले मुखवटे, आपण झाकून ठेवलेली सत्यं, भळभळत्या जखमा ही वस्तुस्थिती आहे हे स्वीकारत आपले जीवन समृद्ध करू शकतो यावर आपली श्रद्धा आहे का? मी इथे विश्वास शब्द जाणूनबुजून टाळला आहे. त्याचे कारण ओशो. ते म्हणतात, ‘‘जिथे फक्त विश्वास असतो तिथे शंकेला जागा असते किंवा शक्यता असते. पण जेव्हा मनापासून श्रद्धा ठेवलीत तर तिथे ना संशय असतो ना अविश्वास!    

First Published on July 5, 2014 1:07 am

Web Title: why should i change my attitude
टॅग Chaturang
Next Stories
1 वाडा
2 छंदच बनलं करिअर
3 अनोखे दुकान
Just Now!
X